आम्ही हिमालयाच्या पोरी! आम्हा हिमशिखरांचा ध्यास!!

    07-Aug-2021
Total Views | 227

himalaya_1  H x


सध्या टोकियो ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा चालू असल्याने सगळीकडे विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांची जोरदार चर्चा आहे. त्यानिमित्ताने अरुणाचलमध्ये मला भेटलेल्या गिर्यारोहण या साहसी क्रीडाप्रकारातील अत्युच्च शिखर गाठूनही अत्यंत सामान्य जीवन जगणार्‍या महिलांची आठवण आज प्रकर्षाने येते...

रोईंग... अरूणाचलच्या पूर्वेकडील एक अत्यंत सुंदर निमशहर. स्वच्छ गार हवा, हिरवाकंच परिसर, साधीभोळी गोड माणसं, विशुद्ध भावना ही तर अवघ्या ईशान्य भारताचीच विशेषता आहे. यावेळी माझी भेट दोन अद्भुत व्यक्तिरेखांशी होणार आहे, याची कल्पना मला दिली गेली होती. या व्यक्ती म्हणजे ईशान्येतली पहिली महिला ‘एव्हरेस्टवीर’ तिनेमिना आणि आपली तिसरी मुलगी दहा वर्षांची असताना एव्हरेस्ट चढून जाणारी मुरी लिंगी. गंमत म्हणजे या दोघीही एकाच गावात म्हणजे रोईंगमध्ये राहतात.


तिनेमिना हास्याचा खळाळता झरा, थोडासा मिश्किल आणि स्पष्ट स्वभाव, प्रचंड ऊर्जा, दुर्दम्य आत्मविश्वासाचे तेज ल्यालेल्या तिनेमिनाला भेटून, तिच्याशी बोलताना मला स्त्रीशक्तीचे खरे रूप पाहायला मिळाले. अरूणाचल म्यानमार सीमेजवळच्या एका वस्तीत तिनेचं बालपण जात होतं. शाळा होती, पण अनेक किलोमीटर चालावे लागत असल्याने शिक्षक शाळेत बिलकूल टिकत नसत. शेवटी मुलांना काही समाधानकारक आयुष्य मिळावे म्हणून आई-वडील वस्तीतून शहरी भागात राहायला आले. पण, आर्थिक ओढाताण प्रचंड होत होती. वस्तीभवतालच्या जंगलातून काही उत्पन्नाचे साधन तरी मिळत होते. इथे काही काम मिळेल, त्या दिवशी घरात तांदुळ शिजत असे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिनेमिना मोठी होत होती.


 पुरूषी शरीरयष्टी, मस्तीखोर, बंडखोर स्वभाव, धाडस, भरपूर शारीरिक ताकद या गुणांमुळे तिची अवहेलनाही होत असे. ‘हिच्याशी कोण लग्न करणार?’ असे म्हणून तिला गावातली समवयस्क मुले चिडवत असत. शाळेतल्या शिक्षकांनी ‘फुलनदेवी’, ‘झाशी की रानी’ अशी नावे तिला दिली गेली. एकंदरीत शालेय जीवनात आपल्या तिनेमिनाचं मन काही फारसं रमलंच नाही. सायकल दामटणे, पोहणे, झाडांवर चढणे, मोटरसायकल शिकणे असे खेळ तिला फार आवडत. एकदा तर शिजवून खायला मिळतील म्हणून एका बनात बांबूवर चढून ती पक्ष्याची अंडी काढत होती. इतक्यात अंडी मिळवण्याच्या आशेने आलेल्या एका नागोबानेही आपली टुपली वर काढली. एकमेकांना पाहून दोघेही घाबरून जमिनीवर आदळले. अंगावर पडलेला साप तिनेमिनाने सर्वशक्तीने दूर फेकला. घाबरून संकट दूर होत नाही. त्याला पळवून लावायचे तर हातपाय हलवावे लागतात, असे अनुभवज्ञ ज्ञान तिला त्या दिवशी मिळाले.
 
 
 
