"निर्माते एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत का?",मराठी निर्मात्यांवर पुष्कर जोग का संतापला?

    25-Nov-2023
Total Views | 19

pushkar sai 
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या दर आठवड्याला चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. मराठी चित्रपटांपुढे इतर भाषिक चित्रपटांशी स्पर्धा तर आहेच, पण एकाच तारखेला दोन अथवा तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याचे वाढते प्रमाण धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ या चित्रपटाची नुकतेच पोस्टर लॉंच झाले असून २ फेब्रुवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, याच दिवशी सिद्धार्थ चांदेकर आणि सई ताम्हणकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘श्री देवी प्रसन्न’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार असल्याचे जाहिर झाल्यामुळे पुष्कर जोग संतापला आहे. दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याच्या फटका भविष्यात मराठी चित्रपटसृष्टीला बसेल असे ठाम मत पुष्करने व्यक्त केले आहे.
 
‘महाएमटीबी’शी बोलताना पुष्कर जोग म्हणाला की, “२२ नोव्हेंबर रोजी मी माझ्या मुसाफिरा चित्रपटाचा पोस्टर लॉंच करत प्रदर्शनाची तारीख जाहिर केली होती. २ फेब्रुवारी २०२४ रोजी माझा ‘मुसाफिरा’ चित्रपट प्रदर्शित होणर असून त्या तारखेला इतर कोणता मराठी, हिंदी, दाक्षिणात्य किंवा हॉलिवूडचा चित्रपट प्रदर्शित होणार नाही ना याची खात्री करुनच मी ही तारीख निश्चित केली होती. मात्र. २३ नोव्हेंबर रोजी सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘श्री देवी प्रसन्न’ या चित्रपटाने २ फेब्रुवारी रोजीच त्यांचाही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची पोस्ट केली. आधी हा चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, ती देखील तारीख बदलून २ फेब्रुवारी करण्यात आली. मला वाईट या गोष्टीचं वाटत आहे की निर्माते एकमेकांशी संवाद न साधता मराठी चित्रपटांनाच का एकमेकांसमोर स्पर्धेसाठी उतरवतात. मी लवकरच ‘श्री देवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या निर्मात्यांशी संवाद साधणार असून प्रदर्शनाच्या तारखेबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे. आणि जर का असेच सुरु राहिले तर मराठी चित्रपटसृष्टीचे भवितव्य कठिण दिसत आहे”.
 
पुष्कर जोगने आपल्या सोशल मिडियावरही आपले मत मांडत लिहिले आहे की, “आम्ही ‘मुसाफिरा’च्या प्रदर्शनाची तारीख आधीच ठरवली होती आणि या (श्रीदेवी प्रसन्न) चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज जाहीर केली. निर्माते एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत का? एक फोन करा…मेसेज करा…पण यातंल काहीच करत नाहीत! बॉक्स ऑफिस क्लॅश होऊ नये म्हणून मी ३ महिने आधीच चित्रपटाची घोषणा केली होती. तरीही असं होणं हे अजिबात योग्य नाही. कृपया, तुमची रिलीज तारीख आधी किंवा पुढे शिफ्ट करा ही नम्र विनंती! या आधीच्या चित्रपटांच्या बाबतीत सुद्धा असेच झाले यामुळे कोणालाच फायदा होत नाही.”
 

pushkar post 
 
पुष्करने या पोस्टसोबत सिद्धार्थ-सईच्या चित्रपटाची २ फेब्रुवारी ही तारीख दर्शवणारं पहिले पोस्टर शेअर केले आहे. दरम्यान, यापूर्वी पुष्करला त्याच्या ‘बापमाणूस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी देखील ‘बापल्योक’ या चित्रपटाचा सामना करावा लागला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121