
सुर्यनमस्कार घटनाबाह्य असल्याचा अजब दावा
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : सुर्यनमस्कार म्हणजे सुर्याची पूजा करणे असून इस्लाममध्ये ते मान्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या सुर्यनमस्कार कार्यक्रमामध्ये मुस्लिम विद्यार्थी – विदयार्थीनींनी सहभागी होऊ नये, असा फतवा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने काढला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील 30 हजार सरकारी शाळांमध्ये 1 ते 7 जानेवारी या कालावधीमध्ये सुर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने त्यास विरोध केला असून विद्यार्थी – विद्यार्थीनींनी त्यात सहभागी होऊ नये, असा फतवा काढला आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी सुर्यनमस्कारांना इस्लामविरोधी ठरविण्याचा फतवा काढला आहे. त्यांनी फतव्यात म्हटले की, केंद्र सरकारने सुर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे दिलेले निर्देश हे घटनाबाह्य असून त्यामुळे धर्मनिरपेक्षतेस धक्का बसत आहे. त्याचप्रमाणे सुर्यनमस्कार म्हणजे एकप्रकारे सुर्याची पूजा करणे असून देशातील मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांक सुर्यास देव मानत नाहीत आणि त्याची उपासनादेखील करत नाहीत. त्यामुळे, अल्पसंख्यांकांवर बहुसंख्यांकांची उपासनापद्धती थोपविण्याचा हा प्रकार आहे. केंद्र सरकारने हे निर्देश परत घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने बेरोजगारी, महागाई, देशांच्या सीमांचे रक्षण करण्यास आलेले अपयश याकडे लक्ष द्यावे. हा प्रकार इस्लामला मान्य नसल्याने मुस्लिम विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना त्यात सहभागी होण्याची परवानगी नसल्याचे फतव्यात नमूद करण्यात आले आहे.