मुंबई : देशातील रेल्वे वाहतूक जलद व्हावी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद गतीने पूर्ण व्हावा यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. ही तांत्रिक प्रगती साधत असताना 'मेक इन इंडिया' तत्वावर भारतीय उपकरण निर्मितीवर देखील भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागपूर डेपो येथे देशातील सर्वात शक्तिशाली इंजिन डब्लूएजी १२बी इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वीरित्या देखभाल केली जात आहे. भारतीय रेल्वेच्या या 'मेक इन इंडिया' प्रकल्पामुळे देशातील रेल्वे पायाभूत सुविधांसाठीच्या विकासात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह भर पडली आहे.
दरम्यान, मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन प्रायव्हेट लिमिटेड आणि शासकीय रेल्वे डेपो नागपूर यांच्यातील सार्वजनिक व खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल तत्त्वावर तत्वावर ब्लूएजी १२बी इलेक्ट्रिक इंजिनची देखभाल केली जाते. हा डेपो चार वर्षांच्या कालावधीत २५१ ते ५०० ई-इंजिन्सच्या ताफ्याच्या देखरेखीचे कार्य करेल. यामध्ये एलस्टमद्वारे तांत्रिक पर्यवेक्षण आणि भारतीय रेल्वेचे देखभाल/सहायक कर्मचारी पुरवले जातात.
अवजड मालवाहू गाड्यांचे चलन सुरक्षित आणि जलद
हे इंजिन जे पूर्णपणे इलेक्ट्रिक, उच्च-शक्तीचे, दुहेरी-विभागीय आहे. हे इंजिन अधिक कार्यक्षम आणि शाश्वत वाहतुकीसाठी योगदान देतील. मधेपुरा बिहार येथे या इंजिनची निर्मिती केली जाते. तर नागपूर येथे संचलन आणि देखभाल डेपो तयार करण्यात आला आहे. अवजड मालवाहू गाड्यांचे चलन सुरक्षित आणि जलद करण्याच्या दृष्टीकोनातून या इंजिनचे डिझाइन करण्यात आले आहे. हे इंजिन भारतातील सर्वात शक्तिशाली इंजिन आहे, जे देशाच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
नागपूर आगारात सध्या १२६ इंजिन्सची देखभाल
नागपूर आगारात सध्या १२६ डब्लूएजी १२बी इंजिन्सची देखभाल केली जात आहे. हा अत्याधुनिक पर्यावरणपूरक कारखाना जागतिक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शक्तिशाली इंजिनची निर्मिती करतो. १७.६ एकर जमिनीवर पसरलेली ही सुविधा डब्लूएजी १२ ची देखभाल क्षमता वाढवते. यातूनच भारतीय रेल्वेची पर्यावरणपूरक रेल्वे महाजालाच्या दिशेने पुढाकार घेत मध्य रेल्वेने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी स्वच्छ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे.