खरोखरच ते पालक धन्य आहेत, ज्यांनी आपल्या अपत्यांनासुस्थितीत ठेवले आहे. पालक म्हणजे आपल्या पाल्यांचे सुयोग्य रीतीने पालन-पोषण व संगोपन करणारे घटक! माता-पित्यांनी अगदी जन्माला येण्यापूर्वीपासून म्हणजेच गर्भाधान संस्कारापासून आपल्या बाळाची काळजी घ्यावयास हवी.
आ ये विश्वा स्वपत्यानि तस्थु:
कृण्वानासो अमृतत्वाय गातुम्।
मह्ना महद्भि: पृथिवी वि तस्थे
माता पुत्रैरदितिर्धायसे वे:॥
अन्वयार्थ
धन्य ते पालक - माता-पिता व आचार्य, (ये) ज्यांनी आपल्या (विश्वा सु-अपत्यानि) सर्व सुसंततींना, मुला-मुलींना (आ तस्थु:) अतिशय उत्तम प्रकारे सुस्थितीत ठेवले आहे. त्यामुळे ते सर्व पालक (अमृततत्त्वाय) अमृततत्त्वाच्या मार्गांना (कृण्वानास:) संपादन करीत, मिळवत (गातुम्) विस्तृत अशा श्रेष्ठ मार्गावर आरुढ होतात. (अदिति:) ही अखंड अशी (पृथिवी माता) भूमी माता (धायसे) सर्व गोष्टी धारण करण्यासाठी आपल्या (मह्ना) महत्तेने, महात्म्याने (महद्भि:) साधनारत आत्मवेत्त्यांसोबत (वि तस्थे) सर्वप्रकारे, सर्वदृष्टीने स्थिर राहते. मोह नाहीसा करण्यासाठी (वे: पुत्रै:) पक्ष्यांच्या पिल्ल्यांकडून आदर्श ग्रहण करावयास हवा!
विवेचन
कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या निर्मितीसाठी या मंत्रात विशेष शिकवण देण्यात आली आहे. यातील आशय जाणून घेत त्यावर आचरण केले, तर निश्चितच सद्य:स्थितीत आई-वडील व शिक्षकवृंद आणि इतर समाज घटकांना कोणत्याही प्रकारच्या चिंतेत पडण्याची गरज भासणार नाही. सध्या सर्वच पालकांना आपल्या मुला-मुलींची चिंता भेडसावतेय. आपली संतती ही सुसंस्कृत, सभ्य, धार्मिक, विद्वान व चारित्र्यसंपन्न व्हावी अन् सर्वदृष्टीने विकसित होऊन ती भविष्यात सन्मार्गाने चालत राहावी, असे कोणास वाटत नाही बरे? कारण, खर्या अर्थाने संतती हीच तर आपली संपत्ती आहे. या संपत्तीचे जतन केले की, जीवन सुखी व समृद्ध होते, असे सर्वच आई-वडिलांना वाटते. चांगल्या अपत्यांमुळे केवळ कुटुंबच नव्हे, तर समाज व देशाची प्रगती होण्यास मदत मिळते. म्हणूनच तर एका हिंदी कवीने म्हटले आहे-
पूत सपूत तो काहे धन संचय।
पूत कपूत तो काहे धन संचय।
मंत्राच्या अगदी आरंभी म्हटले आहे-
ये विश्वा सु+अपत्यानि आ तस्थु:।
खरोखरच ते पालक धन्य आहेत, ज्यांनी आपल्या अपत्यांना सुस्थितीत ठेवले आहे. पालक म्हणजे आपल्या पाल्यांचे सुयोग्य रीतीने पालन-पोषण व संगोपन करणारे घटक! यात माता, पिता व आचार्य या तिघांचा समावेश होतो. माता-पित्यांनी अगदी जन्माला येण्यापूर्वीपासून म्हणजेच गर्भाधान संस्कारापासून आपल्या बाळाची काळजी घ्यावयास हवी. जन्मापूर्वी व जन्मानंतर बालक-बालिकांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिकदृष्ट्या विकसित करण्याकरिता प्रयत्न करावेत. बाळ जन्मल्यापासून मोठे होईपर्यंत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या दिनचर्येतून आपल्या मुला-मुलींचा चौफेर विकास होण्याकरिता दक्ष राहावे लागेल. याबाबतीत थोडीही हयगय होता नये. आपल्या मुलांच्या चालण्या- बोलण्यातून व इतरही व्यवहारातून नेहमीच आदर्श बाबी दिसावयास हव्यात. यासाठी अगोदर आई-वडिलांना व शिक्षकांना स्वतःस सदाचार व नीतिनियमांच्या काटेकोर बंधनात असणे गरजेचे आहे, तरच मुला-मुलींवर त्याचा प्रभाव पडतो व ते आदर्श पदचिन्हांवरून चालण्याकरिता तत्पर होऊ शकतात.
