मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा थैमान घालत आहे. अशामध्ये देशात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून मदतीसाठी परदेशातूनही मदत मागवावी लागत आहे. अशामध्ये भारतातील अनेक कलाकार, क्रीडापटूंनी पुढाकार घेत आपल्यापरीने मदतीचा हात पुढे केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'मिशन ऑक्सिजन'साठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. २५० उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षीही सचिनने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी दिला होता.
सचिनने दिल्लीतील 'मिशन ऑक्सिजन' या सामाजिक संस्थेला एक कोटी रुपयांची मदत केली आहे. २५० पेक्षा जास्त युवा उद्योजकांनी ही मोहीम सुरु केली आहे. या निधीच्या माध्यमातून ते ऑक्सिजन सिलेंडर्स खरेदी करणार असून हॉस्पिटल्सना दान करणार आहेत. सचिन तेंडुलकरने याबाबत ट्विट करत मदतीची घोषणा केली. तसेच या संस्थेनेदेखील या मदतीसाठी सचिनचे आभार मानले आहेत. याआधी पॅट कमिन्स, ब्रेट ली यांनीदेखील पीएम केयर्स फंडसाठी दिले होते. तसेच, राजस्थान रॉयल्सने मदत करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता क्रिकेटपटूंनीदेखील आता पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.