मणिपूर हिंसाचारामागे कॅनडातील खलिस्तान्यांचा हात; तपास यंत्रणांच्या हाती लागला महत्त्वपूर्ण व्हिडिओ

    02-Oct-2023
Total Views |
khalistani-manipur  
 
मुंबई : मणिपूर हिंसाचारामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर कुकी समुदायाच्या एका फुटीरवादी नेत्याने दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूसोबत बैठक घेतल्याचे पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर खलिस्तानी नेटवर्कच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हवालाद्वारे मणिपूरमधील दंगेखोरांना पाठवण्यात आले.
 
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील सरे येथील गुरुद्वारात आयोजित खलिस्तानी समर्थकांच्या बैठकीचा व्हिडिओ भारतीय यंत्रणांना मिळाला आहे. त्यात कुकी फुटीरतावादी नेता लीन गंगटेही आहे. गंगटे हे नॉर्थ अमेरिकन मणिपूर ट्रायबल असोसिएशन (एनएएमटीए) चा प्रमुख आहे. २ मिनिट २० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये गंगटे उपस्थित लोकांना संबोधित करत आहे.
 
कॅनडातील गुरुद्वारात आयोजित कार्यक्रमात गंगटे भारताच्या विरोधात गरळ ओकत आहे. आपल्या भाषणात तो म्हणाला की, "जसे तुम्ही लोक खलिस्तानची मागणी करत आहात, त्याचप्रमाणे आम्हीही वेगळ्या मणिपूरसाठी लढत आहोत. यावेळी, गुरुनानक गुरुद्वारा समिती, सरे यांच्या वतीने काही खलिस्तानी समर्थकांनी गंगटे यांना एकत्रितपणे भविष्यातील रणनीती आखण्याचे आश्वासन दिले.
 
काही दिवसांपूर्वीच दहशतवादी निज्जरच्या हत्येचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर लावला होता. तेव्हापासून दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. कॅनडा हा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण झाले आहे. असा आरोप भारताने केला आहे. त्यातच आता मणिपूर हिंसाचाराचे तार सुद्धा कॅनडासोबत जुळत आहेत. त्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये आणखी तणाव वाढण्याची चिन्ह आहेत.