चित्रा वाघ
मुंबई : महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची निवड करण्यात आली आहे. मावळत्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कोण येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यातच आज महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे.
भाजपचा आक्रमक महिला चेहरा म्हणून वाघ यांच्याकडे पाहिले जात आहे. 'चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भाजप महिला अधिक आक्रमकपणे काम करेल अशी अपेक्षा असून देशात सर्वाधिक सक्षमपणे काम करणारा महिला मोर्चा म्हणून महाराष्ट्र भाजपच्या आघाडीकडे पाहिले जाईल,' असा विश्वास यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.