
ब्रिटनला लस पुरवण्यासाठी केंद्राकडे परवानगी
पुणे दि.24 (प्रतिनिधी) : मंगळवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्याची घोषणा केली. त्यामुळे या वयोगटातल्या नागरिकांना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लशींची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे सिरम इन्स्टिट्युटनं केंद्र सरकारकडे ब्रिटनला कोविशिल्ड लशींचे 50 लाख डोस ब्रिटनला देण्याची परवानगी मागितली आहे. पण ब्रिटनला लशींचा पुरवठा केल्याने भारतातील लसीकरणावर कुठलाही परिणाम होनार नसल्याची हमी सिरम इन्स्टिट्युने दिली आहे. तसेच,अॅस्ट्राझेन्कासोबत झालेल्या करारानुसारच हे डोस ब्रिटनला द्यायचे आहेत, असं देखील सिरमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
ब्रिटनसोबत 10 कोटी डोसचा करार!
ब्रिटनमध्ये फायझर आणि कोविशिल्ड या दोन लशींच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. ब्रिटनने अॅस्ट्राझेन्कासोबत एकूण 10 कोटी लसीच्या डोससाठी करार केला आहे. त्यापैकी 1 कोटी डोस हे सिरमकडून येणे अपेक्षित आहे. त्यापैकी 50 लाख डोस आत्ता पुरवण्याची परवानगी सिरमने मागितली आहे. ऑक्सफोर्ड, अॅस्ट्राझेन्का आणि सिरम यांनी संयुक्तपणे कोविशिल्ड लस विकसित केली असून लसीचं सर्वाधिक उत्पादन हे पुण्यातील सिरमच्या प्लांटमध्ये सुरू आहे.
तर ब्रिटनमधल्या लसीकरणाला ब्रेक :
दरम्यान, सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे की ब्रिटनला केला जाणारा लशींचा पुरवठा हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या परवानगीवर अवलंबून असणार आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतरच हा पुरवठा केला जाणार आहे. या तिन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार अॅस्ट्राझेन्काने ज्या देशांसोबत लस पुरवठ्याचे करार केले आहेत, त्या देशांना सिरमकडून लस पुरवठा केला जाणार आहे. ब्रिटनला लशींचा पुरवठा नाही झाल्यास त्याचा ब्रिटनच्या लसीकरणावर परिणाम होईल हे निश्चित आहे त्यामुळे आता यावर केंद्र सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.