मलिकांवर कारवाई, राष्ट्रवादीत पळापळ

    24-Feb-2022
Total Views | 595

Nawab Malik
 
 
 
१९९२-९३ साली आपणच मुंबई वाचवल्याचे शिवसेनेचे म्हणणे असते. पण, आज त्याच प्रकरणाचा सुत्रधार कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधाच्या आरोपांवरुन कारवाई केलेल्या नवाब मलिकांच्या बचावासाठी सत्तेच्या लाचारीतून शिवसेनेने पुढाकार घेतल्याचे दिसते. म्हणजेच शिवसेनेला बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या शेकडो मुंबईकरांचे काहीही घेणेदेणे नाही, तर त्यांना आज नवाब मलिकच हवा आहे.
 
 
 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जमिनीची खरेदी आणि मनी लॉण्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना प्रदीर्घ चौकशीनंतर अटक केली. मात्र, नवाब मलिकांना ‘ईडी’ने बुधवारी सकाळी चौकशीसाठी उचलल्यापासून आणि नंतर अटक केल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेनेकडून आरडाओरडा सुरु झाला. नवाब मलिक छत्रपतींचे मावळे असून, दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. पण, ज्या नवाब मलिकांना महाराष्ट्रात राहूनही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करायला लाज वाटते, त्या महाराष्ट्रद्रोही, शिव-शंभूद्रोह्याला ‘छत्रपतींचे मावळे’ कसे म्हणता येईल? सुप्रिया सुळे याचे उत्तर देऊ शकणार नाहीतच. कारण, त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्राशी वा शिवराय, संभाजीराजांशी संबंध नाही, त्यांचा संबंध फक्त भ्रष्टवादाशी आहे. म्हणूनच त्या आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांच्या पाठीशी उभी राहिल्याचे दिसून येते. मात्र, नवाब मलिकांच्या चौकशी-अटकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया त्या पक्षाचे मूळच किती विघातक आहे, हे दाखवून देते.
 
 
 
“मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घेतले जाते,” अशा शब्दांत शरद पवारांनी एकूणच प्रकरणाला मुस्लिमांवरील अन्याय-अत्याचार म्हणून पेश केले. अर्थात, त्यात आश्चर्यकारक असे काही नाही. कारण, शरद पवारांचे राजकारणच मुस्लीम समीकरणावर आणि जातीयवादावर आधारलेले आहे. जातीचे, धर्माचे नाव घेत एका समाजाला दुसर्‍या समाजापुढे उभे करायचे त्यातून सत्तेचा सोपान गाठायचा, असे शरद पवारांचे धोरण आहे. सत्तेवर असताना एखादी गोष्ट अंगलट आली की, जातीचा-धर्माचा मुद्दा उकरुन काढत प्रकरणाला भलतीकडेच घेऊन जायचे, हे शरद पवारांचे आवडते काम आहे. पण, शरद पवारांच्या मुस्लीम कार्यकर्ता आणि दाऊदबद्दलच्या विधानांवरून त्यांना इतक्या कमी कालावधीत स्मृतीभ्रंश झाला की काय, असे विचारावेसे वाटते. कारण, गेल्याच वर्षी ‘ईडी’ने राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांना अटक केली होती. त्यावरून शरद पवारांच्याच तर्कानुसार, अनिल देशमुख मुस्लीम होते का? मुस्लीम असल्यानेच अनिल देशमुखांवर ‘ईडी’ने कारवाई केली का? असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यांची उत्तरे ‘नाही’, अशीच आहेत. अनिल देशमुखांची जात, धर्म कोणताही असो, त्यांनी गैरव्यवहार, भ्रष्टाचार, वसुली केल्याचे पुरावे ‘ईडी’कडे होते, म्हणून त्यांना अटक करण्यात आली. पण, ते शरद पवार विसरले असावेत. आता नवाब मलिकांविरोधातही ‘ईडी’कडे माहिती आहे, पुरावे आहेत, म्हणूनच प्रकरण अटकेपर्यंत पोहोचले. पण, शरद पवारांना ते समजून घ्यायचे नाही. कारण, त्यांची हयात हिंदू-मुस्लिमांत द्वेष पसरवण्यात गेली, हिंदू-मुस्लीम भेदभाव करण्यात गेली. म्हणून ते आता नवाब मलिकांवरील कारवाईतही धर्मच शोधताहेत आणि शरद पवारांचा हा दावाच समाजशांती, सामाजिक सलोखा राखण्यापुढील सर्वात मोठा धोका आहे.
 
