मुंबई : कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांचा काल (१ एप्रिल) मृत्यू झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता.
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, तेथे आपण हजर होतो असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत त्याने मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारदेखील केली होती. तसेच किरण गोसावी यांचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईल याने मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरदेखील काही गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आल्याचा दावा देखील त्याने केला होता.