मुंबई : विक्रोळीतील पँथरनगरमध्ये वयोवृद्धांचे हाल होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. सहा हजार नागरीसंख्या असणार्या या परिसरात केवळ १६ शौचालयांची सोय असून ही शौचालयांच्या दुरवस्था आणि या शौचालयांमध्ये पाण्याची सोय नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. परिसरात विजेची सोय नसल्यामुळे अनेकदा येथील वयोवृद्ध नागरिक पाय घसरून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. नागरिकांच्या समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. या समस्येबाबत येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला.
नाले साफ नसल्यामुळे नाल्यातील किडे घरात
“परिसरातील सर्व गटारे भरलेली असून वर्षातून केवळ एकदाच नाले आणि गटारे साफ केले जातात. इतरवेळेस नाले साफ करण्यास येथे कोणीच फिरकत नाही. नाले आणि गटारे साफ होत नसल्यामुळे त्यातील किडे आमच्या घरात येत आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही आणि आम्हाला येण्यास वेळ नाही, असे उत्तर नगरसेवकाकडून आम्हाला मिळाले आहे,” अशी व्यथा येथील स्थानिक महिलेने मांडली आहे. परिसरात वीज नसल्यामुळे वयस्कर नागरिकांना शौचालयात जाण्यास अडचणी येत असून अनेक नागरिक या शौचालयांमध्ये पाय घसरून पडल्याच्या दुर्घटनाही घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. नाले आणि गटारे साफ होत नसल्यामुळे पावसातून गटारातील सर्व पाणी घरात शिरत असून याबाबत अनेक तक्रारी करूनही त्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याची व्यथा येथील स्थानिकांनी मांडली.
आम्हाला सुविधा उपलब्ध करून द्या
परिसरातील नाले आणि गटारे वेळोवेळी साफ करण्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरवावे, अशी इच्छा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच, आम्हाला आमच्या घरात शौचालयांची सोय करून देऊन परिसरात विजेचीही सोय उपलब्ध करून देण्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरवावे, असे म्हणणे येथील स्थानिकांनी मांडले.नगरसेवकांनी आमच्याकडे लक्ष पुरवून आम्हाला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा विक्रोळीतील पँथर नगरच्या नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांच्या समस्या सोडवण्यास आम्ही प्रयत्नशील
पँथरनगरमध्ये ३० ते ३५ वर्षे विजेची सोय नव्हती. पण आम्ही तेथे विजेचे खांब लावून दिले असून तेथील बुद्धघराचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे. तेथील नाल्यावर पूल बनवण्यासोबतच परिसरातील लादीकरणही करण्यात आले आहे. तेथील नागरिकांसाठी दुमजली शौचालयांचे काम करण्यात येणार असून नागरिकांना घरात शौचालय बांधून देण्यासाठी आमचा अधिकार्यांसोबत पत्र व्यवहार सुरु आहे. आम्ही लवकरच नागरिकांचा शौचालयाची समस्या सोडवणार आहोत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यास आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.
- रुपाली सुरेश आवळे, माजी नगरसेविका
- शेफाली ढवण