लोकमान्य टिळक आणि राष्ट्रीय सभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
lokmany 7_1  H


ज्याप्रमाणे एक नेता आपल्या देशाला, समाजाला, संघटनेला संघटीत करून सतत कार्यरत राहतो त्याचप्रमाणे टिळकांनी काँग्रेसला कार्यप्रवण बनवले. त्यांनी काँग्रेसचे मवाळ राजकारण जहाल करून काँग्रेसला खर्‍या अर्थाने लोकमान्यता मिळवून दिली. आपल्या मागणीपाठोपाठ लोकसंघटनेची शक्ती पाहिजे व त्यासाठी नेत्यांनी,पुढार्‍यांनी स्वार्थाचा विचार न करता पुढे आले पाहिजे. ही विचारसरणी काँग्रेसच्या राजकारणात प्रविष्ट करण्याचे पहिले श्रेय लोकमान्यांचेच !



१८८५ साली स्थापन झालेली राष्ट्रसभा अथवा काँग्रेस अखिल भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारी राजकीय संस्था म्हणून उदयास आली. काँग्रेसचे कर्तव्य सांगताना टिळक म्हणतात, “हिंदुस्थानातील सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या आणि सर्व प्रांताच्या लोकांना एकदिलाचे आणि एक विचाराचे करणे हे काँग्रेसचे कर्तव्य आहे. सामाजिक, राजकीय चळवळीत कार्यरत असणार्‍या पुढार्‍यांनी काँग्रेसचे राजकारण आपल्या हाती घेतले.”


ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेऊन आपले राजकारण समोर नेण्याचे कार्य करण्यास काँग्रेसने सुरुवात केली. काँग्रेसची अधिवेशने भरत होती, अनेक ठराव मांडल्या जात होते. परंतु, १८९२ पर्यंत त्यांची एकही मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेसला लोकांचे पाठबळ लाभत नाही तोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही, अशी टिळक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उदयास आलेल्या जहाल गटाची पक्की खात्री झाली. जोपर्यंत काँग्रेस सामान्य जनतेत पोहोचून तिला लोकमान्यता प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता पुढार्‍यांनी समोर आले पाहिजे, अशी टिळकांची भूमिका होती. आता काँग्रेसचे जुने राजकारण मागे टाकून नवीन राजकारणास सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन काँग्रेसला सामान्य नागरिकांचे पाठबळ मिळावे, काँग्रेस ही जनतेचे प्रतिनिधित्व करणारी संस्था बनावी आणि तिचे राजकारण घराघरात पोहोचावे यासाठी प्रयत्न सुरु केले.


१८८६ पासून काँग्रेसची प्रांतिक परिषदे भरवण्यात येऊ लागली. महाराष्ट्रात जहाल विचारसरणीच्या प्रसारासाठी प्रांतिक परिषदांचा उपयोग करून अनेक लोकांना आपल्यात सामील करून घेण्याचे कार्य टिळकांनी अवलंबिले. या परिषदेचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, “वर्षातून एकदा जमणार्‍या हजार-पाचशे लोकांच्या राष्ट्रसभेने एखादे मागणे केले, म्हणजे सरकार लागलीच कबुल होईल असे नाही. प्रत्येक प्रांतातून,जिल्ह्यातून इतकेच काय तर खेड्यातूनही तशा प्रकारचे अर्ज केले पाहिजे तरच त्या मागण्यांना काही वजन येणार आहे आणि या विचारसरणीला अनुसरून त्यांनी आपले कार्य आरंभिले. प्रांतिक अधिवेशनात अनेक अनुयायी सोबत घेऊन झंझावाती प्रचार करण्याची सुरुवात त्यांनी केली. पावसाळ्यात बेडूक ओरडतात, त्याप्रमाणे वर्षातून एकदा ओरडून फायदा नाही. त्यासाठी सातत्याने व नेटाने खटपट केली पाहिजे. आता आमच्या मागण्या कायदेशीररीत्या सरकारच्या डोक्यात घुसवणे काँग्रेसचे प्रमुख कार्य आहे,” असे टिळकांचे म्हणणे होते.


