नुपूर शर्मा समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी नागपूर उप शहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी!
18-Aug-2022
Total Views | 57
नागपूर: भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या शिवसेनेच्या नागपूर उप शहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स ग्रेगरी असे शिवसेनेच्या उपशहरप्रमुखाचे नाव असून ते नागपुरातील मोहननगर येथील रहिवासी आहेत.
१५ ऑगस्टच्या निमित्ताने फेसबुकवर स्टोरी पोस्ट केली असता, यात त्यांनी 'फ्रीडम ऑफ स्पीच' वर भाष्य केले होते. देशात जर खरोखरच फ्रीडम ऑफ स्पीच आहे तर मग नुपूर शर्माने काय चुकीचं वक्तव्य केले? असे त्यात लिहण्यात आले होते.
दरम्यान, लॉरेन्स यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने दगडाला कागद गुंडाळून फेकला. कागद उघडला असता त्यात लाल शाईने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स यांनी तातडीने शहरप्रमुख नितीन तिवारी यांना माहिती दिली.
तिवारी यांनी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संबंधित फोटो पाठविले. यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.