मुंबई : थेट संपर्क साधल्याने सौहार्दाच्या भूमिकेतून उत्तर प्रदेशामध्ये एक लाखांहून अधिक मंदिर व मशिदींमधून भोंगे हटवले गेल्याबद्दल माजी राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले.
योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्रिपदाची दुसरी कारकिर्द सुरू झाल्यानंतर सोमवार, दि. ९ मे रोजी मुख्यमंत्री निवासस्थानी राम नाईक यांना योगी आदित्यनाथ यांनी निमंत्रित केले होते. नवीन कारकिर्द सुरू झाल्यानंतर केलेल्या विविध कामांची संक्षिप्त माहिती राम नाईक यांना यावेळी योगी यांनी दिली. तेव्हा, परस्पर चर्चा विनिमय करून मंदिर, मशिदींमधून एक लाखांहून अधिक भोंगे हटवले, हे ऐकून राम नाईक विशेष प्रसन्न झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
पत्रकार तसेच ‘अवधनामा’चे संपादक वकार रिजवी यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे पुस्तक ‘मेरा नज़रिया, मेरी बात’ याचे प्रकाशन करण्यासाठी राम नाईक लखनौला आले होते. राम नाईक यांचे पुस्तक ‘चरैवेति! चरैवेति!!’च्या विविध भाषांतील अनुवादांवर तसेच, उर्दू साहित्यकार, समीक्षक यांचे लेख यातून साकार झालेल्या ‘कर्मयोद्धा राम नाईक’ पुस्तकाची मूळ संकल्पना वकार रिजवी यांचीच होती. पुस्तक जवळ-जवळ तयार झाले आणि गेल्या वर्षी दि. १० मे रोजी वकार रिजवी यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर नुकतेच त्यांना समर्पित केलेले हे पुस्तक प्रकाशित झाले. वकार रिजवी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून देशवासीयांतील एकता व बंधुत्व निरंतर वाढावे, यासाठी कार्यरत राहिले. उर्दूला प्रोत्साहन देण्याबरोबरच सर्वंकष शिक्षणासाठीही ते आग्रही होते. त्यांचे हेच विचार मांडणार्या काही निवडक संपादकीयांचा संग्रह राम नाईक यांच्या हस्ते रविवारी प्रकाशित झाला. तसेच, ‘अवधनामा फाऊंडेशन’तर्फे वकार रिजवी यांच्या स्मरणार्थ राम नाईक यांच्या हस्ते दोन विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्तीही देण्यात आल्या.