मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एकामागोमाग एक अशा तब्बल १४ ट्विट्सचा भडिमार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एका ‘ट्विट थ्रेड’च्या माध्यमातून फडणवीसांनी शरद पवार यांनी वेगवगेळ्या विषयांवर केलेले भाष्य आणि त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत त्यांना ‘आरसा’ दाखवला.
‘कलम ३७०’वरून निशाणा
“एकीकडे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार्या ‘कलम ३७०’ त्यांनी विरोध केला. पण, या मूल्यांविरोधात काय बोलले गेले पाहा,” असे ट्विट करून शरद पवारांच्या एका वक्तव्याचा संदर्भ फडणवीस यांनी घेतला. “ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पण, शरद पवार म्हणाले आहेत, की, ती अजित पवारांची भूमिका आहे पण पक्षाची नाही. शरद पवारांच्या एकंदरीत भूमिका आणि विविध परिस्थितींमध्ये स्वीकारलेले मार्ग हे डॉ. आंबेडकरांच्या भारतात स्वीकारले जाऊ शकत नाहीत”.
‘द काश्मीर फाईल्स’वरून सुनावले
“आम्ही ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाबाबत शरद पवार यांची विविध वक्तव्य ऐकत आहोत आणि ती चकीत करणारी आहेत. राष्ट्रवादीचे तुष्टीकरणाचे धोरण आणि जातीच्या आधारावर ध्रुवीकरण या ट्रॅकशी ही भूमिका सुसंगत अशीच आहे,” असे फडणवीस यांनी सुनावले. “जातीय सलोख्याची अपेक्षा असताना, हा दुटप्पीपणा शरद पवारांनी का दाखवला? काश्मिरी पंडितांच्या भावना सिनेमात दाखवणारा चित्रपट कुणाला अस्वस्थ करतो? ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा कोणत्याही धर्माविरोधात नाही. तरीही शरद पवारांनी या सिनेमाचा विरोध दर्शवला. तुष्टीकरणाच्या राजकीय अजेंड्याला अनुकूल असे पाऊल त्यांनी उचलले,”असे फडणवीस म्हणाले.
‘इंटेलिजन्स ब्युरो’लाही बदनाम करण्याचा प्रयत्न
“राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना जेव्हा अटक झाली त्यानंतर शरद पवारांनी एक वक्तव्य केले होते. नवाब मलिक हे दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केल्याने आणि ‘मनी लाँड्रींग’ केल्याने तुरुंगात आहेत. मात्र, जेव्हा त्यांना अटक झाली तेव्हा शरद पवार म्हणाले की, नवाब मलिक मुस्लीम आहेत. त्यामुळे त्यांचा संबंध जोडला जातो आहे,”. यावरून फडणवीस पुढे म्हणाले की, “दहशतवादी इशरत जहाँला निष्पाप आणि कॉलेजला जाणारी मुलगी असे म्हणणारे पवारच होते. इशरत जहाँ निर्दोष आहे एवढंच ते म्हणाले नाही. तर, सत्तेत असताना त्यांनी ‘इंटेलिजन्स ब्युरो’लाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
‘रझा अकादमी’वर कारवाई नाही
“२०१२ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात होते. त्यावेळी ‘रझा अकादमी’ने जो मोर्चा काढला त्याला हिंसक वळण लागले. अमर ज्योतीचीही विटंबना झाली. त्यावेळी गृहखात्याची जबाबदारी ज्या राष्ट्रवादीकडे होते त्यांनी ‘रझा अकदामी’वर कारवाई केली नाही, मुंबईचे पोलीस आयुक्त बदलले,” असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यघटनेत तरतूद नसतानाही मुस्लीम कोटा आणण्याची योजना
“आपल्या राज्यघटनेत तरतूद नसतानाही मुस्लीम कोटा आणण्याची योजनाही तयार केली. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणाही केली. प्रत्यक्षात काहीही केले नाही,” असा घणाघात त्यांनी चढवला. “निवडणुकीत कुणाला विजयी करायचे आणि कुणाचा पराभव करायचा हे अल्पसंख्याक गट ठरवतो,” पवारांच्या या विधानांची त्यांनी आठवणही करून दिली.
‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचा वापर सर्वात आधी पवारांकडून
“ ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द २००८ मध्ये सर्वात आधी वापरणारे शरद पवार होते. त्यांनंतर माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि सुशील कुमार शिंदे यांनीही हाच शब्द वापरला,” असेही फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘सच्चर समिती’वरून टोला
“राजकीय पक्षांनी सुधारणांची अंमलबजावणी केली तर ती चांगलीच बाब आहे. मात्र, राष्ट्रवादीचे म्हणणे होते आधी सच्चर समिती लागू करा,” असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
मुस्लिम वस्तीत झालेल्या १३ व्या बॉम्बस्फोटाचा शोध
“१९९३चे बॉम्बस्फोट ही मुंबईची भळभळती जखम आहे. १२ बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली तेव्हा शरद पवारांनी मुस्लिम वस्तीत झालेल्या १३ व्या बॉम्बस्फोटाचा शोध लावला. मुख्यमंत्री असूनही ते खोटे बोलले,” याचीही आठवण फडणवीस यांनी करून दिली.