मुंबई : वरळीचे स्थानिक आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे पुन्हा एकदा मुंबईत राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. आदित्य यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वरळीतील नागरिकांना पत्र लिहिले असून आमदारकीची तीन वर्षे पूर्ण होत असताना आपण वरळीकरांसाठी काय केले, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
“गलिच्छ राजकारण करून लोकहिताचा विचार करणारे सरकार पाडले गेले. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील,” असे आदित्य यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, आदित्य यांच्या या पत्रावर भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोरदार टीका करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
वरळीकरांना लिहिलेल्या पत्रात आदित्य म्हणाले की, “वरळीचा आमदार होऊन मला तीन वर्षे पूर्ण झाली. या काळात तुम्ही दिलेले प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहतील अशी मी अपेक्षा करतो. निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला दिलेले ‘ए प्लस’ वरळीचे स्वप्न सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करत आहे. नवीन बस थांबे, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते, हिरव्यागार मोकळ्या जागा हे सगळे करून दाखवण्यात आपल्याला यश आले,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, ’राजकीयदृष्ट्या प्रत्येक पक्षालादेखील वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष आहे. वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की, वरळी हेवा वाटावा, अशी प्रगती करत आहे,” असे म्हणत आदित्य यांनी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
‘ते’ दुसरे काय बोलणार?
मागील पाच वर्षांमध्ये मुंबईकरांना अपेक्षित असलेले काम करण्यात ठाकरे अपयशी ठरले आहेत. केवळ वरळीचे आमदार म्हणून नाही, तर महाराष्ट्रातही ज्या प्रकारच्या कामाची अपेक्षा त्यांच्याकडून होती त्यावर ते खरे उतरू शकलेले नाहीत. विकास काय असतो, ते आता आम्ही त्यांना आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून देऊ. सत्ता आणि पक्षाचे नेतृत्व हातातून गेल्यानंतर आता ठाकरेंच्या हातात काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे केवळ भावनिकतेने साद घालण्यापलीकडे ते काहीही करू शकत नाहीत आणि पत्र लिहिण्यापलीकडे ते काही बोलू शकणार नाहीत.
- शीतल म्हात्रे, नेत्या, बाळासाहेबांची शिवसेना
मग हे प्रश्न सुटले का नाही?
“आदित्य ठाकरे आज वरळीकरांना पत्र लिहून आपण केलेल्या कामांची माहिती देत आहेत. खर्या अर्थाने आमदार असो वा खासदार, स्थानिक नेत्याला आपल्या भागात नेमके काय अपेक्षित आहे, याची कल्पना असणे गरजेचे आहे. वरळीत असंख्य प्रश्न आ वासून उभे होते. त्याकडे युवराजांनी केलेले दुर्लक्ष आजही आमच्या लक्षात आहे. वरळीतील कोळीवाड्यांचा प्रश्न, ‘कोस्टल रोड’ आणि त्यातील जाचक अटींच्या विरोधात लढणारे स्थानिक कोळी बांधव, सीमांकनाचा प्रश्न, लोअर परळ येथील रखडलेले पुलाचे काम, मुंबईतील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘बीडीडी’ प्रकल्पाचे अडीच वर्षात थंडावलेले काम अशा बहुसंख्य विषयांकडे आपण डोळेझाक केलेली आहे. तीन वर्षे वरळीकरांना भेटण्यासाठीही वेळ नव्हता. जर ‘ए प्लस वरळी’ झाल्याचा दावा तुम्ही करत आहात, तर मग हे प्रश्न का सुटले नाहीत? याचे उत्तर देणे तुम्हाला बंधनकारक आहे
- दीपक सावंत, जिल्हा सरचिटणीस, दक्षिण मुंबई, भाजप