अभिजात विनोदी साहित्याच्या प्रवाहात आजचे आघाडीचे लेखक म्हणून डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी ओळखले जातात. ‘गिरकी’, ‘उसंतवाणी’, ‘थट्टा मस्करी’ या त्यांच्या विनोदी साहित्यकृतीनी चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे प्रभृतींची उणीव बर्याच अंशी भरून काढली आहे.
वर्तमानातील विसंगती टिपण्याचे अजोड कौशल्य, प्रसन्नशैली, व्यासंग, जीवनावर भरभरून प्रेम करण्याची आणि ते समरसतेने जगण्याची मूलभूतवृत्ती, लेखनामागील सुस्पष्ट भूमिका या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे विनोदी लेखन महाराष्ट्राच्या पसंतीस उतरले. याच मालेत समाविष्ट होणारे त्यांचे ताजे पुस्तक ‘पत्नीपुराण’ ‘पद्मगंधा प्रकाशना’ने वाचकदरबारी रुजू केले आहे. यापूर्वीच्या ‘थट्टामस्करी’ या साहित्य कृतीतून विशुद्ध विनोदी लेखनाची भूमिका होती, ‘पत्नीपुराणा’तून विनोदासह कौटुंबिक ऋतुचक्र, ऋतुचक्राशी मानवी भावनांचा अनुबंध, कुटुंब संस्कृतीतल्या विचार-विकारांची सांस्कृतिक चिकित्सा, असे बरेच काही येते. या पुराणाचा आशय तमाम मराठी साहित्यास अस्पर्शित आहे. ऋतुचक्र, मराठी सण उत्सव या संदर्भाने दुर्गा भागवत, द. ता. भोसले, विश्वकोश, संस्कृतिकोश यांच्याद्वारा माहिती दिली गेली असली तरी त्यांचा अनुबंध कुटुंब प्रेमाशी अर्थात पत्नीप्रेमाशी लावून दाखवणारे या प्रवाहातील पहिले पुस्तक आहे.
नर्म खुसखुशीत विनोद या संपूर्ण पुराणाच्या अंतरंगाचे पृथगात्म वैशिष्ट्य. केवळ पत्नीशरण असणार्या वाचकांसाठी ही अर्पणपत्रिकाच त्याचे सूतोवाच करते. ‘आमच्या माहितीप्रमाणे ते तमाम उरलेल्या मराठी वाचकांचे आवडते लेखक होते.’ (पृ.११) लग्नाआधी उपवर कन्या हे साध्या उन्हाळ्याचे प्रतीक असते (पृ.१३). नोकरदारांना मार्च अखेरीस झालेल्या काल्पनिक लक्ष्यपूर्तीच्या अजीर्णावर लंघन करायचे असते (पृ.१४). पोरकट भार्यासूक्त (पृ.१५) आमच्या काळातल्या राधेला ती आमची रुक्मिणी झाली तरी आम्ही तिला ‘आय लव्ह यू’ म्हणू शकलो नव्हतो, ही सल घेऊनच आम्ही जगत असतो.
(पृ.२६). पुण्यात वास्तव्याला असल्याने गावी सोयर्यांकडे गेलो, तर नंतर ते पुण्यात येण्याची शक्यता खूपच बळावते (पृ.३३). तिच्या (पत्नीच्या) वचकामुळे सरळमार्गी बनतात. तिच्या धाकामुळे नीतिमत्ता बाळगतात. आपापल्या पत्नीच्या नजरेतील जरबेमुळे अनेकजण अंगी नम्रताही भिनवून घेतात (पृ.७३). हे घरोघरचे वास्तव खुसखुशीत विनोदी शैलीतून डॉ. तांबोळी मांडतात. ‘वडाच्या आत्मकथनातून’ पिढ्यान्पिढ्या कायमची एवढी बारीक बायको हे शोभतं काय? (पृ.३५) दुर्वेशी वडाचे लग्न लावले जाते, या पौराणिक घटनेच्या अनुषंगाने हे खास खुसखुशीत विनोदी आत्मगुज आहे. श्रावणातली मद्यमांस वर्ज्यता ‘ही खरे तर एक प्रकारे सार्या मेंढ्या बकर्यांना कृतज्ञतेने दिलेली मानवंदनाच होय.
(पृ.५९), असे लेखक म्हणतो तेव्हा वाचकही आतल्या आत खळखळून हसतो. श्रावणातल्या पवित्रतेच्या नादी लागलेली पत्नी या काळात पतीस्पर्श झिडकारते तेव्हा‘असे पती मात्र आपल्या हक्काच्या बायकोकडून झालेल्या अपमानामुळे अंगाला राख फासण्याच्या निर्णयाला प्रतिकात्मकरित्या दाढी वाढवून आपला त्रागा व्यक्त करीत राहतात.’ (पृ.६०) चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यात अचानक जन्मदर वाढल्याचे खात्रीलायक दस्तऐवज गेल्या अर्धशतकापासून भारतीय इतिहास संशोधकांच्या रुमालात आकडेवारीसह ठेवण्यात आले आहेत.
