ग्रेटा थनबर्गच्या ‘त्या’ टूलकिटमुळे भारतात अराजक माजवण्यासाठीची खलिस्तानवाद्यांची ‘ट्विटरी टोळधाड’ अखेरीस त्यांच्यावरच उलटली. खलिस्तानवाद्यांनी ग्रेटा आणि इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीजना हाताशी धरून चालवलेले हे ‘गेटकिपिंग’चे षड्यंत्रही यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आणि आगामी काळात या षड्यंत्राचा पूर्णपणे पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही.
मध्यमजगतात ‘गेटकिपिंग थेअरी’ ही तशी सर्वज्ञात. एखादा द्वारपाल ज्याप्रमाणे कुणाला आतमध्ये प्रवेश द्यावा आणि कुणाला गेटवरूनच माघारी फिरवावे, हे पूर्वनिर्धारित नियमावलीनुसार ठरवीत असतो, त्याचप्रकारे माध्यमांमध्येही कोणता मजकूर उचलून धरावा अन् कुठल्या विषयांना वगळावे, हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निश्चित केले जाते. असाच हा ‘गेटकिपिंग’चा अजेंडा समाजमाध्यमांवरही ‘हॅशटॅग्ज’, ‘ट्रेण्ड्स’ आणि ‘इन्फ्लुएन्सर्स’च्या माध्यमातून प्रकर्षाने राबविला जातो. त्याचा प्रत्यय नुकताच ग्रेटा थनबर्गच्या ट्विटरवरील टिवटिवाटावरून आलाच. ग्रेटा ही स्वित्झर्लंडमधील ‘हवामान बदल’ विषयावरून डिजिटलविश्वात परखड मते व्यक्त करून प्रसिद्धीस पावलेली १८ वर्षीय तरुणी. त्यामुळे अर्थोअर्थी ग्रेटा ना भारताशी संबंधित, ना शेती हा तिचा अभ्यासाचा विषय! म्हणूनच इथे पुलंच्या भाषणातील, “आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं,” या ओळी ग्रेटाच्या या ‘अनग्रेटफूल’ व्यवहाराला अगदी चपखल शोभतात.
ग्रेटा, रिहाना आणि अन्य आंतरराष्ट्रीय (अप)कीर्तीच्या या सेलिब्रिटीजनी एकाच दिवशी शेतकरी आंदोलनाला समर्थन देत, केंद्र सरकारवर निशाणा साधला. आता हे आंदोलन जवळपास ७० दिवसांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. तेव्हा इतके दिवस यापैकी एकाही तथाकथित ‘बुद्धिवादी’ म्हणून मिरविणाऱ्या सेलिब्रिटीला या शेतकऱ्यांप्रति संवेदना दर्शविण्यासाठी एक मिनीटही मिळू नये, यावरूनच या व्यापक षड्यंत्राची रूपरेषा लक्षात यावी. त्यात ग्रेटाचा यापूर्वीचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ काढून तपासला, तर तिच्या बसल्या बसल्या अशा नसत्या उचापती सुरूच असतात. मग तो विषय हवामान बदलाशी निगडित असो अथवा नसो, आपण कोणी तरी महान दुढ्ढाचार्य, विचारवंत आहोत, या थाटात हे स्वयंघोषित महानुभाव ‘फॉलोअर्स’च्या फालतू आविर्भावात वावरताना दिसतात. त्यांच्या अर्धवट ज्ञानावर विश्वास ठेवणारेही त्यांना या ‘व्हर्च्युअल’ विश्वात असेच डोक्यावर घेऊन नाचतात अन् एका रात्रीत ही अल्पबुद्धीची डोकी प्रसिद्धीस पावतात. एकाच दिवशी ट्विटरवर सातासमुद्रापार बसून अभिव्यक्ती आणि सहानुभूतीची पोकळ भाषा करणाऱ्या अशा या सेलिब्रिटीजना या आंदोलनाची साधी पार्श्वभूमीही ठाऊक नसावी. याचाच अर्थ, केवळ या सेलिब्रिटीजच्या समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीचा वापर करून, भारतविरोधी अजेंडा दामटवण्याचा हा सुनियोजित डाव आखला गेला. परंतु, केंद्र सरकारच्या कठोर भूमिकेमुळे ग्रेटाच्या खलिस्तानी ‘गेटकिपर्स’ची मात्र चांगलीच गोची झाली.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी लगोलग तपासही हाती घेतला आणि ग्रेटाने ट्विटरवर शेअर केलेल्या त्या ‘टूलकिट’विरोधात गुन्हाही दाखल केला. या ‘टूलकिट’मध्ये कॅनडास्थित खलिस्तानवाद्यांनी 26 जानेवारी आणि तत्पूर्वी कशाप्रकारे हे आंदोलन भडकावले जाणार आहे, त्याची अख्खी कुंडलीच समोर आली. या आंदोलनाला पाठिंबा कसा द्यावा, इथपासून ते जगभरातील भारतीय दूतावासांबाहेर आंदोलनाचे खलिस्तानवाद्यांचे खुन्शी मनसुबे यामुळे उजेडात आले. जसे की ‘डिसरप्ट योगा अॅण्ड चाय.’ आता अशा सांकेतिक भाषेतला विद्ध्वंसाचा हा संदेश न समजण्याइतपत कुणी दूधखुळे नक्कीच नाही. इथे ‘योग’ म्हणजे आपला भारत देश आणि ‘चाय’ म्हणजे चायवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी! म्हणजेच, भारतावर हा ‘डिजिटल स्ट्राईक’ करून देशाला आणि पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचा हा कुटील डाव अगदी नियोजनबद्धरीत्या आखला गेला. एकप्रकारे शेतकरी आंदोलनाचे निमित्त करून दिल्ली सीमेबरोबरच, भारत सरकारविरोधात ‘व्हर्च्युअल वॉर’ छेडण्याचे हे खलिस्तानवाद्यांचे व्यापक षड्यंत्रच होते! खरंतर शेतकरी आंदोलनामागचा खलिस्तानी चेहरा आम्ही ‘काट्याचा सराटा’ या दि. 15 जानेवारीच्या अग्रलेखातूनही सर्वांसमक्ष मांडला होता. त्यावर दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासानेही आता शिक्कामोर्तब झाले आहे. कारण, यामागे कॅनडास्थित व्हॅन्कुव्हरमधील ‘पोएटिक जस्टिस’ फाऊंडेशन या संस्थेची पडद्यामागील भूमिकाही समोर आली. या संस्थेचा म्होरक्या म्हणजे मो धालिवाल, जो कॅनडामधील स्वयंघोषित खलिस्तान्यांच्या टोळ्यांपैकीच एक; त्याने या सेलिब्रिटीजना ट्विटरच्या टवाळखोरीत सहभागी करून घेतले. याचाच अर्थ, या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीजची या आंदोलनावरील भूमिका, मतं हे सगळं अजिबात नैसर्गिक नाही, तर मुद्दाम त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, प्रसंगी चार पैसे चारून केलेला हा सगळा उपद्व्याप म्हणावा लागेल. पण, या ‘डिजिटल’ डावाला भारत सरकारने आणि भारतीय सेलिब्रिटीजनेही जशास तसे उत्तर देऊन या मोहिमेतील हवाच काढून टाकली.
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली, अजय देवगण यांसारख्या विविध क्षेत्रातील भारतीय दिग्गजांनी या प्रकरणी ट्विट्स करून ‘आमच्या देशाचे प्रश्न सोडवायला आम्ही समर्थ आहोत’ अशी खमकी भूमिका मांडल्यानंतर, पुरोगामी पिलावळीलाही चांगलीच मिरची झोंबली. आपल्या देशाची, आपल्या पंतप्रधानांचीच जगासमोर बाजू मांडून या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राला प्रत्युत्तर देणाऱ्यांनाच उलट ‘ट्रोल’ करण्यात आले. भारताचे नाव जगभरात उंचावणाऱ्या या दिग्गजांनाच ‘टार्गेट’ करून खरंतर पुरोगाम्यांनी त्यांचीच लायकी दाखवून दिली. पण, असो. जशास तसे उत्तर देणे हे गरजेचेच. मग त्या देशाच्या सीमा असो वा डिजिटल विश्व. देशविरोधी शक्तींना त्यांची अशाप्रकारे तत्काळ जागा दाखवून अशा प्रकारांना आळा घालावाच लागेल. कारण, आज देशाच्या सीमासुरक्षेबरोबर ‘डिजिटल’सुरक्षाही तितकीच महत्त्वाची. त्यामुळेे समाजमाध्यमांवरून देशाचे वातावरण कलुषित करणाऱ्या देशांतर्गत आणि देशाबाहेरील ताकदींचे कंबरडे मोडायलाच हवे. या किडींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यात मोठ्या संकटाला आपणहून निमंत्रण देण्यासारखे ठरू शकते. त्यामुळे भारतीय नेटकऱ्यांनीही ‘व्हर्च्युअल गेटकिपिंग’ची ही प्रक्रिया नीट समजून घेऊन ‘डिजिटल’ सावधानता बाळगायला हवीच. देशाच्या सीमेवर उतरून आज प्रत्येक नागरिक राष्ट्रसेवा बजावू शकत नसला, तरी किमान ‘डिजिटल’ विश्वात भारतविरोधी शक्तींना भारतीयांनीच ठेचणे,हीदेखील आजच्या काळात राष्ट्रभक्तीच ठरावी!