काँग्रेस अंतर्गतच जहाल आणि मवाळ पक्ष निर्माण झाले होते. दोन्हीही पक्षांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्यांच्या कार्यात तात्त्विक भेद होता. मवाळांचा सरकारच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता त्यामुळे त्यांच्या मर्जीत राहूनच, सनदशीररित्या सुधारणा आपल्या पदरात पाडून घ्याव्या अशी त्यांची भूमिका होती. याउलट टिळकांच्या नेतृत्वाखाली नव्याने उदयास आलेल्या जहाल गटाचे असे मत होते की, स्वतंत्र देशातील सनदशीर चळवळ आणि परतंत्र देशातील सनदशीर चळवळ यात फरक आहे. स्वतंत्र देशात सनदशीर चळवळीकडे राज्यकर्ते लक्ष देतात, पण भारतासारख्या परतंत्र देशात ते अजिबात लक्ष देत नाहीत. त्यामुळे नि:शस्त्र प्रतिकाराची आता वेळ आली आहे असे सांगून काँग्रेसला कार्यप्रवण बनवणे हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. कालानुरूप संघटनेत वा चळवळीत बदल करावे लागतात. परंतु, हे बदल करावयास मवाळ नेते तयार नव्हते. जहालांबरोबर राहिले तर इंग्रज सरकार दुखावेल, दडपशाही वाढेल त्यामुळे जहालांना काँग्रेसमध्ये राहूच देऊ नये असे मवाळांना वाटू लागले होते. टिळक म्हणतात, “सरकार चिडेल हा मंत्रच पायाशुद्ध नसून अनर्थकारक आहे असे आमचे मत आहे. काँग्रेस ही हिंदुस्थानातील सर्व लोकांच्या वतीने सरकारजवळ हक्क मागण्याकरिता भांडण्यासाठी निर्माण झाली आहे. सरकार किंवा सरकारी अधिकार्‍यांस रुचेल अथवा ते चिडले जाणार नाहीत अशा रीतीनेच जर काँग्रेसचे काम चालवायचे असेल तर तिची काय गरज? जर मवाळांना जहालांचे राजकारण पटत नसेल तर तिने काँग्रेसमध्ये राहूनच तीत आपले बहुमत स्थापन करायला हवे आणि आपले वर्चस्व प्रस्थापित करायला हवे,” असे टिळक म्हणतात.


हिंदुस्तान शस्त्रबळानेच जिंकण्यात आला आहे आणि तो शस्त्रबळानेच टिकवता येईल अशा उन्मत्त ब्रिटिश अधिकारांच्या वल्गना ,देशाचे मोठ्या प्रमाणात चाललेले आर्थिक शोषण, सुधारणांविषयी सरकारची असणारी अनास्था आणि या सर्व बाबतीत काँग्रेसला येत असलेले अपयश यांमुळे टिळक आणि त्यांचा जहाल गट अस्वस्थ झाला होता. काँग्रेसच्या निष्क्रियतेवर बोट ठेऊन तिच्या अपयशाची कारणमीमांसा करताना टिळक म्हणतात, “इंग्लंड व हिंदुस्थान या दोन्ही देशात सबंध वर्षभर एकसारखी चळवळ सुरु ठेऊन इंग्रज लोकांस सळो की पळो केल्याखेरीज ‘भिक नको पण कुत्रा आवर’ या न्यायाने यांस काहीतरी द्या, अशा पेंचात त्यांस घातल्याखेरीज तुम्हांस यशप्राप्ती व्हावयाची नाही.काँग्रेस सभा काढली तेंव्हा तिचा उद्देश हाच होता, पण दुर्दैवाने आता तिला वार्षिक श्राद्धाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. या घोषणेने संपूर्ण बंगाल खवळून निघाला, सरकारच्या या भेदनीतीवर कडक शब्दात निषेध व्यक्त केला गेला. परंतु आता फक्त बोलून चालणार नव्हते तर प्रत्यक्ष कृतीची गरज होती.”


