भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई: सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा केंद्र सरकार बद्दलचा द्वेष साहजिकपणे उफाळून येणारच होता, असा टोला भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना काल मंगळवारी ब्रेकफास्टसाठी एकत्र बोलावले होते. मंगळवारी दिल्लीत झालेल्या या ‘नाश्ता बैठकी’त १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खांद्यावर हात टाकून बोलतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला. ‘फटे लेकीन हटे नही’ असे म्हणत जोरदार टीका केली आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, "सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळे त्यांचा केंद्र सरकार बद्दलचा द्वेष साहजिकपणे उफाळून येणारच होता. म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय. मागील दोन वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’ चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहितीचंय असा टोला वाघ यांनी लगावला.
चित्रा वाघ यांनी पुढील मुद्द्यांवरून शिवसेनेवर टीका केली
- औरंगाबादच नाव संभाजी नगर करणारच- फटे लेकीन हटे नही
- कोविडमध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना पन्नास लाख देणार- फटे लेकीन हटे नही
- एमपीएससीच्या सर्व पदांची भरती ३१ जुलै पर्यंत करणार- फटे लेकीन हटे नही
- लॅाकडाऊन काळातील वीजबील माफ करणार- फटे लेकीन हटे नही
- जे औरंगजेबालाही जमलं नाही, ते वारी बंद करण्याचं कृत्य करणार - फटे लेकीन हटे नही
असे म्हणतानाच, खरोखरच आपली ‘फटे लेकीन हटे नही’ची वृत्ती खुपच कौतुकास्पद आहे. आणि त्याचा सार्थ अभिमान आपल्या दिल्लीच्या युवराजांना झाला असेल. म्हणूनच त्यांनी आपल्याला पाठीवर कौतुकाची थाप दिली, असेही त्या म्हणाल्या.