मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी २ चा विजेता एल्विश यादव सापांची तस्करी आणि विष पुरवल्याच्या प्रकरणामुळे अडचणीत आला आहे. एल्विशवर विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी नोएडा पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी एल्विशला समन्स पाठवले होते. त्यानंतर एल्विश नोएडा पोलिसांसमोर हजर झाला असून त्याची तब्बल ३ तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एल्विश मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री १२ च्या सुमारास पोलिस ठाण्यात हजर झाला आणि सुमारे दोन ते तीन तास त्याची चौकशी करण्यात आली. याबद्दल अधिक माहिती देताना नोएडाचे डीसीपी हरीश चंदर म्हणाले की, “पुन्हा एकदा एल्विशला बोलावून रेव्ह पार्टी प्रकरणीची देखील चौकशी केली जाणार आहे”.
काय आहे प्रकरण?
दि. ४ नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी सेक्टर ४९ मध्ये छापेमारी करत ९ जिवंत साप जप्त केले होते. या सापांपैकी ५ कोब्रा साप होते तर सोबत सापांचे विषही सापडले होते. याप्रसंगी पोलिसांनी ५ जणांना अटकही केली होती. यावेळी अटक केलेल्यांपैकी एकाने चौकशीदरम्यान एल्विश यादवचे नाव घेतले आणि त्यानंतर एल्विशवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एल्विशने सर्व आरोप फेटाळले असून या प्रकरणात पोलिसांना संपूर्ण सहकार्य देखील करणार असल्याची कबूली दिली आहे.