तिच्या गावातून भारतीय सैन्याची सीमावर्ती भागात नियमितपणे ये-जा चालू असते. २५ किलोची पोती १० ते १५ दिवस जंगलमार्गे वाहून नेण्याचे पैसे गावातील तरूण मुलांना दिले जातात. हे काम केले तर पैसे मिळतील, या आशेने तिनेमिनाही हे काम करायला गेली. परंतु, सैन्याच्या अधिकार्‍यांनी मुलींना हे काम करायची परवानगी नाही, असे सांगून तिला परत पाठवले. शेवटी डोक्याला एक फडके बांधून भावाला पटवून ती त्या गटात सामील झाली. सर्व पुरुषांच्या बरोबरीने अगदी सहजगत्या ती पडेल ते काम तिथे करत होती. वर जेवण बनवायलाही तिची खूप मदत होत होती. परंतु, आठवडाभरात सैन्याच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आले की, ही मुलगी आहे. मग तिची राहण्याची व्यवस्था वेगळी करण्यात आली. कारण, अर्ध्या वाटेवरून तिला परत पाठवणे धोकादायक होते. बरोबरची मुले कौतुकमिश्रित चेष्टा करीत म्हणत होती की, “मुलगी असली तरी तिनेमिना आमची अंगरक्षक आहे. तिनेला भारतीय सैन्याविषयी अत्यंत आदर आहे.” याच प्रसंगी नाही, तर भारतीय सैन्याने नेहमीच अरुणाचली जनतेची निरलसपणे सेवा केली आहे, त्यांचे रक्षण केले आहे, हे ती अभिमानाने सांगते.
 

अशा या तिनेमिनाला समाज काय म्हणतो, याची कधीच कसली पर्वा वाटली नाही. काहीतरी भव्यदिव्य करावं, मिळालेल्या आयुष्याचा सदुपयोग करावा, आईवडिलांचे कष्ट दूर करावेत, अशा स्वप्नांनी भारलेल्या तिच्या विशुद्ध मनाला मरगळ, नैराश्य, या भावना कधी शिवल्याच नाहीत.
 

तिच्या एका नातेवाईकांचा ‘ट्रेकिंग टूर्स’चा व्यवसाय होता. त्यांनी तिला मदतनीस म्हणून काम दिले. सगळ्या पंचक्रोशीत आतापर्यंत तिची विश्वासार्ह मुलगी म्हणून ओळख निर्माण होऊ लागली होतीच. मणिपूरच्या एका टीमबरोबर आलेल्या डॉ. रोमिओ यांनी तिनेला पर्वतारोहणाचे शिक्षण घेण्याचा सल्ला घेतला. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शनही केले. त्यानुसार तिनेमिना शिमल्याला एका शिबिरात सहभागी झाली. तिथे एव्हरेस्ट सर करायचे तिचे ध्येय तिला गवसले. आत्मविश्वासाची कमतरता, आर्थिक चणचण, कोत्या मनोवृत्तीच्या लोकांचे टोमणे, भाषेचा अडसर अशा अडचणींचे डोंगर पार करत, नव्हे, त्यांच्याहूनही आपली उंची वाढवत तिनेमिनाचा प्रवास चालू होता. तिचे पालक, तिचा देव, तिचे शुभेच्छुक यांचे आशीर्वाद आणि सद्भावना तिच्या सोबत होत्या. उत्तम प्रशिक्षक आणि तीव्र इच्छा यांच्या बळावर सुरूवातीला अरुणाचली सोडून कोणतीही भाषा न येणारी तिनेमिना शिबिरात सर्वांची लाडकी झाली. तिच्या टीकाकारांपेक्षा तिच्या प्रशंसकांची संख्या दिवसागणिक वाढू लागली. तिने दोन महत्त्वाची पर्वतारोहणे पार पाडली. या कामगिरीच्या जोरावर वर्षभर वाट पाहिल्यावर १५ लाखांची आर्थिक मदत उभी राहिली. तिच्या स्वप्नांना पंख मिळाले.
 

दि. ६ मे २०११ रोजी तिनेमिनाचा शेर्पा आणि ती एव्हरेस्ट बेसकँपला पोहोचले. परंतु, वादळी हवेमुळे पोलादी कांबीसारख्या शरीरातलं तिचं नाजूक मन हिरमुसलं झालं. तिच्या शेर्पाने या वेळी तिला खूप धीर दिला. योग्य वेळ येताच त्यांनी चढाई सुरू केली. प्रचंड वादळी हवेशी सामना करीत ते हळूहळू चौथ्या टप्प्यात पोहोचले. त्यांचा तंबू फाटून गेला होता. २१ वेळा एव्हरेस्ट पार करणार्‍या एका अमेरिकन एव्हरेस्टवीराने त्यांना आश्रय दिला.


पुढे पाचव्या टप्प्यात पोहोचताना तिचा चेहरा अतिथंडीने काळानिळा झाला होता. तिला मार्गावर कोणीच दिसत नव्हते. अशुभाच्या शंकेची पाल सतत मनात चुकचुकत होती. जवळचा ऑक्सिजन संपत आला होता. तेव्हा मृत झालेल्या गिर्यारोहकांचे ऑक्सिजन सिलिंडर गोळा करून ती आणि शेर्पा ते वापरत पुढे जात राहिले. हळूहळू जीवंतपणीच्या सगळ्या संवेदना संपत चालल्या होत्या. केवळ चालत चढत पुढे जात राहाणे इतकेच ती करीत होती. जवळचे अन्नही संपत आले होते. एका मॅगी पाकिटावर दोन दिवस गेले होते. कमी उंचीमुळे मोठे कडे चढणे तिला फार कठीण जात होते. त्यात बर्फाचे धारदार तुकडे म्हणजे ‘आयसिकल्स’ जागोजागी टोचत होते.


