नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 'विकास भारत संकल्प यात्रे'च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही पंतप्रधानांनी सुरू केला. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी महिला किसान ड्रोन केंद्राचे उद्घाटनही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी यावेळी अरुणाचलमधील एका लाभार्थीशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पंतप्रधान आणि सरकारचे खूप कौतुक केले. घर बांधण्यासाठी सरकारने खूप मदत केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करून आता मलादेखील तुम्ही आशीर्वाद द्या, असे आवाहन केले.
विकसित भारताचा संकल्प एकट्या मोदींचा किंवा केवळ केंद्र सरकारचा नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सर्वांचा पाठिंबा घेऊन सर्वांची स्वप्ने साकार करण्याचा हा संकल्प आहे. विकास भारत संकल्प यात्रा अशा लोकांपर्यंत सरकारी योजना आणि सुविधा घेऊन जात आहे, जे आजवर त्यांच्यापासून वंचित राहिले होते. त्याचप्रमाणे विकसित भारताचा संकल्प स्त्रीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी बंधू-भगिनी, गरीब कुटुंबे या चार स्तंभांवर आधारित आहे. या चार स्तंभांच्या उत्थानानेच भारताचा विकास होईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.