'एका लग्नाची पुढची गोष्ट'चा रंगला ५०० वा महोत्सवी प्रयोग

    30-May-2022
Total Views | 75

nataik
 
 
'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा ५०० वा हाऊसफुल्ल प्रयोग रविवार, २९ मे रोजी दीनानाथ नाट्यगृहात मोठ्या उत्साहात रंगला. या महोत्सवी प्रयोगाचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख त्यांच्या मातोश्रींसह उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, गौरी दामले, संजय मोने, आशिष शेलार आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
अशोक सराफ यांच्या वयाची पंच्याहत्तरी आणि त्यांच्या कारकिर्दीला झालेल्या ५० वर्षांचे औचित्य साधून त्यांचा विशेष सत्कार सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. या नाटकाशी संबंधित सर्वांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांनी त्यांच्या सडेतोड भाषणाने रंगत आणली. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकात प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे यांनी भूमिका साकारल्या. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचे होते. अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले होते. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य व किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली.
 
 
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशांत दामले म्हणतात, 'वास्तविक २०२० मध्येच आमच्या या नाटकाचा ५०० वा प्रयोग होणार होता; पण कोरोनामुळे मराठी नाट्यसृष्टी मागे ढकलली गेली. परंतु आता दोन वर्षांनी का होईना, पण आमच्या नाटकाचा ५०० वा प्रयोग होत आहे याचा आनंद वाटतो. या निमित्ताने अनेक वर्षांनी कुठल्यातरी मराठी नाटकाचा ५०० वा प्रयोग झाला आहे.
 
 
 
 
मराठी नाटकात काम करण्याचीच माझी पहिल्यापासून इच्छा होती. १९८३ मध्ये मी प्रथम 'टूरटूर' मध्ये गायलो; तेव्हा माझा आवाज बरा आहे हे कळले. त्यानंतर १९८५ मध्ये 'मोरूची मावशी' नाटकात गायलो. अशोक पत्की यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मी बऱ्याच नाटकांत गायलो. अभिनेता होण्याच्या आधी, गायक व्हायची माझी इच्छा होती. त्यामुळे माझा सगळा फोकस गाण्यांवर होता. कलाकार व तंत्रज्ञ जेव्हा एकमेकांच्या चुका झाकत काम करत असतात, तेव्हा ते नाटक चांगले होत असते, यशस्वी होत असते.
 
 
 
मी एकमेव असा गायक कलाकार असेन, की ज्याने अशोक पत्की यांच्याकडे ६३ गाणी गायली आहेत. मी गायक नसूनही इतकी गाणी त्यांच्याकडे गायली आहेत आणि त्यांनी माझा गळा गाता ठेवला.आम्हाला पैसे नकोत, पण आम्हाला आजपर्यंत शासनाने व महानगरपालिकेने जी मदत केली, तीच मदत डिसेंबर २०२३ पर्यंत द्यावी असे मला वाटते. आम्ही नाट्यनिर्माते किंवा कलाकार खूप मेहनत करतो. शासनाकडून निदान इतकी मदत मिळाली तरी आम्हाला उत्साह वाटतो.
 
 
 nataik
 
 
तर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख या नाटकाच्या निमित्ताने म्हणतात, 'जागतिक दर्जाचे नाटक काय असते, जागतिक दर्जाचा अभिनय काय असतो, हे इथे आल्यावर कळते असे मी म्हणालो तर ते चुकीचे ठरणार नाही. मराठी नाटकांची बातच काही और आहे. सर्वच सरकारे आतापर्यंत नाट्यक्षेत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहेत. आजही सरकारकडून आपल्या अपेक्षा असतील, त्या आपण मांडा. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही मी आपल्याला या निमित्ताने देतो. पक्ष कोणताही असो, पण संस्कृती, साहित्य, नाट्य, चित्रपट, कला, संगीत याच्याशी सगळ्याच पक्षातील सर्वजणांची नाळ नेहमीच जुळलेली आहे.'
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121