आज ‘विवेक’ संस्थेचे जे काही बांबूमधील काम पाहून सर्वांना आनंद होतो, ते आम्ही पूर्ण श्रद्धेने सुनीलजींना अर्पण करतो. हे बांबूचे सेवाकार्य आम्हाला नेहमी सुनीलजी आमच्यातच आहेत, ही आठवण करून देत राहील.
‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’ या आपल्या पालघर जिल्ह्यातील चालणार्या सेवाकार्यातील बांबू विभागाची गंगोत्री म्हणजे लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राचे सुनीलजी देशपांडे. पालघर जिल्हा तसा वनवासीबहुल जिल्हा. या जिल्ह्यात बांबूपासून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्यासारखे कार्य होते. पण, हे कसे करावे हे आम्हालाही रीतसर समजत नव्हते. अभाविपच्या मंदार भानुशे यांनी आम्हाला सुनीलजींबाबत माहिती दिली. लगोलग आम्ही लवादाला सुनीलजींकडे जाण्यास निघालो. साधारण २०१४-१५साली मी आणि मंदार भानुशे ‘अमरावती एक्सप्रेस’ने अमरावती येथे उतरलो. तेथेच सुनीलजींनी एका गाडीची व्यवस्था केली होती. त्यात बसून आम्ही लवादाला पोहोचलो. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, तुरळ वस्त्या, घनदाट जंगल यामुळे या भागात काम करणे किती अवघड आहे, हे हळूहळू लक्षात आले. सुनीलजींच्या प्रकल्पावर पोहोचल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, कुठलाही बडेजाव नसलेला एक मोठा प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर होता. बांबूच्या आधारावर उभे राहिलेली विविध मॉडेल्सही तेथे पाहिली. हीच सुनीलजींची पहिली भेट होती. हा तर बांबू संतच आहे, असे वाटले. चेहर्यावर स्मित हास्य, तसेच एक वेगळेच तेज असलेले सुनीलजी आम्हाला स्वत: भेटायला पुढे आले. भेट पहिलीच असली तरी सामाजिक काम हा परस्परांना जोडणारा धागा होता. त्यामुळे भेट अनौपचारिकच, पण पूर्ण कामाची झाली.
दुपारची वेळ झाली होती. सुनीलजींनी आम्हाला गरमागरम जेवण वाढले. त्यानंतर बांबूसंदर्भातील पुढील सर्व माहिती दिली. इतक्या दुर्गम भागात सुनीलजी कसे आले, ते येथे कशाप्रकारे सेवाकार्य करीत आहेत, हे सर्व ऐकून खूप आनंद होत होता. पण, आता हे सेवाकार्य आम्हाला पालघर जिल्ह्यातील वनवासी समाजाकरिता कसे करता येईल, हा मोठा प्रश्न आमच्यापुढे उपस्थितीत झाला. आम्ही तो सुनीलजींपुढे मांडताच त्यांनी लगेच सांगितले की, “याची चिंता करू नका. आम्ही इथून आपल्याला एक प्रशिक्षक देऊ.” हे ऐकताच आमचा आनंद अगदी द्विगुणित झाला. ठरल्याप्रमाणे पुढील काही दिवसांत सुरेश धारवा नामक एक उत्तम असा प्रशिक्षक आमच्या ‘विवेक’च्या भालिवली केंद्रावर पोहोचला. हल्ली सेवाकार्यात कोणी कोणाला शिकवायला जाणे तसे दुरपास्त झाले आहे. प्रत्येकाला वाटते की, आपल्यासारखे आपणच! पण, सुनीलजी एक खरे सेवाकार्य करणारे योद्धा होते. त्यांच्यातील स्वयंसेवकपणा पदोपदी दिसत होता. भासत होता. ठरल्याप्रमाणे आमचे बांबू प्रशिक्षण सुुरू झाले. बघता बघता आज सहा वर्षांत शेकडो महिला बांबू हस्तकलेच्या कारागीर झाल्या. बांबू राखी, आकाश कंदील, ट्रे अशा वेगवेगळ्या वस्तू त्या बनवू लागल्या आहेत. या महिला नुसत्याच शिकल्या नाहीत, तर त्या कमावत्याही झाल्या. त्यांच्या उत्पादनांना बाजारात मागणीही आहेे. यात राख्या आहेत, ट्रे आहेत. उपयुक्त अशी ही सगळी उत्पादने आहेत. केवळ शोभेच्या वस्तू त्यात नाहीत.
सर्वात विशेष म्हणजे, धारवा यांच्याकडून शिकलेल्या महिलांपैकी सहा महिला या ‘बांबू ट्रेनर’ झाल्या असून, आता याच सर्वांना पुढील प्रशिक्षण देत आहेत. यातून अनेकांना प्रेरणा आणि रोजगार मिळाला आहे. या सर्वांचे श्रेय सुनीलजींना जाते. आम्ही वेळोवेळी सुनीलजींना फोन करून त्यांच्या या सहकार्याबाबत धन्यवाद व माहिती देत असायचो. पण, दरवेळी ते ‘अजून काही करायचे असल्यास सांगा’ अशाच उमेदीने आम्हाला सांगायचे की, आमचा उत्साह अजून वाढायचा. आमच्या विनंतीवरून सुनीलजी ‘विवेक’च्या प्रकल्पावरही आले. त्यांच्या सहकार्याने येथील कामाचे भव्यरूप होत असताना त्यांनी स्वतः पाहिल्यानंतर ते गहिवरून गेले. ते म्हणाले, “आम्ही बर्याच ठिकाणी जाऊन काम पाहिले. पण, तुमचे काम पाहून मीही गहिवरलो. मी अजून काय मदत करू शकतो, सांगा. आपण आता मिळून खूप मोठे काम बांबूमध्ये करूया.” अशा बर्याच चर्चा सुनीलजींबरोबर नेहमी व्हायला लागल्या. पण, आम्हाला कुठे माहीत की, आमची गंगोत्री सुनीलजी देशपांडे एवढ्या लवकर आम्हाला सोडून जातील. आज ‘विवेक’ संस्थेचे जे काही बांबूमधील काम पाहून सर्वांना आनंद होतो, ते आम्ही पूर्ण श्रद्धेने सुनीलजींना अर्पण करतो. हे बांबूचे सेवाकार्य आम्हाला नेहमी सुनीलजी आमच्यातच आहेत, ही आठवण करून देत राहील. माझ्या व ‘विवेक’ परिवाराकडून सुनीलजींना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो.
- प्रदीप गुप्ता
(लेखक सामाजिक कार्यकर्ते असून ‘विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर’चे संचालक म्हणून कार्यरत आहेत.)