मुले व मुली या दोघांसाठीही ‘निघण्टु’ शास्त्रात ‘पुत्र:’, ‘शेष:’, ‘अपत्य:’, ‘संतान’, ‘सुनु:’, ‘तनय:’, ‘तोक्म:’ इत्यादी १५ नावे आली आहेत. यापैकी ‘अपत्य’ म्हणजे आपल्या आई-वडिलांना अंध:पतनापासून वाचविणारे! तर सम्+तनु विस्तारे या धातूपासून बनलेला ‘संतान’ किंवा ‘संतती’ म्हणजे आई-वडिलांच्या आदर्श कुलपरंपरांचा विस्तार करणारे.पालनकर्त्यांमध्ये आचार्य किंवा शिक्षकांचाही समावेश होतो. आई-वडील हे खानपान, वस्त्र, सुसंस्कार, सोयी-सुविधा व इतर बाबींमध्ये मुला-मुलींचे पालन करतात. आचार्य हे आपल्या विद्यार्थ्यांवर पारंपरिक पाठ्यक्रमिक शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कारदेखील प्रदान करतात. विद्यार्थ्यांच्या अंत:करणात असलेल्या सद्गुणांना चालना देत त्यांच्यात दडलेल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला खुलवण्याचे काम करतात. अशा तर्हेने मुले किंवा विद्यार्थी घडले की, पालनकर्त्या आई-वडील व शिक्षकांना आत्मिक समाधान लाभते. ते निश्चिंत राहतात. अशा सद्गुण व सद्विद्यासंपन्न सुयोग्य मुला-मुलींमुळे त्यांचा नावलौकिक वाटतो. एक प्रकारची निश्चितता मनात राहते. त्यामुळे मंत्रात सांगितल्याप्रमाणे-
कृण्वानास: अमृततत्त्वाय गातुम्।
‘गातु’ म्हणजे विस्तृत असा पवित्र मार्ग. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ज्याच्यावर माणूस चालत राहतो. यालाच शाश्वत सुखाचा, आध्यात्मिक ज्ञानाचा किंवा आत्मसमाधानाचा मार्ग म्हणू शकतो. ‘गातु’ शब्दाचा अर्थ भूमी असादेखील होतो. आपली मुले व मुली सुमार्गी, सुव्यवस्थित, आनंदी व धनैश्वर्याने परिपूर्ण राहिल्यास आई-वडील निश्चिंत होतात. वैराग्य वृत्ती धारण करून समाज व राष्ट्राच्या कल्याणासाठी सर्वत्र भ्रमण करू शकतात. इतकेच काय, तर सार्या जगाचे म्हणजेच भूमीचे परिभ्रमण करण्यात ते वेळ घालवू शकतात. कारण, चांगल्या संततीमुळे आई-वडिलांच्या सर्व चिंता नाहीशा झाल्याने त्यांना एक प्रकारचे समाधान लाभते. अगदी निवांतपणे ते सार्या भूमंडळावर पर्यटन, तीर्थाटन करण्यात व्यस्त राहू शकतात.