(पृ.६८) भाद्रपदात काम भावनेने चेकाळलेली कुत्री जे काही ओरडतात, त्यांना हिंदी चित्रपटातील ‘प्रेमार्त गाणी’ असे विनोदी अंगाने डॉ. तांबोळी संबोधतात (पृ.७०). बळी प्रतिपदेस ‘बळी पती प्रथा’ असे नामकरण करून त्या दिवशी पत्नीने पतीस ओवाळणे म्हणजे सर्वश्रेष्ठ उपहासाचे प्रतीक आहे की काय, याचा शोध भीतीपोटीच कोणीही घेतलेला नाही (पृ.६०). ‘हे अतिशय खर्चिक ओवाळून घेणे म्हणायला हवे.
कारण, या ओवाळणीत बोनस, महागाई भत्ता, बचत हे सारे स्वाहा होत असते (पृ.६०). खलवृत्तीच्या लोकांनाही आपली मुले सदगृहस्थ व्हावी असे वाटते. ‘या जाणिवेमागचे खरे कारण म्हणजे त्यांना आयुष्याला स्थैर्य देणारे कौटुंबिक जीवनशैलीचे महत्त्व मान्य असते. सार्या मानव जातीला हे महत्त्व मान्य आहे. म्हणूनच कुटुंबवेड शाश्वत आहे. (पृ.३१) हे चिंतनस्थळ आहे. विनोदापलीकडे जात, कुटुंबसंस्थेचे महत्त्व अधोरेखित करण्याचा डॉ. तांबोळींचा प्रयत्न येथे दृगोचर होतो.
पत्नीआज्ञाप्रमाण जीवनशैलीच्या अंगिकारास कोणता प्रसंग कारणीभूत ठरला (पृ.३८) जो तो सत्यवान त्याच्या सावित्रीचा गुलाम का असतो ? (पृ.३९) या प्रश्नांची उत्तरे म्हणजे ‘पत्नीपुराणा’चा आणखी एक सारांश. ’पत्नीच्या लाभयोगात रोजच हे घडतं की, दिवसभर नवरा ऑफिसात, बाळ बालवाडीत तर ही फेसबुक चॅटिंगवर, वामकुक्षी बोनसमध्ये आणि ऑनलाईन कोणी भलताच आवडता’ (पृ.४२) हा ‘पत्नीपुराणा’चा आणखी एक पैलू. घरोघरीची सर्वमान्य सत्ये हेदेखील या पुराणाच्या सारांशातून अधोरेखित होते. ‘प्रत्येक गृहयुद्धाची परिणती पतीपराभवाने होत असते आणि त्याने माफी मागितली की, पत्नी क्षमा करते. प्रत्येक युद्धाच्या अखेरीस तिने अश्रुरुपी मदनबाण मारून, असे युद्ध जिंकलेले तो पाहात असता, तर प्रत्येक कौटुंबिक तहानंतर ती रातराणीसारखी फुललेली असते. ’(पृ.३२) ही गृहसत्ये, पत्नीसत्ये ठळक करण्यासाठी हा ‘पत्नीपुराणा’चा प्रपंच आहे. वडाची पूजासारखे ‘जुनाट थेर त्या करणार नाहीत, त्या २०-२५ वर्षे या लग्नाचा अनुभव घेणार आहेत. यात सुखे आढळली, तर पुढे केवळ एक जन्मासाठी विचार करणार’ (पृ.३९) असा परंपरावेगळा विचार करणारी पत्नीही या पुराणातच भेटते.
या ‘पत्नीपुराणा’चा सारांश अनेकांगी आहे. कुटुंबसंस्थेच्या संवर्धनाची कळकळ, ऋतुचक्र आणि मानवी भावनांचा अनुबंध, सांस्कृतिक धारणा आणि निसर्गाचा अनुबंध, कुटुंबातील पतीपत्नी या नात्याचे आणि पत्नी या घटकाचे कुटुंबातील अनन्यसाधारण स्थान अशी बहुकेंद्री वीण येथे आढळते. विवाहामुळे नवरे शांतताप्रिय, समन्वयवादी सदगृहस्थ होतात, यामुळे एकूण समाज शांतताप्रिय वगैरे होतो. यामागील मूळ तत्त्व पत्नीचा गृहप्रवेश होय. (पृ. ३१) पत्नीने पतीला सातच काय ७० जन्म आरक्षित करून ठेवल्याची कारणे ‘तुमच्यासारख्या पत्नीभक्ती परायण्, आज्ञाधारक, सर्व गृहकार्यप्रवीण पती आम्हाला लाभल्याने आमची दुपारची झोप, संध्याकाळचा फेरफटका, रात्रीचे चॅनेलवॉच, मोबाईलवर नेटप्लिक्स हे फारच समाधानकारक होत आहे. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची फुटकळ कार्येही आपणच करीत आहात. कष्टार्जित उत्पन्नाचे नियोजन आम्हाला करायला लावत आहात,असे भाग्य मिळवणार्या त्या एकमेव असल्याचा त्यांचा निष्कर्ष असल्याने त्यांनी आम्हाला ७० जन्मे बुक करून टाकले म्हणे’ (पृ. ३६) हा ‘पत्नीपुराणा’चा अवशिष्ट सारांश होय.
