नाशिक: शिक्षण आणि सहकार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नाशिकमधील प्रख्यात ‘के. के. वाघ शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ यांचे नुकतेच निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘पद्मश्री’ आणि कर्मवीर काकासाहेब तथा देवराम वाघ यांचे सुपुत्र असलेल्या बाळासाहेब वाघ यांचा जन्म १९ ऑक्टोबर, १९३२ रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मेंढी गावात झाला होता. वडिलांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील वारसा पुढे नेणार्या बाळासाहेब वाघ यांनी १९७० मध्ये ‘के. के. वाघ शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. २००६ पर्यंत उपाध्यक्ष, तर २००६ नंतर अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्था सांभाळली. नाशिक जिल्ह्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे २२ वर्षे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ‘डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन’, ‘डेक्कन शिखर संस्था’ अशा अनेक संस्थांवर त्यांनी पदे भूषवली आहेत. निफाड तालुक्यात २५० कर्मवीर बंधारे बांधून त्यांनी सिंचनाची सोय केली. राज्य शासनाच्या दुसर्या ‘जलसिंचन आयोगा’चे सदस्य म्हणूनही त्यांनी काम बघितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने त्यांना २००९ मध्ये ‘जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.