नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक २०२१ स्पर्धेत उत्तम कामगिरी करत ७ पदके पटकावली. यामध्ये १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश होता. आता भारतीय खेळाडूंचे लक्ष हे पॅरालंपिक स्पर्धेकडे लागले आहे. टोकियो पॅरालंपिक स्पर्धेला २४ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून ५ सप्टेंबरपर्यंत स्पर्धा असणार आहे. भारताकडून ५४ खेळाडूंनी स्पर्धेतील वेगवेगळ्या प्रकारात भाग घेतला आहे.
१९६०मध्ये पॅरालंपिक स्पर्धांची सुरुवात झाली होती. तसेच, १९६८ मध्ये भारताने इस्त्राईलमध्ये झालेल्या पॅरालंपिक स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला होता. त्यानंतर १९८४ पासून भारत पॅरालंपिक स्पर्धेत सलग भाग घेत आहे. भारताने रियो पॅरालंपिक स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकली आहेत. तर या स्पर्धेत आत्तापर्यंत भारताने १२ पदके जिंकली आहेत. विशेष म्हणजे यातील १० पदके ही अॅथलेटिक्स प्रकारात पटकावली आहेत. त्यामुळे टोकियो येथे होणाऱ्या पॅरालंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडू नवा इतिहास रचतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीमुळे आता पॅरालंपिकसाठी बह्र्तीय खेळाडूंचाही आत्मविश्वास उंचावला आहे.