मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यवहारांचा आरोप केला आहे. त्यावर मलिकांनी पत्रकार परिषद घेतली. याला आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले आहे. "ही तर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळ्या कारकिर्दीची कबुली", असे उपाध्ये म्हणाले.
"शाह वली खान या वॉचमनने सातबारावर नाव टाकून हडप केलेली जमीन विकत घेतल्याची कबुली देऊन नवाब मलिक यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील एका गंभीर जमीन गैरव्यवहारावर प्रकाश टाकला आहे. या जमीन बळकाव प्रकरणाची सखोल चौकशी करावी. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात मुंबईतील अशा किती भूखंडांवर डल्ला मारून बेकायदा आर्थिक व्यवहारांद्वारे जमीनी घशात घालण्यात आला, मुंबई लुटण्यात आली त्याची चौकशी करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ठाकरे देतील का?", असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
"एक वॉचमन ७/१२वर आपले नाव घुसवून जमीन हडप करतो, आणि एक मंत्री जुजबी पैसे देऊन ती स्वत:च्या ताब्यात घेतो… काय चाललंय काय? हा तर भूखंडाच्या श्रीखंडाचाच आणखी एक प्रकार! मुंबईतील भुखंडाच श्रीखंड कुणी खाल्ल जुन्या लोकांना माहिती आहे. ‘साहेबां’चा चेला शोभतात", असा टोलाही त्यांनी लगावला आहे.