मंत्राच्या तिसर्या मंत्रांशात पृथ्वीमातेचे वर्णन करण्यात आले आहे-
अदिति पृथिवी माता धायसे
मह्ना महद्भि: वि तस्थे।
अखंडस्वरूपा असलेली भूमिमाता सर्व वस्तू व पदार्थांना धारण करणारी आहे. आपल्या महत्तम गुणांनी ती सर्वांसमवेत सुस्थितीत आहे. तिच्यावर आत्मिक आनंदाने वावरणारे मोक्षगामी श्रेष्ठ विद्वान, साधक व वैरागी महात्मे पृथ्वीप्रमाणेच ज्ञान व आध्यात्मिक क्षेत्रात परिभ्रमण करीत असतात.पृथ् म्हणजे पसरणे... जी सर्वत्र पसरलेली व व्यापलेली आहे, ती ‘पृथ्वी’ होय. पृथ्वीचे परिभ्रमण नित्यनेमाने सुरू आहे. ती कदापिही थांबलेली नाही. जर पृथ्वीने आपले परिभ्रमण थांबविले, तर ऋतुचक्र थांबेल, दिवस व रात्रीचे चक्रही बंद पडेल. पशु-प्राण्यांचे जगणे असह्य होईल. समग्र जीवसृष्टीच धोक्यात येईल. अशा या सदैव गतिशील असलेल्या भूमिमातेपासून प्रत्येकाने क्रियाशील राहणे शिकावे. जीवनात सत्य, विद्या, सद्गुण व नैतिकता वृद्धिंगत करावयाची असेल, तर मुला-मुलींनी/विद्यार्थ्यांनी नेहमीच गतिमान राहावे. तसेच पालकांनी व शिक्षकांनीही आपल्या कर्तव्यात तत्पर असावे.आपली मुले व मुली धनधान्याने परिपूर्ण होऊन आपापल्या कुटुंबात आनंदाने राहत असल्यास आई-वडिलांनी आता मुक्तपणे सत्संग, स्वाध्याय, योग, अध्यात्म साधना व सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात व्यस्त राहावयास हवे. सगळे काही चांगले होऊनदेखील आई-वडिलांना आपल्या कुटुंबाविषयीचा मोह आवरत नाही. म्हणून ते सतत आपल्या मुलांच्या व मुलींच्या संसारात हस्तक्षेप करीत असतात. आपले विचार त्यांच्यावर लादू इच्छितात. त्यामुळेच घरात क्लेश निर्माण होतात आणि यांचे पर्यवसान पिता-पुत्रांच्या संघर्षात होते.
जर काय हे टाळावयाचे असेल, तर घरापासूनचा मोह त्यागावयास हवा. आपण आता वानप्रस्थ आश्रमाच्या मार्गावरील पथिक आहोत, याचाच विसर वयस्क पालकांना पडलेला असतो. म्हणूनच शेवटी आलेल्या ‘वे: पुत्रै:’ मंत्रांशाद्वारे पक्ष्याप्रमाणे कौटुंबिक मोहापासून दूर राहण्याची शिकवण मिळते. ज्याप्रमाणे पक्षी हे आपल्या लहान पिल्लांना ते लहान वयाचे असेपर्यंत घरट्यात ठेवतात आणि त्यांच्या चोचीत घास भरवतात. नंतर ती मोठी होऊन उडावयास लागली की, त्यांच्यापासून वेगळे होतात आणि काही दिवसांनंतर त्यांना विसरूनदेखील जातात. याला म्हणतात मुले व मुलींच्या किंवा कुटुंबाच्या माया-मोहापासून दूर राहणे. केवढी महान आहे, ही पशु-पक्ष्यांची निर्मोही वृत्ती? इतकेच काय तर पक्षी हे आपल्या पिल्लांना मोठ्या प्रयत्नाने स्वावलंबीदेखील बनवतात. खरोखरच ‘आत्मनिर्भरते’चा धडा घ्यावा, तो वेदांत वर्णिलेल्या पक्ष्यांच्या या आदर्श उदाहरणातून!
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य