पंढरीच्या वारीमागचे तत्त्वज्ञान कुटुंबप्रेमाशी कसे निगडित आहे, ते ही या पुराणात सांगितले आहे. वारी परंपरेचा नवा, कौटुंबिक अन्वयार्थ डॉ. तांबोळी लावतात. विशुद्ध विनोदात ओतप्रोत भिजलेले तर्क या पुराणात डॉ. तांबोळी मांडतात. भार्याने आपल्या पतीकडे वाईट नजरेने पाहणे (पृ.६६) या मागील तर्क, तर कमालच आहे.
भार्येचे ऋतुउत्पन्न सामर्थ्य नियंत्रित करायचे उपाय (पृ.७९) ‘बळी पती प्रथे’च्या संदर्भातील आधुनिक भार्येची तीन पाऊले (पृ.८५) मार्गशीर्षासंदर्भाने आलेले गंभीर चिंतन (पृ.९८ ते ९९) पौष महिन्याचे कौटुंबिक संदर्भ (पृ.१०२) ‘व्हॅलेंटाईन डे’ संदर्भातील चिंतन (पृ.११३) ही स्थळे मुळाबरहुकूम वाचण्याची नितांत गरज आहे. ‘पत्नीपुराणा’चे विविध आयाम समजून घेण्यासाठी आणि पत्नीशास्त्रात पारंगत होण्यासाठी ते आवश्यक आहे.
डॉ. तांबोळी त्यांच्या पौराणिक व्यासंगाची निदर्शक अशी स्थळे पानापानावर आहेत. पौराणिक घटना प्रसंग, त्यांचा ऋतू,नक्षत्रांशी असणारा संबंध, पुराण नायक, ऐतिहासिक राजघराणी, विविध महिन्यांचे संकेत व त्यांचा पुराणसंदर्भ यांची रेलचेल या ‘पत्नीपुराणात’ आहे. ‘संदर्भविहीन न बोलणे काही’ अशी ही लेखन वृत्ती आहे. ऋतुचक्र, महिना, नक्षत्र यांच्याशी असलेला मानवी भावनांचा मेळ या ‘पत्नीपुराणा’चे मध्यवर्ती सूत्र आहे. ऋतुचक्रांच्या संदर्भात डॉ. तांबोळी कल्पनेच्या, तर्काच्या मिश्किल रांगोळ्याही काढतात.
भाषाशैलीच्या अंगानेही हे ‘पत्नीपुराण’ रम्य आहे. ललितगद्यास अनुरुप अशी ही लेखनशैली आहे. ‘हृदयात कोकीळेचे कूजन सुरू होते आणि आसमंतात आम्रवृक्षाच्या मोहोरगंधाचा भास त्याला होत राहतो’ (पृ.२०) अंगाखांद्यावर रुपाची, नादाची, सुगंधाची सौंदर्यचिन्हे धारण करणारा वैशाख तेव्हा जाई, जुई, मोगरा यांचा गंध आसमंतात दरवळून टाकत वसंत ऋतूच्या साफल्याकडे झेपावत होता (पृ.२१) आमच्या घराला तोरण लागले आणि पुढे त्यांनी आमच्या संसाररुपी शिंपल्यात त्यांच्या ’पायगुणाने सौख्याचे मोती भरले बघा’ (पृ.२२) ही ती ललितरम्यतेची स्थळे होत. सर्व सर्गांची शीर्षके अनुप्रासाची लय ल्यालेली आहेत. चैत्रचातुर्य, भानगडींचा भाद्रपद, पाणचटलेला पौष इ. कफ म्हणजे कर्मफळ आणि वात म्हणजे वागण्यामुळे तणाव ही शब्दरंजनाची स्थळे आहेत.
काही दोषस्थळेही या पुराणात आढळतात. या पुराणातून कोकिळमास आणि अधिकमास येत नाहीत, ते परिशिष्टात द्यायला हवे होते. हे किरकोळ दोष वगळता पत्नीपुराण केवळ विनोद म्हणूनच नव्हे, तर भार्याशास्त्र, कुटुंब संस्कृतीची चिकित्सा, ऋतुचक्रामागील निसर्गविज्ञान या अंगाने मराठी ललित साहित्याची समृद्धिकक्षा निश्चितच वाढवणारे आहे यात शंका नाही.
पुस्तकाचे नाव : पत्नीपुराण
लेखकाचे नाव : डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशना
पृष्ठसंख्या : १३२
मूल्य : १८० रु.
- डॉ. फुला बागूल
९४२०६०५२०८