ज्या आशावादावर विश्वास ठेऊन काँग्रेसचे कार्य पहिले २० वर्ष चालविण्यात आले तो आशावाद आता धुळीस मिळाला होता, आता नवीन परिथिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नवा कार्यक्रम, नवे नेतृत्व यांची देशाला गरज होती आणि टिळकांच्या माध्यमातून ते नेतृत्व उदयास येत होते. बंगालमध्ये जी जनशक्ती उसळली होती ती संपूर्ण देशभर पसरवण्याचे कार्य टिळकांनी आरंभिले. आपले नि:शस्त्र प्रतिकाराचे तत्वज्ञान काँग्रेसच्या गळी उतरवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वदेशी आणि स्वराज्य या चतु:सूत्रीच्या झंझावाती प्रचारास त्यांनी सुरुवात केली. आणि हे चतु:सूत्रीचे ठराव कोलकात्त्याच्या आगामी अधिवेशनात पारित व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले. अध्यक्षपदासाठी टिळकांचे नाव सुचवण्यात आले. परंतु, मवाळ गटाने ते अमान्य करून पितामह दादाभाई नौरोजी यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला व तो मंजूरही झाला. परंतु, या अधिवेशनात चतु:सुत्रीचे सर्व ठराव पारित करण्यात आले मवाळांना हे सर्व अनपेक्षित होते आणि खरेतर हा टिळकांच्या विचारसरणीचा, झंझावाती प्रचाराचा, लोकसंघटनेचा विजय होता. अशाप्रकारे स्वदेशी, बहिष्काराचे आंदोलन बंगालपुरतेच मर्यादित न राहता काँग्रेसने हाती घेतल्यामुळे त्याला राष्ट्रव्यापी स्वरूप प्राप्त झाले.


१८९६ पासून सुरु झालेला जहाल-मवाळ संघर्ष आता पराकोटीला पोहोचला होता आणि काँग्रेस दुभंगण्याचे अनेक प्रसंग निर्माण झाले होते. परंतु, टिळक, लाला लजपतराय यांनी एका बाजूला आणि ना. गोखले यांनी दुसर्‍या बाजूला ही दोर घट्ट पकडून ठेवली. जर काँग्रेसमधून दोन वेगवेगळे गट बाहेर पडले तर ते देशासाठी घातक आहे हे टिळकांना माहीत होते आणि त्यामुळे मोठ्या कौशल्याने आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी भावनेच्या आहारी जाऊ न देता पुन्हा आपल्यात सामावून घेतले. जर काँग्रेसचे विभाजन होऊ द्यायचे नसेल तर कोलकात्ताला झालेले चतु:सूत्रीचे सर्व ठराव सुरतच्या आगामी अधिवेशनात पारित व्हायला हवेत अशी टिळकांची भूमिका होती, याच सुमारास कोलकत्ता अधिवेशनात पारित झालेले ठराव देशाला पेलण्याजोगे नाहीत असा अभिप्राय व्यक्त करण्यास ना.गोखले यांनी सुरुवात केली. मवाळ गटाच्या या धोरणाला तोंड देण्यासाठी जहालगटाने आपला चतु:सूत्रीचा प्रचार चालूच ठेवला व आपल्याला जास्तीच जास्त लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न चालू ठेवले. सुरत हा फेरोजशहा मेहतांचा बालेकिल्ला त्यामुळे अधिवेशनाचे नेतृत्व मवाळांकडे जाणार होते. याच सुमारास विषयनियामक समितीत मागील चार प्रमुख ठरावांचा समावेश न केल्याची बातमी पसरली. त्यामुळे जहालांमध्ये जास्तच साशंकता पसरली. काही तरुण जहाल राष्ट्रवादी गटाने जहालांची वेगळी काँग्रेस मांडण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, काँग्रेस मोडणे हे योग्य ठरणार नव्हते व त्यामुळे टिळकांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केले. अधिवेशनाच्या उद्घाटनापूर्वी लालाजी आणि टिळक यांनी सुरेंद्रनाथ आणि गोखले यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी टाळाटाळकरण्यास सुरुवात केली. त्यामुळे या शंकांना जास्तच उत आला. रासबिहारी घोषांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवण्यात आले तेव्हा बंगाली तरुण नेत्यांनी विरोध दर्शवला व सभा बारगळली. पुढच्या दिवशी टिळकांनी व्यासपीठावर एक चिट्ठी माळवींकडे पाठवली व आपल्याला अध्यक्षांच्या निवडीबाबत बोलायचे आहे असे सांगितले माळवींनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे टिळक स्वतःच व्यासपीठावर चढले आणि माइक आपल्या हाती घेतला तोच एकच गोंधळ उडाला, खुर्च्या फेकल्या गेल्या आणि अधिवेशन बारगळले. या घटनेनंतरही टिळकांनी समेटाचे प्रयत्न केले. परंतु, मवाळांनी त्यांना दाद दिली नाही. काँग्रेसचे विभाजन झाले आणि याच दरम्यान इंग्रज सरकारने टिळकांवर खटला भरून त्यांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली.


