
मुंबई : राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान 2022 अंतर्गत प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सहकार मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव मनुकमार श्रीवास्तव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर आणि कुलाबा येथील शाळेतील तसेच कमला मेहता अंध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.