सरकारमध्ये ‘नाना’ तक्रारी!

    05-Feb-2021
Total Views | 116
nana patole_1  
 
 

विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा; तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा रस्सीखेच

 
मुंबई: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये काहीच समन्वय नसल्याचे गुरुवार, दि.४ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा समोर आले. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी लागेल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
 
 
राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर होते.
आता त्यांना ही जबाबदारी देण्यात येणार असल्यानेच नाना पटोले यांनी राजीनामा दिला असल्याचे समजते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणार्‍या नाना पटोले यांनी बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीनंतर नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचल्याचे बोलले जात होते. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल, असे बोलले जात होते. मात्र, काँग्रेसच्या ‘हायकमांड’कडून घोषणा होण्याआधीच पटोले यांनी राजीनामा सोपवला. त्यामुळे सरकारमध्ये नेमके चालले तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
 
 
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबतच महाराष्ट्रात आणखी काही संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. राज्यातील काँग्रेसचे कार्याध्यक्ष बदलण्यासाठी ‘हायकमांड’ आग्रही असल्याचे समजते. संघटनात्मक बदल करताना मंत्र्यांऐवजी पूर्णवेळ पक्षासाठी काम करणार्‍यांना संधी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीचा कल असल्याचे समजते. नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आतापर्यंत विजय वडेट्टीवार, नितीन राऊत या मंत्र्यांची नावे चर्चेतहोती. मात्र, प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रिपदही ठेवून आपण काम करू, अशी अट घातल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नसल्याचे समजते. पटोले यांनी स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचे नाव व येत्या आठवडाभरात यासाठी निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. यासाठी पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
 
 
पवारांमुळे गुंता अधिकच वाढला
 
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना सत्तेतील इतर भागीदार पक्षही याबाबत जवळपास अनभिज्ञ असल्याचे बोलले जाते. कारण, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीही याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र, सर्वत्र हे वृत्त वार्‍यासारखे पसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली दरबारी आपले मत मांडत याबाबतचा गुंता अधिकच वाढवला. ते म्हणाले, “विधानसभा अध्यक्षपद हे सरकारमधील तिन्ही पक्षांचे होते. नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे या पदाची ‘व्हेकन्सी’ तयार झाली आहे. हे पद आता खुले झाले आहे. या पदाबाबत आता पुन्हा चर्चा होईल. पदाचा राजीनामा देण्याआधी नाना पटोले यांनी त्याची शिवसेना आणि राष्ट्रवादीला कल्पना दिली होती. पक्षात त्यांना नवी जबाबदारी मिळत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यावर भाष्य करणे योग्य नाही. ती काँग्रेसची अंतर्गत बाब आहे,” असे पवार म्हणाले. पवार यांच्या बोलण्याने विधानसभा अध्यक्षपदाचा गुंता अधिकच वाढला असून याबाबत या पदावरून आता या तिन्ही पक्षावरून महारस्सीखेच सुरु होणार, हे मात्र निश्चित!
 
 
"यापुढे आता पक्ष जी काही जबाबदारी देईल त्याचा मी सांभाळ करेन. माझ्या पक्षाध्यक्षांनी जो आदेश दिला त्यानुसार, मी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण ते तिन्ही पक्षांचे ‘हायकमांड’ निर्णय घेईल."
- नाना पटोले, नेते, काँग्रेस
अग्रलेख
जरुर वाचा
पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121