टिळक मंडालेत असताना १९०८ ते १९१४ या दरम्यानचे सर्व राजकारणाला मरगळ आली होती. काँग्रेस पुन्हा जुनेच राजकारण करू पाहत होती. सरकारवर असलेला दबाव आता कमी झाला आणि हजारोच्या संखेत अधिवेशनास उपस्थित राहणार्‍या लोकांची संख्या एकदमच कमी झाली. १९०७ साली सुरत अधिवेशनास जवळपास १६०० प्रतिनिधी विविध प्रांतातून आले होते परंतु हीच संख्या रोडावत जाऊन १९१२ साली २०७ वर आली.याच दरम्यान काँग्रेसच्या निष्क्रियतेविरूद्ध स्टेट्समन या वृत्तपत्राने आपला अभिप्राय व्यक्त केला तो असा काही वर्षांपूर्वी भारताच्या सार्वजनिक जीवनात प्रभावशाली भूमिका बजावणारी काँग्रेस आता प्रभावी राहिलेली नाही.


१९१४ मध्ये टिळकांची मंडालेतून सुटका झाली. आता जहालांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. यासाठी त्यांनी ना.गोखले यांची भेट घेऊन आपल्या काँग्रेसच्या प्रवेशाबाबत अनुकूलता दर्शविली ना. गोखले यांनी टिळकांना विरोध केला व कृपया तुम्ही काँग्रेसमध्ये येऊ नका असे सांगितले. त्यावर टिळक म्हणाले, “मी काँग्रेसमध्ये येणार आणि ती काबीज करणार. ज्या काँग्रेसने आपल्याला दूर केले त्या काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश का करायचा अशी टिळकांच्या सहकार्यांचीही भूमिका होती. परंतु आपण काँग्रेसच्या बाहेर राहून नवीन पक्ष स्थापन केला तर मवाळ(काँग्रेस), मुस्लीम लिग आणि आता त्यात जहाल पक्षाची भर पडणार होती, याचा फायदा घेऊन ब्रिटिश सरकार पुन्हा अंतर्गत दुही माजवणार हे टिळकांना माहीत होते. त्यामुळे असे करणे देशहिताचे होणार नव्हते.१९१५ मध्ये ना. गोखले आणि फेरोजशह मेहता या दोन प्रमुख मवाळ नेत्यांचा मृत्यू झाला आणि काँग्रेसची सूत्रे टिळकांच्या हातात आली आणि इथून खर्‍या अर्थाने काँग्रेस मधील टिळक युगाची सुरुवात झाली. जी काँग्रेस एक थंड गोळा होऊन पडली होती त्याला उब देण्याचे कार्य टिळकांनी सुरु केले. होमरूलचा ठराव काँग्रेसमध्ये सामील करून भारतभर दौरा करून स्वराज्याचा झंझावाती प्रचारास त्यांनी सुरुवात केली.


जोपर्यंत समाजातील प्रत्येक वर्गाला, व्यक्तींना आपण काँग्रेसमध्ये सहभागी करून घेत नाही तोपर्यंत स्वराज्य प्राप्ती कठीणच होती हे टिळकांना माहीत होते. त्यातच जातीजातीत, धर्माधर्मात भेद करण्याचे काम ब्रिटिश सरकार करू पाहत होती, किंबहुना हीच त्यांची नीती होती. १९०९ साली मोर्ले-मिंटो कराराद्वारे सरकारने मुसलामांना काँग्रेसपासून वेगळे केले होते आणि लखनौ करारात सरकारला शह देऊन मुसलमांना काँग्रेसमध्ये सामील करून घेण्याचे काम टिळकांनी केले या अधिवेशनात प्रसिद्ध लखनौ करार झाला.


