मुंबई : 'मै अपनी फेव्हरेट हू' म्हणणारी गीत म्हणजेच सर्वांची आवडती अभिनेत्री करीना कपूर. करिनाच्या कितीतरी भूमिकांवर लोकांनी प्रचंड प्रेम केले आहे. त्यातलीच एक 'जब वी मेट' मधली गीत. करिनाची ही भूमिका लोकांच्या मनात आणि डोक्यात एकदम फीट बसलेली आहे. पण करिना कपूरनं आपल्या गीतच्या भूमिकेविषयी आता काहीसं असं विधान केलंय की त्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.
करिना कपूर खानने 'जब वी मेट'मध्ये गीत हे पात्र अतिशय सुंदर साकारले होते. या सिनेमात करिना आणि शाहिदची पहिली भेट ही रेल्वेमध्ये झाल्याचे दाखवले आहे. करीनाने काही दिवसांपूर्वी विधान केले की 'जब वी मेट' मधील तिच्या भूमिकेनं भारतीय रेल्वेला भरपूर नफा मिळवून दिला आहे. करिना पुढे म्हणाली की, ''मी गीत साकारल्यानंतर, सिनेमात मी घातलेल्या 'हेरम' पॅंट्सची मागणी वाढली आणि भारतीय रेल्वेच्या महसूलात देखील वाढ झाली आहे''
'माझ्यामुळे रेल्वेचा नफा वाढला' हे तिचे वक्तव्य सध्या भलतंच चर्चेत आहे. तिने रेल्वेची खिल्ली उडवली आहे असे म्हणत बरेच लोक आता करिनाला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, 'करिना कपूरचं म्हणणं आहे की तिच्या 'जब वी मेट' मधील गीत व्यक्तिरेखेमुळे भारतीय रेल्वेच्या नफ्यात वाढ झाली आहे. ही प्रत्यक्ष परिस्थितीपासून किती दूर आहे आणि मग या कलाकारांना आश्चर्य वाटतं की लोक आपल्याशी कनेक्ट का होत नाहीत'.
करिनाचा चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. या सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, पण बॉयकॉट ट्रेन्डमुळे या सिनेमाचे बॉक्सऑफिसवर काही चालू शकले नाही.