मुंबई : धुळ्यात बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शुल्क माफी संदर्भात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करून निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी अमानुषपणे या कार्यकर्त्यांना मारहाण केली. भारतीय जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.
या प्रकरणात काही पोलिसांनी कार्यकर्त्यांना अत्यंत क्रूरतेने मारहाण केली. मारहाण इतकी जबर होती की एका कार्यकर्त्याचा हात तुटला आहे, एकाचा जबडा हलला आहे तर अनेक कार्यकर्ते जखमी आहेत. आंदोलन करणारे विद्यार्थी होते कोणी अतिरेकी होते का ?, असा प्रश्न भाजयुमोतर्फे विचारण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना जर आज अशी वागणूक मिळत असेल तर उद्या सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळेल, असा जाब जोशी यांनी विचारला आहे.
आंदोलनानंतर विद्यार्थ्यांना एक दोन पोलिस अधिकारी बुक्के मारून त्यांचे तोंड फोडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला व त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले. विद्यार्थ्यांचे आंदोलन अश्या प्रकारे हाताळले जाते का? मंत्री अब्दुल सत्तार यांनी २ मिनिटे भेट देऊन निवेदन घ्यायला काय हरकत होती? विद्यार्थ्यांना मारहाण करायला लगेच पोलीस कमांडो लागतात का? एक पोलीस अधिकारी तर वैयक्तिक दुश्मनी असल्यासारखा तोंड फोडत होता, हे तो कोणाला खुश करण्यासाठी करत होता? असे प्रश्न यावेळी मयुरेश जोशी यांनी उपस्थित केले.
विद्यार्थांना अशी अमानुष मारहाण चुकीची आहे आणि विद्यार्थ्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन असल्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आपण तक्रार दाखल केली असल्याचे मयुरेश जोशी व सह-तक्रारदार रोहित चांदोडे यांनी सांगितले. या प्रकरणात ज्यांना मारहाण झाली ते अभाविप चे पदाधिकारी गंगाधर कोलमवार, प्रताप श्रीखंडे, मोहन भिसे, नयन माळी व अन्य कार्यकर्ते यांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे सदर तक्रार दाखल केली.