दै.मुंबई तरुण भारतच्या दणक्यानंतर पालिकेला जाग!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2022   
Total Views |

byculla school 

 
 
 
 
 
मुंबई (ओंकार देशमुख) : भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील ग्लोरिया गर्ल्स कॉन्व्हेंट शाळेला सोमवार, दि. १० जानेवारी रोजी लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. आग शमल्यानंतर अवघ्या २ दिवसांमध्ये या ठिकाणी उभ्या असलेल्या अनधिकृत लाकडी गोदामांच्या पुनर्बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले होते.



यावेळी, ग्लोरिया गर्ल्स कॉन्व्हेंट शाळा प्रशासन आणि पालकांच्या आक्रोशाला 'दै. मुंबई तरुण भारत'ने वाचा फोडण्याचे काम केले होते. दरम्यान, अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या या बांधकामांच्या पुनर्बांधणीला आता महापालिका प्रशासनाने रोक लावली असून शाळेच्या नुकसानीची भरपाई आणि आगीमुळे नुकसान झालेल्या परिसराचे बांधकाम आमदार निधीतून करण्याचे आश्वासन सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याबाबत दुकानांच्या पुनर्बांधणीचे काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
 
सोमवार, दि. १० जानेवारी रोजी पहाटे ग्लोरिया कॉन्व्हेंट शाळेच्या परिसरात उभारलेल्या अनधिकृत लाकडी गोदामांना आग लागली होती. आग लागलेल्या आस्थापना लाकडी असल्याने आगीने अवघ्या काही कालावधीत रौद्र रूप धारण केले होते. या आगीचे लोट दुकानांना लागून असलेल्या शाळेच्या इमारतीत देखील वाऱ्याच्या वेगाने पसरले आणि यात शाळेचे मोठे नुकसान झाले होते.



शाळा परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोदामांमुळेच शाळा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचा आरोप स्थानिक नागरिक, शाळा प्रशासन आणि स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने केला जात आहे. अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या या बांधकामांना महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांचे अभय असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. दरम्यान, १० जानेवारी रोजी लागलेली आग आणि या संपूर्ण प्रकरणावर 'दै. मुंबई तरुण भारत'ने सर्वप्रथम ग्राउंड रिऍलिटी जाणून घेऊन थेट शाळेच्या आवारात जाऊन घडलेल्या गोष्टीची शहानिशा करून सत्याची बाजू लावून धरली होती.
 
 

 
शाळा प्रशासन - भाजप आणि पालकांच्या लढ्याला यश


शाळा परिसरात लागलेल्या आगीनंतर या प्रकरणाला मोठे स्वरूप प्राप्त झाले होते. वास्तविकरीत्या मागील अनेक वर्षांपासून शाळा प्रशासन विरुद्ध अनधिकृत बांधकामधारक असा वाद सुरु आहे. मागील काही वर्षांपासून या संदर्भात शाळा प्रशासन न्यायालयीन मार्गाने या अतिक्रमणधारकांच्या विरोधात न्यायालयात दाद मागत आहे. त्यातच महापालिका प्रशासनाने आगीच्या घटनेनंतर सुरु करण्यात आलेल्या संबंधित दुकानांच्या पुनर्बांधणीवर रोक लावल्याने एकप्रकारे शाळा प्रशासन - भाजप आणि पालकांच्या लढ्याला यश आल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
 
 
 
'२००० मुलींचे आयुष्य वाचले याचे समाधान'


'मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. भाजपने या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून शाळकरी मुलींच्या आरोग्याचा प्रश्न म्हणून धिरोदात्तपणे आवाज उठवलेला आहे. जरी पालिका प्रशासनाने या कामाला थांबविण्याचे आदेश दिले असले तरी उभारण्यात आलेल्या दुकानांवर तत्कालीन नव्हे तर दीर्घकालीन कारवाई व्हावी, अशी आमची भूमिका आहे. आम्हाला या लढ्यात पहिल्या दिवसापासून सत्याची कास धरत पाठिंबा देणाऱ्या 'दै. मुंबई तरुण भारत'चे देखील आम्ही मनःपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत हे प्रकरण लावून धरले. ग्लोरिया शाळेतील २००० मुलींचे आयुष्य भाजपच्या प्रयत्नांमुळे वाचेल याचे आम्हाला समाधान आहे.'

- नितीन बनकर, अध्यक्ष, भायखळा विधानसभा, भाजप
 
 
 
हा तर 'मुंबई तरुण भारत'चा इम्पॅक्ट


'महापालिकेतर्फे अनधिकृत दुकानांच्या पुनर्बांधणीला थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे काही माध्यमांमध्ये वाचले. जर अशा प्रकारचे आदेश देण्यात आले असतील तर त्याचे स्वागत आणि मनस्वी आनंद आहे. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आणि शाळेच्या समर्थनार्थ 'दै. मुंबई तरुण भारत'ने घेतलेल्या भूमिकेचा हा इम्पॅक्ट आहे. अशाच प्रकारे यापुढेही कारवाई होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र, शाळा प्रशासन, पालक आणि इतर सहभागी सर्वांच्या लढाईमुळे अडचणीत आलेले अनधिकृत दुकानदार आणि त्यांचे पाठीराखे आमच्या या भूमिकेच्या विरोधात काही ना काही तरी करतील अशी आम्हाला भीती आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील मंडळींनी आमच्या पाठीशी उभे राहावे अशी आमची अपेक्षा आहे. एक पालक म्हणून मुलींच्या जीवाशी होणारे खेळ आम्ही सहन करू शकत नाहीत.

- वंदिता पाटील, विद्यार्थिनी पालक
 
 
 
'दुकाने कायमची हटवा ; त्रोटक कारवाई नको'


'आग लागल्यानंतर अवघ्या ३६ तासांमध्ये कुठलाही पंचनामा किंवा पालिका प्रशासन अथवा संबंधित प्रशासनातर्फे आवश्यक त्या परवानग्या न घेता अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या दुकानांची पुनर्बांधणी कशी केली गेली ? महापालिकेने जरी हे काम थांबविण्यात आदेश दिले असले तरीही पुनर्बांधणीचे काम हे जवळपास पूर्ण झालेले आहे. त्यामुळे केवळ पुनर्बांधणीचा कामाला स्थगिती देण्यापेक्षा अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या दुकानांवर कायमची काहीतरी कारवाई करण्यात यावी. ही दुकाने तोडण्यात यावीत अशी आमची मागणी आहे.



पंचनामा आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करताना जागेच्या मालक असलेल्या शाळा प्रशासनाला बोलाविण्यात का आले नाही ? आग विझल्यानंतर अवघ्या काही तासात हे बांधकाम कुणाच्या आदेशाने उभारण्यात आले ? याचे उत्तर संबंधितांनी देणे आवश्यक आहे. या संदर्भात शाळा प्रशासनाच्या वेदना आणि समस्या समाजासमोर आणल्याबद्दल आम्ही 'दै. मुंबई तरुण भारत'चे आभारी आहोत.'

- सिस्टर पर्पेटुआ, प्राचार्या, ग्लोरिया गर्ल्स कॉन्व्हेंट स्कुल
 
 


 
 
@@AUTHORINFO_V1@@