मुंबई : महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही असे म्हणणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना चपराक मारणाऱ्या अनेक घटना वारंवार घडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातून उद्योग जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच कसे जबाबदार आहे हे पुराव्यांनिशी सिद्ध करून दाखवल्यानंतर महाराष्ट्रात प्रकल्प आणि गुंतवणूक आणण्याचा धडाकाच लावला आहे. राज्यात नुकतीच मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स पार्कची घोषणा झालेली असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या १० लाख रोजगार भरतीला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातही रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला पंतप्रधानांनी संवाद साधला. त्यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की "आज देशभरात पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्यामुळे रोजगारांच्या अनेक संधी निर्माण हात आहेत. यांमध्ये महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींची गुंतवणूक असणारे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील ७५ हजार कोटी रेल्वेसाठी असतील आणि ५० हजार कोटी रस्ते प्रकल्पांसाठी एवढी मोठी तरतूद करण्यात आली आहे."
पुढे पंतप्रधान म्हणाले की या सर्व गुंतवणुकीतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. या भाषणात त्यांनी महिलांच्या रोजगारांचाही उल्लेख करताना गेल्या ८ वर्षांत ८ कोटी महिला सेल्फ हेल्थ ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत, त्यांना सडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे त्यातून या महिलांना रोजगार मिळाला आहेच पण त्या इतर महिलांनादेखील रोजगार पुरवत आहेत. महाराष्ट्रातील स्टार्टअप कल्चरबद्दल सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगितले जात आहे, त्या स्टार्टअप्सचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. या स्टार्टअप्स मधून तरुणांना आपले कौशल्य दाखवायची संधी मिळेल आणि सरकारच्या या प्रयत्नांमधूनच दलित, आदिवासी , तसेच महिलांना समान स्वरूपात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.