सुटकेसमध्ये आईचा मृतदेह! ५ हजार न दिल्याच्या रागात मुलानेच केला आईचा खून
15-Dec-2023
Total Views | 154
प्रयागराज : यूपीच्या प्रयागराजमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रयागराजमध्ये एक तरुण मोठी सुटकेस घेऊन फिरत होता. त्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला त्याच्यावर संशय आला. त्याची चौकशी केली असता तो घाबरला. सुटकेस उघडून पाहिल्यावर पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह होता. हा मृतदेह त्याच्या आईचा असल्याचे तरुणाने सांगितले. त्यानेच आईचा खून केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशू असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो मूळचा बिहारमधील गोपालगंज येथील आहे. हरियाणातील हिसारमध्ये त्याने आईची हत्या केली होती. हत्येनंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरून ट्रेनने प्रयागराजला आणला. तो आपल्या आईचा मृतदेह संगमात टाकण्यासाठी आला होता. मात्र पोलिसांची नजर त्याच्यावर पडली आणि तो पकडला गेला.
प्रकरणाची माहिती देताना, प्रयागराज पोलीस उपायुक्त दीपक भुकर यांनी सांगितले की, हिमांशूने त्याची आई प्रतिमा देवी यांच्याकडे ५,००० रुपये मागितले होते. जे आईने देण्यास नकार दिला होता. यानंतर रागाच्या भरात हिमांशूने आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह एका सुटकेसमध्ये टाकून तो ट्रेनने प्रयागराजला पोहोचला. हिमांशू सुटकेस घेऊन इकडे तिकडे फिरत होता, ते पाहून पोलिसांना संशय आला आणि त्याची चौकशी केली. पोलिसांनी सुटकेसमध्ये काय आहे असे विचारले असता तो गोंधळला आणि घाबरला. पोलिसांनी त्याला सुटकेस उघडण्यास सांगितल्यावर तो टाळाटाळ करू लागला. अखेर सुटकेस उघडल्यानंतर महिलेचा मृतदेह त्याच्या सुटकेसमधे सापडला. आईचा गळा दाबून खून केल्याचे आरोपीने कबूल केले. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी येथे आल्याचे ही त्याने स्पष्ट केले.