त्याचप्रमाणे ब्राह्मणेतर चळवलींनाही स्वराज्य कार्यात सामील करून घेणे गरजेचे होते.आणि यासाठी विठ्ठल रामजी शिंदे हे टिळकांच्या मदतीस धावून आले. टिळकांच्या स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी कर्मवीर शिंद्यांनी शनिवारवाड्यावर अठरा पगडजातींच्या लोकांची व वारकरी संप्रदायाची सभा आयोजित केला. ब्राह्मणांचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी टिळकांना उपस्थित राहण्याची विनंती केली. टिळकांनी मोठ्या मनाने ही विनंती मान्य केली. या अधिवेशनात त्यांनी सर्व मतभेद, पूर्वग्रह विसरून जाऊन सर्वांनी स्वराज्याच्या कामाला लागायला हवे असे सांगितले. ते म्हणाले, “आता आपल्याला जे स्वराज्य पाहिजे आहे, ते पूर्वीच्या पेशवाईसारखे स्वराज्य नव्हे तर पाश्चात्य धर्तीवरील स्वराज्य पाहिजे. भावी स्वराज्यात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांना सारखेच हक्क आणि त्यांचा दर्जा सारखाच राहील.” एकतेचं महत्त्व सांगून सरकारची भेदनीती उघड करताना ते म्हणतात, “चार बैल एकजुटीने होते, तोपर्यंत सिंहाचे काही चालत नव्हते. तेव्हा त्याने त्यांच्यात फूट पडली व एकेकास खाऊन टाकले. इंग्रज हा सिंह आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार बैल!”


पुढे शिंद्यांच्याच पुढाकाराने अस्पृश्यता निवारणाची स्वतंत्र परिषद घ्यायचे ठरले. २४ मार्च, १९१८ च्या परिषदेत टिळकांनी काँग्रेसने अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी घेऊन आपल्या कार्यास त्यांचा पाठिंबा मिळवावा असा ठराव मांडला पुढे त्यांचे जोरदार भाषण झाले. टिळक म्हणतात, “जुन्या काळात ब्राह्मणांच्या जुलमाने ही चाल पडली हे मी नाकारत नाही; पण या रोगाचे आता निर्मूलन झालेच पाहिजे,अस्पृश्यता देवासही मान्य नाही. ब्राह्मणांसकट सार्‍या जाती जर त्यानेच निर्माण केल्या असतील तर त्याला कशी मान्य असेल अस्पृश्यता? अस्पृश्यता जर देवास मान्य असेल तर मी त्यास देवच मानणार नाही.”


विठ्ठलराव शिंदे म्हणतात, “या त्यांच्या गर्जनेने जो गजर सभेत उडाला त्यांत मंडप कोसळून पडतोसे वाटले अशा प्रकारे टिळकांनी सर्वच जातींतील, धर्मांतील लोकांना स्वराज्य कार्यात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न केले आणि देशासाठी सर्वांनी एक व्हावे असे आवाहन केले. ”


टिळक आपल्या कारकिर्दीत काँग्रेसचे अध्यक्ष कधीही झाले नाही परंतु ज्याप्रमाणे एक नेता आपल्या देशाला, समाजाला, संघटनेला संघटित करून सतत कार्यरत राहतो त्याचप्रमाणे टिळकांनी काँग्रेसला कार्यप्रवण बनवले. त्यांनी काँग्रेसचे मवाळ राजकारण जहाल करून काँग्रेसला खर्‍या अर्थाने लोकमान्यता मिळवून दिली. न. चिं. केळकर म्हणतात त्याप्रमाणे आम्ही भांडू पण मोडणार नाही आणि तुम्ही मोडले तर आम्ही पुन्हा जोडू अशी टिळकांची भूमिका होती. काँग्रेसचे विभाजन झाल्यावरही समेटाचे अनेक प्रयत्न त्यांनी केले. काँग्रेसला कायम जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. टिळकांच्या तुरुंगवासापासून खर्‍या अर्थाने एका वेगळ्या क्रांतीला सुरुवात झाली. आपल्या मागणीपाठोपाठ लोकसंघटनेची शक्ती पाहिजे व त्यासाठी नेत्यांनी, पुढार्‍यांनी स्वार्थाचा विचार न करता पुढे आले पाहिजे. ही विचारसरणी काँग्रेसच्या राजकारणात प्रविष्ट करण्याचे पहिले श्रेय लोकमान्यांचेच!



- कौस्तुभ वाकोडकर



संदर्भ-
१. आधुनिक भारत-आचार्य जावडेकर
२. टिळक विचार- भा.कृ केळकर
३. लोकमान्य ते महात्मा- डॉ. सदानंद मोरे
४. महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्रलढा -डॉ.सुमन वैद्य,डॉ.शांता कोठेकर








@@AUTHORINFO_V1@@