मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव हे दाऊद असल्याचा आरोप केला आहे. मलिक यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित करत वानखेडेंना चितपट करण्याचा एकही प्रयत्न सोडलेला नाही. क्रांती रेडकर यांनी किरीट सोमय्यांची भेट घेतल्यानंतर आता वानखेडेंसाठी सोमय्याही धावून आले आहेत. सोमय्यांनी वानखेडेंबद्दल मलिकांना थेट सवाल उपस्थित केला आहे. दाऊदला विमानात कुणी बसविलं. त्याच्यासोबत कोण होतं, असा प्रश्न मलिक यांना विचारला आहे.
भाजप कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना मलिकांवर सोमय्यांनी घणाघात केला आहे. "समीर तुझे वडील ज्ञानदेव नाहीत, दाऊद आहे, असं मलिक म्हणतात. दाऊद त्यांचा नाही तर तुमचा बाप आहे. ठाकरे सरकारमधील शरद पवारांना जाऊन विचारा. १९९४ मध्ये दाऊदसोबत विमानात कोण बसलं होतं, असा प्रश्न मलिकांना विचारला आहे. दाऊदबद्दल विचारताना उद्धव ठाकरे आणि पवारांना लाज वाटायला हवी, असेही ते म्हणाले.
ही तर नवाबांची नौटंकी
समीर वानखेडेंनी आर्यन खान विरोधात कारवाई केल्यानंतर मलिक रोज पत्रकार परिषद घेत आहेत. गेले १३ दिवस नवाब मलिक यांनी नाटक सुरू केलं आहे, असेही सौमय्या म्हणाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांपासून लक्ष विचलित करण्याचा मलिक यांचा प्रयत्न होता. रोज सकाळी उठून मलिक ट्विट करतात, फेसबूकवर पोस्ट करतात, नंतर पत्रकार परिषदा घेतात, असे म्हणत नवाब मलिकांच्या आरोपांबद्दल त्यांच्यावर घणाघात केला. "वानखेडे हिंदू नाही, मुस्लिम आहेत, त्यानंतर मुस्लिम नाहीत, दलित आहेत, क्रांती रेडकरचा नवरा मुस्लिम आहे. त्याचं पहिलं लग्न झालं… हे झालं अन् ते झालं… १३ दिवस ही नौटंकी सुरू असल्याचा टोला त्यांनी मलिकांना लगावला.
आणखी तीन मंत्र्यांचे घोटाळे
येत्या काळात सहा जणांचे फटाके फुटणा आहेत. दिवाळी ते देव दिवाळीपर्यंत आरोपांच्या फटाक्यांची मालिका फुटत राहणार आहे. ठाकरे सरकारने घोटाळे केले आहेत. तीन मंत्र्यांनी तीन घोटाळे आहेत. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खुश केलं. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयांना खूश केलं. नवाब मलिकांनी त्यांच्या जावयांना खूश केले. पण मी या सर्वांचे फटाके फोडले, असेही ते म्हणाले.