शेवटी दि. ९ मे २०११ रोजी तिनेमिनाने एव्हरेस्ट शिखर सर केले. अत्युच्च, अभेद्य असे उद्दिष्ट पार केल्याचा आनंद अवर्णनीय होता. दोन दिवसांनी जेव्हा ते परत कॅम्पमध्ये पोहोचले तेव्हा तिथले लोक तिनेमिना आणि शेर्पाच्या मृत्यूची शंका व्यक्त करू लागले होते. ते परत आल्यामुळे त्यांचे छान स्वागत झाले. दोन दिवसांनंतर अन्नपाणी गिळताना त्या दोघांनाही भयंकर कष्ट होत होते. पण, आता या सगळ्या कष्टांचे चीज झाले होते.
 

आज हजारो ट्रेनी गिर्यारोहक तिनेमिनाच्या हाताखाली तयार होत आहेत. एका चार वर्षांच्या गोंडस बाळाची ती आई आहे. तिच्यावर नितांत प्रेम करणार्‍या तिच्या नवर्‍याला विविध प्रकारच्या ऑर्किड्स आणि वनस्पतींचा अभ्यास करायचा आहे. ती जेव्हा गिर्यारोहणाला उंचउंच पहाडांत जाते तेव्हा काही ना काही नवी वनस्पती त्याच्यासाठी नक्की मिळवते.

मुरी लिंगी

एका जुनाट मिश्मी घरात आम्ही पोहोचलो तेव्हा रात्रीचे ८ वाजले होते. एका छोट्याशा ट्यूबच्या उजेडात चुलीभोवती आमचे गप्पाष्टक जमले. मुरी लिंगी एका शाळेत शिपाई म्हणून काम करतात. तीन मुलींची त्या आई आहेतच. पण एका नातेवाईक महिलेच्या मृत्यूमुळे त्यांची मुलगी या कुटुंबाने दत्तक घेतली आहे. स्वतःच्या तीन मुली असतानाही मुलगीच दत्तक घेऊन, मुलासाठी नवस करणार्‍या या समाजात मुरी लिंगी यांनी किती आदर्श पायंडा पाडला आहे बरं!
 

तर आता अशा चार मुलींचे मातृत्व, घरची शेती, स्वयंपाकपाणी आणि पूर्णवेळ नोकरी या सगळ्यातूनही आम्हाला भेटायला त्यांनी वेळ काढला हीच माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट होती.मुरी लिंगी तिनेमिनासारख्या भरभरून बोलणार्‍या नाहीत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाला हातभार लावत मुलींच्या डोळ्यात स्वप्न फुलवणारी ही सामान्य घरगुती स्री, एका गिर्यारोहण मोहिमेनंतर स्वतःसाठी एव्हरेस्ट एवढं स्वप्न पाहू लागली. तिच्या नवर्‍याने या प्रकल्पासाठी तिला सर्वशक्तीनिशी साथ दिली. प्रश्न होता आर्थिक व्यवस्थेचा. घरातला बारीकसारीक जमवलेला सगळा पैका या ध्यासाच्या खर्ची पडला. पण, २५ लाख उभे करणे या शेतकरी कुटुंबाला कसे बरे शक्य होणार?


मुरी लिंगी म्हणतात तसं, त्यांच्यात आणि एव्हरेस्टमध्ये केवळ आर्थिक चणचण इतकीच अडचण होती. पण, या ध्येयवेड्या जोडप्याने कुठून कर्ज काढून, कोणाकडून उसने मागून या पैशांची व्यवस्था केली आणि आपले एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय साकार केले.
 

पण, आज हा कर्जाचा डोंगर फिटवणे त्यांना फारच जिकिरीचे होते आहे. त्यांना कसलीही आर्थिक मदत कोणा संस्थेकडून अथवा सरकारकडून झाली नाही याची खंत त्यांच्या बोलण्यात वारंवार जाणवत होती.आज टोकियो ‘ऑलिम्पिक्स’मध्ये भारतीय खेळाडू खूपच कौतुकास्पद कामगिरी करीत आहेत. पण, मुरी लिंगींसारखे कितीतरी कर्तबगार खेळाडू अजूनही विविध अडचणींच्या अंधारात विरुन जात आहेत. त्यांची मदत कोण करणार बरे!?
 
मुरी लिंगी आजही त्यांच्या कर्तृत्वाला न्याय देणार्‍यांच्या प्रतीक्षेत आहेत.

- अमिता आपटे



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121