मुंबई : अभिनेता मकरंद अनासपुरे आणि त्यांची टीम प्रेक्षकांना हसवायला पुन्हा येत आहे. कारण त्यांचा 'दे धक्का' या लोकप्रिय चित्रपटाचा पुढील भाग लवकरच प्रदर्शित होत आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी 'दे धक्का २' चाहत्यांना भेटायला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे. तर यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी त्याची निर्मिती केली आहे. आता चित्रपट प्रदर्शित व्हायला फक्त दोन दिवस बाकी आहेत.
महेश मांजरेकर यांनी ट्विट करून म्हटले आहे, 'खळखळून हास्याचा आनंद लुटायला तयार राहा. कारण २ दिवसांत आम्ही येतोय तुमच्या जवळच्या सिनेमागृहात. ५ ऑगस्टपासून 'दे धक्का २' तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!' असे म्हणत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरची लिंकही शेअर केली आहे.
'दे धक्का'ला जो प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर प्रेक्षकांनी 'दे धक्का २' देखील लवकर आणा अशी मागणी केली होती. त्यामुळे सर्वच प्रेक्षक 'दे धक्का २'ची प्रतिक्षा करत होते. आता ही प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम, संतोष खापरे, सिद्धार्थ जाधव आणि गौरी इंगावले यांची प्रमुख भूमिका आहे.