मुंबई : मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कमबॅकमुळे पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आलेल्या गृहविभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या असून यात पुणे नाशिक नवी मुंबईसह इतर काही शहरांच्या पोलीस आयुक्तांचा समावेश आहे.
पोलीस अधिकारी सदानंद दाते यांची राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे अप्पर पोलिस महासंचालकपदी तर विश्वास नांगरे पाटील आणि निकेत कौशिक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक मुंबई पदी नियुक्ती झाली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून मिलिंद भारंबे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे मावळते अंकुश शिंदे यांच्याकडे नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या जागी विनयकुमार चौबे पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त पदी म्हणून आणण्यात आले आहे.
पुण्याचे अमिताभ गुप्ता यांची अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्यपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रितेश कुमार पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त असणार आहे. अतिरिक्त पुलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.
मधुकर पांडे यांच्याकडे मीराभाईंदर पोलिस आयुक्तपद, सत्यनारायण चौधरी यांच्याकडे मुंबई सहपोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी तर निशित मिश्रा यांची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.