नागपूर : चर्मकार समाजाच्या विद्यार्थ्याच्या हाताला काम मिळण्याच्या उद्देशाने नागपूर जिल्ह्यात 'सेंटर ऑफ एक्सलंस' तयार करण्यात येणार आहे. याठिकाणी विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येईल. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी ही माहिती दिली आहे.
'सेंटर ऑफ एक्सलंस' या केंद्राच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक घडवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय स्वयंरोजगार, जागतिक दर्जाचे कौशल्य, उत्पादनांना नवीन बाजापेठ कशी मिळवून द्यावी, इत्यादींचे प्रशिक्षणही या केंद्रात दिले जाणार आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळात विविध चर्मवस्तू उत्पादित करुन शासकीय, निमशासकीय विभागांना त्यांचा पुरवठा करण्यात येतो. अनूसुचित जातीतील, चर्मकार समाजातील व्यक्तींचे जीवनमान उंचविणे आणि समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने या महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात.