मुंबई : सध्या प्रेक्षक ओटीटी वाहिनीवरील आशयांकडे अधिक पसंती देताना दिसत आहेत. त्यातच नेटफ्लिक्सवरील मनी हाईस्ट या मुळ स्पॅनिश भाषेतील वेब मालिकेने तर जगभरातील प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना अक्षरश: वेडे केले होते. आतापर्यंत या मालिकेचे ५ भाग प्रदर्शित झाले आहेत. स्वत:कडे गमावण्यासाठी काहीच नसलेला एक प्रोफेसर वेगवेगळ्या क्षेत्रातील आठ जणांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो. या लक्षवेधी चोरीने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन ठेवले होते.
पाचवा सीझन संपल्यानंतरही मनी हेईस्ट पुन्हा येणार अशी चर्चा सुरू होती. कित्येक फॅन्सना या वेब मालिकेचा शेवट मान्य नव्हता. आता मात्र खरंच ‘मनी हाईस्ट’च्या चाहत्यांसाठी नेटफ्लिक्सने आनंदाची बातमी दिली आहे. नेटफ्लिक्सने या स्पिनऑफ सीरिजचं नवं पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे ‘मनी हाइस्ट’ व ‘बर्लिन’चे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. २९ डिसेंबरला ‘बर्लिन’ ही वेब मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे नेटफ्लिक्सने अधिकृतपणे जाहीर केले आहे. इतकंच नव्हे तर या सीरिजमध्ये केवळ बर्लिनच नाही तर त्याच्या कुटुंबाचीही गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार असल्याचे पोस्टवरुन दिसून येत आहे. हे पात्र अजरामर करणारा अभिनेता पेड्रो अलोन्सो हाच बर्लिनच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्याबरोबर इतरही बरीच नवी पात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत.