’बोमदिला’ या कादंबरीचे बीज आपल्याला नेमके कुठे सापडले?
’बोमदिला’ हा अरुणाचल प्रदेशमधील एक भाग. त्या प्रदेशातील ती एक छोटी खिंड- छोटे शहर. या ’बोमदिला’चे वैशिष्ट्य असे की, 1962 मध्ये भारत-चीन युद्ध झाले होते, तेव्हा बोमदिला खिंडीत लढत असताना भारताचा निर्णायक पराभव झाला होता. लोक नेहमी विजयावर लिहितात. मात्र, पराभवाची दखल फारशी घेतली जात नाही. पण, मला ही घटना समजल्यानंतर आणि तेथील एकंदर परिस्थिती बघितल्यावर असे जाणवले की, यावर आपण काही लिहायला हवे. एकदा प्रवासात असताना मला तिथे मूळचा कोल्हापूरचा असलेला एक श्रीकांत नावाचा जवान भेटला आणि आमच्या कोल्हापूरचा असल्यामुळे मला त्याच्याविषयी साहजिकच अधिक आत्मियता वाटली आणि त्याने प्रवासात मला जे काही सांगितले, ते मी माझ्या मनात टिपून ठेवले होते. मार्च ते जून दरम्यान कॉलेजला सुट्टी लागली की, माझी भारत भ्रमंती सुरू व्हायची. 1965 साली मी संपूर्ण अरुणाचल प्रदेश हिंडलो. विविध ठिकाणी म्हणजे अगदी हिमालय, गुजरात, महाराष्ट्रातही हिंडताना मला जाणवले की, येथील लोकांमध्ये विशेषतः सैनिकांमध्ये साम्यतेचा एक बिंदू जोडला गेला आहे आणि हे सगळं अनुभवताना मला ही कादंबरी सापडत गेली. त्यामुळे मी ही कादंबरी लिहायला घेतली, तेव्हा त्यातील पात्रांची नावे बदलली नाहीत. कारण, ही कादंबरी त्या बोमदिला भागातली आहे. त्यामुळे पात्रांची नावे- ठिकाणे तशीच असणे साहजिक होते. पण, सर्व घटना, पात्रे खरी असली तरी लेखक म्हणून थोडे स्वातंत्र्य घ्यावे लागते, ते फक्त घेतले आहे आणि त्यातून ही कादंबरी लिहिली गेली.
या कादंबरीची पार्श्वभूमी फक्त युद्धाची नाही, तर तो एक प्रत्यय आहे, असे आपण म्हणता. तेव्हा, हा नेमका कोणता प्रत्यय आहे?
1962 नंतर देखील भारताबरोबर शेजारी देशांची अनेक युद्धं झाली. त्या युद्धांमध्ये भारताच्या दृष्टीने मोठा फरक असा होता की, जसे ब्रिटिशांच्या काळात आधी सैनिक लढायला जात, पण त्यांचे वरिष्ठ प्रत्यक्ष युद्धात सहभागी होत नसत. तसेच 1962च्या युद्धापर्यंत इथेही काहीशी तशीच परिस्थिती होती. त्यामुळे फक्त सैनिक मारले जात होते. पण, यशवंतराव चव्हाण आल्यानंतर ही परिस्थिती बदलली. 1962च्या युद्धानंतर त्यावर आधारित अनेक पुस्तके प्रकाशित झाली. त्या पुस्तकांमध्ये त्या ऑफिसर्सना काय वाटले त्याचा समावेश होताच. परंतु, हे ऑफिसर्स प्रत्यक्ष युद्ध लढायला 12 हजार फूट वर गेले नव्हते. त्यामुळे वर लढताना खरी परिस्थिती काय होती, त्यांना लढताना ‘कॅनव्हास’चे बूट होते, जे सैन्यात अपेक्षित असतात ते बूट नव्हते - अशा ज्या उणिवा होत्या, त्या प्रत्यक्ष अधिकार्यांनी अनुभवल्या नव्हत्या. हा फरक ’बोमदिला’ मध्ये वाचायला मिळेल. त्या काळात जे साहित्य प्रसिद्ध झाले, ते अधिकार्यांच्या दृष्टिकोनातून होते, त्यात सैनिकांचा दृष्टिकोन कुठेही नव्हता. त्यांच्या अनुभवाची दखल फारशी कोणी घेतही नाही. कोणी विचारलेच, तर ते गाडीच्या प्रवासापुरते मर्यादित राहते. पण, माझ्या कादंबरीत 1965 पूर्वीची परिस्थिती, 1965 पर्यंतची परिस्थिती आणि त्या नंतरची परिस्थिती मी दाखवली आहे.
‘बोमदिला’ या मूळ हिंदी भाषेतील कादंबरीचा पुढे इतर भाषांमध्ये अनुवाद कसा होत गेला?
ही कादंबरी म्हणजे मुळात अनुभव आहे. मला भेटलेल्या त्या मित्राचे अनुभव आहेत आणि मुळात ही सर्व घटना युद्धातील आहे. विविध प्रांतातील जवान सीमेवर असतात. त्यामुळे तेथील भाषा ही सामान्यपणे हिंदीच असते. त्यामुळे संवाददेखील हिंदीतच होते. म्हणून मला ही कादंबरी मूळ हिंदी भाषेत लिहू, असे वाटले आणि मी ती लिहिली आणि नंतर पुण्यात अनेकांना मी ती दाखवली. परंतु, अनेकांचे म्हणणे पडले की, हिंदीत कादंबरी नको, त्याला फारसे वाचक नाहीत. पण, मी मात्र ठाम होतो. कारण, महाराष्ट्रात हिंदी येत नाही, असे कोणीच नाही. लिपीदेखील देवनागरीच आहे. पण, मला नंतर ‘कॉन्टिनेंटल’चे प्रेक्षक भेटले. ते म्हणाले, ‘’तुम्ही जर ही कादंबरी मराठी भाषेत लिहिली, तर मी छापेन. फक्त एक अट आहे, मूळ हिंदी कादंबरी खूप मोठी आहे आणि तुम्ही लेखक म्हणून प्रसिद्ध आहात, कादंबरीकार म्हणून नाही. त्यामुळे ती कमीत कमी शब्दांत बसवून द्या.” मलाही ते पटले आणि मुळात हे मराठी भाषेत आले असले तरी ते भाषांतर नाही, कथा माझीच आहे. परंतु, त्यातील उपकथानके वगळून मी त्यांना मूळ साच्यात बसवले आहे. म्हणजे जरी काही मजकूर कमी केला, तरी त्याच्या गाभ्याला धक्का लागू न देणे ही जबाबदारी आहे, असे करून मी संपूर्ण स्वतंत्रपणे ही कादंबरी लिहिली आणि ती 1995 साली प्रकाशित झाली. त्यानंतर मुळचे मुंबईचे, परंतु निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले हिंदी विषयाचे प्रा. साठे माझ्या परिचयाचे होते. ते मला म्हणाले, ‘’माझे दिल्लीचे एक मित्र आहेत, त्यांचा दिल्लीत प्रकाशन व्यवसाय आहे ’विद्या प्रकाशन मंदिर.’ ते मला भेटायला येत आहेत. तुम्ही त्यांची भेट घ्या. मला ही कल्पना आवडली. मी त्यांना माझी मराठी व हिंदी अशा दोन्ही प्रती दाखवल्या. ते म्हणाले की, “मराठीपेक्षा हिंदी दीर्घ आहे. आपण मराठीच घेऊया” आणि त्यांनी स्वतः माझे पुस्तक प्रकाशित केले.
काहीच दिवसांत मला धारवाडच्या रश्मी शिरहट्टी यांचा फोन आला, त्यांनी माझे मराठी पुस्तक वाचले आणि त्यांनी कन्नड भाषेत भाषांतर करण्यासाठी त्यांनी मला पत्र पाठवले आणि ‘बोमदिला’ कन्नड भाषेतदेखील आली. काही दिवसांनी कामानिमित्त मला बिहारमध्ये जावे लागले होते. तेव्हा मी माझ्या हिंदीतील काही प्रती तिथे घेऊन गेलो होतो आणि तेथील प्रकाशकाची भेट घेतली आणि त्यांनी लगेचच मला अपेक्षित अशी हिंदी कादंबरी पटनाच्या प्रकाशकांनी प्रकाशित करून दिली. ही जेव्हा ‘विद्या मंदिर प्रकाशना’नेच प्रकाशित केली होती तेव्हा मला दिल्ली, हरियाणा आणि विविध भागांतून वाचकांनी फोन करून प्रतिक्रिया दिल्या. म्हणजे जेव्हा आपल्याला 50 पत्रं येतात, तेव्हा 500 वाचकांना ते लिहावेसे वाटते आणि म्हणजे पुस्तक किमान हजार वाचकांच्या हातात आलेले असते. असेच एका उत्तर आसाममधील प्राध्यपकांनी ही कादंबरी वाचली आणि स्वतः साधारण त्या भागातले असल्यामुळे आणि हिंदीभाषिक असल्यामुळे त्यांना ती भावली आणि त्यांना वाटले, ही कादंबरी आसामी भाषेत यायला हवी. संपूर्ण शिक्षण, बालपण हे आसामी भाषेत झाल्यामुळे त्यांनी लगेचच माझी परवानगी घेऊन त्याचे आसामी भाषेत भाषांतर केले. असेच संस्कृत भाषेतसुद्धा या कादंबरीचे भाषांतर झाले. त्याचबरोबर गुजरातीच्या प्राध्यापिका प्रतिभा दवे गुजराती भाषेत आणि गुवाहाटीचा माझा मित्र अलीन्द्र ब्रह्म यांनी नुकतेच आसाममधल्या ’बोडो’ या बोलीभाषेतही या पुस्तकाचे भाषांतर केले.
इतर भाषांमध्ये या कादंबरीचा अनुवाद होताना, आपण रेखाटलेल्या पात्रांना, कथानकाला योग्य न्याय मिळाला का?
इतर भाषांमध्ये माझा फारसा अभ्यास नसल्यामुळे त्या मी वाचू शकलो नाही. परंतु, संस्कृत भाषेत अनुवादित कादंबरी मी आवर्जून वाचली आणि मला एक आनंद झाला की, त्या लेखकाने पारंपरिक संस्कृत भाषा वापरली होती. गुजरातीदेखील मी वाचली. कन्नड मला तितकेसे वाचता येत नाही. परंतु, मी ती वाचण्याचा प्रयत्न केला. आसामीतील कादंबरी मी वाचली नाही, पण ऐकली आहे. माझ्या एका मित्राने मला ती वाचून दाखवली आहे. या सर्व प्रक्रियेत मला आनंद झाला की, सर्वांनीच अभ्यासपूर्ण पद्धतीनेस या पुस्तकाचे लेखन केले आहे आणि लेखक म्हणून आणखी आनंदाची गोष्ट म्हणजे, या सर्व पुस्तकांचे भाषांतर कोणा संस्थेने केले नसून वाचकांनीच पुढाकार घेऊन केले आहेत. कादंबरीचे भाषांतर करावेसे वाटणे आणि ते प्रत्यक्ष करणे, यात खूप मोठा फरक आहे. परंतु, त्यांनी तो मिटवला!
जर्मन भाषेचे प्राध्यापक आणि अभ्यासक म्हणून आपली ’बोमदिला’ जर्मन भाषेत अनुवादित करण्याचा मानस आहे का?
बंगाली भाषेतसुद्धा ‘बोमदिला’ कादंबरी अनुवादित झाली आहे. बंगालीची गंमत अशी की, बंगालीतून अनेक साहित्य आपल्याकडे आले आहे. पण, आपले साहित्य त्यांच्या भाषेत फारसे जात नाही. कारण, कुठेतरी ’अहं’ हे कारण असू शकते. कारण, ‘आमच्याकडे सर्व आहे’ ही भावना त्यांच्या मनात रूढ आहे, असाच अनुभव माझा जर्मन बाबतीत आहे. असेच मी एकदा ’ययाती’चे भाषांतर करायला सुरुवात केली, तेव्हा अनेक प्रकाशकांशी चर्चा केली. दिल्लीतील दुतावासामध्ये गेलो होतो. तेथील सांस्कृतिक अधिकार्यांची भेट घेतली. त्या बाईंविषयी मला विलक्षण आदर वाटला. त्यांना मी माझा मानस सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या, “तुम्ही या भानगडीत पडू नका. बंगालीप्रमाणे जर्मन भाषेचेसुद्धा आहे. तुम्ही कितीही उत्तम लिहिले तरी जर्मन भाषेत कोणी प्रकाशित करणार नाही. तुम्ही जर्मनमधून मराठीत करा. पण, मराठीतून जर्मनमध्ये काही करण्याची आवश्यकता नाही” आणि हा अनुभव, ही वाक्ये मला अनेक ठिकाणी सुचवण्यात आली होती. त्यांच्यातही अशीच अहंभावना आहे. त्यामुळे मी कष्टाने लिहिलं, तर कोणी छापणार नाही आणि मी स्वतःच छापले, तर कोणी ते वाचणार नाही; त्यापेक्षा असा एक दिवस येईल जेव्हा, ते स्वतः हिंदी शिकतील आणि मूळ हिंदीच पुस्तक वाचतील, अशी माझी जास्त इच्छा आहे आणि जाता जाता एक सांगायला आवडेल. किंबहुना, अभिमानाची गोष्ट आहे ही की, मला स्वीडन, जर्मनी, फ्रान्ससारख्या देशांतील सैनिकांशी बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा मला, त्या सैनिकांची सैन्यात भरती होण्याची कल्पना, त्यांचे विचार, इंजिनिअर होण्यापेक्षा सैन्यात जाऊया, असे विचार करणारे ते आणि त्याचवेळी भारतीय आपल्या मातृभूमीसाठी, बलिदान देण्याच्या, तिचे रक्षण करण्याच्या ध्येयाने सैन्यात दाखल होणारे सैनिका, हा फरक मला जाणवला आणि कुठेतरी या धाग्यांना ही कादंबरी जोडली गेली आहे, याचा मला आनंद आहे.
डॉ. अविनाश बिनीवाले यांचा अल्पपरिचय
डॉ. अविनाश बिनीवाले हे भाषाभ्यासक आहेत. त्यांचा जन्म दि. 12 मार्च, 1943 रोजी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बिनीवाले यांनी जर्मन व संस्कृत भाषेत पदवी मिळवली. हैदराबादच्या ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अॅन्ड फॉरेन लँग्वेजेस’ मधून परदेशी भाषा म्हणून ‘जर्मन भाषेचे अध्यापन’ या विषयातली पदविका त्यांनी प्राप्त केली आहे. मराठीच्या जोडीने संस्कृत, हिंदी, गुजराती, बंगाली, सिंधी, आसामी या भारतीय भाषा बिनीवाले यांना अवगत आहेत. एवढेच नाही, तर जर्मन, फ्रेंच, रशियन, इंग्रजी या भाषांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी जर्मन भाषेचे अध्यापन केले असून याच महाविद्यालयातून जर्मन-विभागाचे विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले.
पुरस्कार आणि सन्मान
डॉ. अविनाश बिनीवाले यांना भाषाविषयक कारकिर्दीसाठी ’कोमसाप’ तसेच ‘हिंदी साहित्य अकादमी’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भाषाविषयक, भाषाशिक्षणासंदर्भात-तसेच ‘गरुडाच्या देशात’, ‘पूर्वांचल’ अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत आणि अशा अनेक पुस्तकांपैकीच गाजलेले आणि ज्या पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे, ते पुस्तक म्हणजे ’बोमदिला.’