निराधारांचा आधारवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2021
Total Views |


Mestry 1_1  H x 
 
विविध समस्यांनी ग्रासलेल्या आणि आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित असणार्‍या वनवासी बांधवांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारे ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’चे माजी खजिनदार उमेश मेस्त्री यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
वनवासी बांधवांना मूलभूत सोयीसुविधांअभावी सहन कराव्या लागणार्‍या हालअपेष्टांशी आपण परिचित आहोतच. ज्या मूलभूत गरजा शहरातील नागरिकांना सहजरीत्या उपलब्ध होतात, नेमक्या त्याच गरजांसाठी वनवासी भागातील नागरिकांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. वनवासींना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत म्हणून शासकीय स्तरावर विविध प्रयत्न केले जातात. परंतु, वर्षानुवर्षे विविध योजना राबविण्यानंतरही वनवासींच्या समस्या काही कमी झालेल्या नाहीत. शासकीय स्तरावर केले जाणारे प्रयत्न तोकडे पडत असून अशा नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, सर्वांना ते शक्य होतेच असे नाही. परंतु, समाजात काही अशाही व्यक्ती आहेत, ज्यांनी आपले अवघे आयुष्य वनवासींच्या सेवेला समर्पित केले आहे. ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’चे माजी खजिनदार उमेश मेस्त्री हे त्यांपैकीच एक.
 
 
 
वनवासी बांधवांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी उमेश मेस्त्री यांच्या ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’च्यावतीने विविध प्रयत्न केले जातात. इतकेच नव्हे, तर या भागांतील आश्रमशाळांमध्ये स्वखर्चाने ते विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरवितात, ज्याचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ होतो. गेल्या अनेक वर्षांपासून ते या माध्यमातून सामाजिक कार्य करत असून ‘निराधारांचा आधारवड’ अशीच त्यांची ओळख सर्वश्रुत आहे.
 
 
उमेश मेस्त्री यांचा जन्म २८ नोव्हेंबर, १९६५ साली विरारमधील बोळींज या गावी झाला. उमेश यांचे वडील पुरुषोत्तम मेस्त्री हे रेल्वेमध्ये सरकारी नोकरीत होते. त्यासोबतच ज्योतिषीचा जोडधंदादेखील त्यांनी जोपासला होता. उमेश यांना एकूण चार भावंडं. वडील सरकारी नोकरीत असले तरी आपण खूप शिकून नाव कमावण्याचे ध्येय त्यांनी लहानपणीच निश्चित केले होते. त्यासाठी आधीपासूनच त्यांनी तयारी करण्यास सुरुवात केली. त्यातच उमेश हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. विविध विषयांवर सखोल अभ्यास करणे, हा त्यांचा छंद. अनेक विषयांमध्ये ते संशोधनदेखील करायचे. बोळींजच्या जिल्हा परिषद शाळेतच त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या शाळेनंतर आगाशी येथील के. जी. हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. याच शाळेत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षणात रस असल्याने प्रत्येक इयत्तेत ते उत्तम टक्क्यांनी उत्तीर्ण व्हायचे. दहावी झाल्यानंतर त्यांनी डहाणूकर महाविद्यालयात प्रवेश मिळवला. येथे पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले. कोणत्याही खासगी शिकवणीला न जाता, त्यांनी ९० टक्के गुण मिळवले. उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत पदवीधर झाल्यानंतर ते येथेच थांबले नाहीत. त्यानंतर आणखी पुढे शिकण्याचा निर्धार त्यांनी केला. सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला.
 
 
आपले करिअर घडविण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी उमेश यांचे सामाजिक कार्य दुसरीकडे सुरूच होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना उमेश मेस्त्री हे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी होते. १९८३-१९८५ दरम्यान त्यांनी वसई भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. तळागाळातील नागरिकांसाठी प्रत्यक्षात स्वतः रस्त्यावरून काम करण्याच्या भाजपच्या विचारधारेपासून आपण आधीच प्रेरित होतो. भाजपमध्ये कोणतीही घराणेशाही नसून येथे प्रत्येकाला काम करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे आपण भारतीय जनता युवा मोर्चासाठी काम केले असल्याच्या आठवणी मेस्त्री अनेकदा अभिमानाने जागवतात. भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असताना उमेश मेस्त्री दर महिन्याला विविध ठिकाणी साफसफाई अभियान, रक्तदान शिबीर राबविणे आदी प्रकारची सामाजिक कामे दर महिन्याला करत असत. ही सामाजिक कार्ये करत असतानाच आपल्याला प्रेरणा मिळाली आणि याच प्रेरणेतून वनवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे उमेश मेस्त्री सांगतात.
 