 
 
दरम्यान, नवाब मलिकांच्या अटकेनंतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धावपळ उडाल्याचे चित्र दिसले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच मंत्र्यांच्या बैठकीचे शरद पवारांचे निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’वर आयोजन करण्यात आले. कारण, उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोरील स्फोटके, मनसुख हिरेनचा मृत्यू आणि १०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण उघडकीस आले, त्यानंतर सचिन वाझेची चौकशी-अटक झाली, त्यातूनच अनिल देशमुख तुरुंगात गेले, नंतर अनिल परब यांच्यावर आरोप केले गेले आणि त्याचा संबंध ‘मातोश्री’पर्यंतही नेला गेला. तसाच प्रकार नवाब मलिकांच्या अटकेनंतर होणार नाही असे नाही. इथे दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला प्रथम अटक करण्यात आली. इक्बाल कासकरच्या जबाबानंतर नवाब मलिकांवर कारवाई करण्यात आली. पण, नवाब मलिकांना कोठडीत गेल्यानंतर आतमध्ये शांत बसता येणार नाही, तर दाऊद इब्राहिम व मनी लॉण्डरिंग प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहेत, त्यांचीही माहिती त्यांना द्यावीच लागेल. महत्त्वाचे म्हणजे दाऊद इब्राहिमनेच १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट घडवले होते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते शरद पवार. उल्लेखनीय म्हणजे, प्रत्यक्षात सर्वच्या सर्व १२ बॉम्बस्फोट हिंदूबहुल भागांत झालेले असताना शरद पवारांनीच तेव्हा आणखी एक १३वा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत झाल्याचे ठोकून दिले होते. दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ नये, म्हणून आपण खोटे बोलल्याचे नंतर त्यांनी सांगितले होते.
 
 
 
दरम्यानच्याच काळात दाऊद इब्राहिमला भारतातून पळून जाण्यात नेमकी कोणी मदत केली, याची चर्चाही रंगली होती. आता नवाब मलिकांच्या अटकेनंतर शरद पवारांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीवेळी ही पार्श्वभूमीही लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पळापळ सुरू आहे का? नवाब मलिक कसली कसली दडवलेली रहस्ये चव्हाट्यावर आणतील, या कल्पनेनेच राष्ट्रवादी काँग्रेसला घाम फुटलाय का? दरम्यान, नवाब मलिकांच्या चौकशी व अटकेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून सुडाच्या राजकारणाचा आरोप केला गेला. विशेषतः संजय राऊत यांनी तर शिवसेनेसारखा मुंबई-ठाण्याच्या गल्लीतला खंडणीखोर पक्ष केंद्राच्या सत्तेवर येणार या आविर्भावात, “२०२४ पर्यंत असे सगळे चालेल, त्यानंतर ते (भाजप) आहोत आणि आम्ही आहोत,” असा इशारा दिला. खरे म्हणजे, नवाब मलिकांच्या चौकशी आणि अटकेमागे सूड नाही. उलट त्यांनी ‘ईडी’ला चौकशीत सहकार्य करावे, त्यानंतर त्यांनी काही चुकीचे केलेले नसेल, तर ते निष्कलंक बाहेर येतील. म्हणजेच, त्यांच्यावर केल्या जाणार्‍या आरोपांची धुळ खाली बसण्यासाठी नवाब मलिकांनाच या सगळ्याचा उपयोग होईल, तर सुडाचे राजकारण संजय राऊतांनी, शिवसेनेनेच गेल्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात केलेले आहे.
 
 
 
अगदी देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेल्या अनेक चांगल्या योजना, उपक्रमांना स्थगिती देण्यापासून केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणेंची अटक, नितेश राणेंच्या अटकेतून ठाकरे सरकारने सुडाचे राजकारण केले. पण, तशाच शिवराळ भाषेच्या वापरावरुन संजय राऊतांना अजूनपर्यंतही अटक करण्यात आलेली नाही. आणखी एक मुद्दा म्हणजे, १९९२-९३ साली आपणच मुंबई वाचवल्याचे शिवसेनेचे म्हणणे असते. पण, आज त्याच प्रकरणाचा सुत्रधार कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधाच्या आरोपांवरुन कारवाई केलेल्या नवाब मलिकांच्या बचावासाठी सत्तेच्या लाचारीतून शिवसेनेने पुढाकार घेतल्याचे दिसते. म्हणजेच शिवसेनेला बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या शेकडो मुंबईकरांचे काहीही घेणेदेणे नाही, तर त्यांना आज नवाब मलिकच हवा आहे. कारण, त्यांच्या पाठिंब्यावरच शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत आहे. पण, शिवसेनेचा हा मुंबई-महाराष्ट्रद्रोह जनता लक्षात ठेवेल आणि योग्य वेळ येताच धडाही शिकवेल, हे नक्की!
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपोचा विकास प्रकल्प मार्गी लावा; आमदार विक्रांत पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

पनवेल एसटी डेपो हा महाराष्ट्रातील काही प्रमुख मोठ्या बस आगारांपैकी एक मानला जातो. कोकण, तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या वाहतुकीसाठी पनवेल डेपो महत्वाचा आहे. पनवेल बस डेपोमधून दिवसाला अडीच हजार गाड्या ये-जा करतात. अशा स्थितीमध्ये पनवेल बस डेपोची अवस्था ही फार दयनीय झालेली आहे. अशावेळी पनवेल बस डेपोचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा याकरिता तात्काळ कार्यवाही करा, तसेच दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावरही तात्काळ कारवाई करा, अशी मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121