 
१९९० साली उमेश मेस्त्री यांचे सीएचे शिक्षण पूर्ण झाले. सीए झाल्यानंतर मेस्त्री यांनी वसईतील नामांकित सीए जयेश स्थार यांच्याकडे काही काळ नोकरी केली. येथे जवळपास दोन वर्षे नोकरी केल्यानंतर १९९२ मध्ये त्यांनी ‘लायन्स क्लब ऑफ नवघर-वसई’ या संस्थेसाठी काम केले. १९९२ ते २००० या आठ वर्षांच्या कार्यकाळात या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली. डोंगरी आणि एव्हरशाईन नगर येथील शाळांमधील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून शौचालय, पाणपोई आदी सुविधांपासून वंचित होते. शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही या सुविधा विद्यार्थ्यांना काही उपलब्ध झाल्या नव्हत्या. मात्र, उमेश मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली संस्थेतील अनेक सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि शेकडो वनवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. या आश्रमशाळांमध्ये सुलभ शौचालय, पाणपोई आदींची सुविधा उपलब्ध करून दिली. या शाळांमध्ये शिकणारे शेकडो विद्यार्थी आजही त्याचा लाभ घेत आहेत. यासोबतच उमेश मेस्त्री यांच्या वतीने आणि ‘लिओ मेंबर्स ऑफ वसई पर्ल्स’च्या सहकार्याने ‘साई आधार आश्रम’ येथे २२ सायकल्सचे तसेच धान्य, बिस्किट आणि फळांचे वाटप नुकतेच गरजूंना करण्यात आले. तर मेढे येथील वनवासी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी जुहू येथील ‘लिओनेस क्लब’च्यावतीने गरजूंना दहा शिलाई मशीन्स देण्यात आल्या. येथे वृक्षारोपण करून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच पाण्याची अडचण सोडविण्यासाठी ‘बोअरिंग’ची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
 
 
‘लायन्स क्लब ऑफ नवघर-वसई’ संस्थेसाठी काम केल्यानंतर उमेश मेस्त्री यांनी आपल्या सामाजिक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’ स्थापन केला. २०१३ साली अस्तित्वात आलेल्या या ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’ मध्ये एकूण ३६ सदस्य सभासद असून गेल्या सात वर्षांमध्ये संस्थेने अनेक ठिकाणी विविध सामाजिक कार्ये केली आहेत. ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’च्या सामाजिक कार्यांतून प्रेरणा घेत इतर अनेक सामाजिक संस्थाही मदतीसाठी पुढे आल्या असून संस्थेच्या सामाजिक कार्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे. वाडा येथील कळंबई आश्रमशाळेसाठी दहा लाखांहून अधिक रुपये खर्च करत संस्थेच्यावतीने स्वच्छतागृह उभारण्यात आले. जवळपास ९०० विद्यार्थिनींना याचा फायदा होत आहे. वसई क्लब, वसई रोड, माणिकपूर क्लब, वसई युनिक वसई पर्ल्स लायन्स क्लब आदी सर्व सामाजिक संस्थांतर्फे या सामाजिक कार्यांसाठी हातभार लावला जातो. वनवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विविध शालेय साहित्य पुरविणे, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे, पाणपोई आदी सुविधा उपलब्ध करून देणे आदी कामे केली जातात. उमेश मेस्त्रींकडून अशीच वनवासींची सेवा घडत राहो, ही आशा आणि त्यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा...
यशाचा मूलमंत्र
 
 
काम कुठलेही असो, प्रत्येक काम मन लावून केले पाहिजे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. मन लावून काम केले की ते नक्कीच यशस्वीरीत्या पूर्ण होते. दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त संशोधन करणेही गरजेचे आहे. यामुळेच आपल्याला काही तरी वेगळे करून दाखवता येते.
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@