लोकमान्यांचे शिक्षणविषयक धोरण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jul-2020
Total Views |
Lokmany 3_1  H



ज्यांनी टिळक चरित्राचे प्राथमिक का होईना, वाचन केले आहे, त्यांना हे माहितीच असेल की, विद्यार्थीदशेतून बाहेर पडल्यापडल्या लोकमान्यांनी आपले पाऊल कुठे टाकले, तर ते शिक्षणक्षेत्रात. महाविद्यालयात असताना टिळक-आगरकरांना राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा काढली पाहिजे, ही गरज जाणवली होती. लोकमान्य टिळकांच्या कार्यावरून आणि विचारांवरून त्यांचे शिक्षणव्यवस्थेबाबतचे विचार किती चौफेर आणि सर्वव्यापी होते, हे दिसून येते. सरकारी हमालखाने बंद करून खरी विद्यापीठे निर्माण करण्यासाठी लोकमान्यांनी शक्य होते तेवढे सतत आधी स्वतः केले मग इतरांना सांगितले.


‘लोकमान्य टिळक’ हे नाव भारतीय स्वातंत्र्याच्या महाभारतात श्रीकृष्णासमान आहे. त्या धामधुमीच्या काळात टिळकांनी इतक्या विविध क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटवला होता की, त्यांचे चरित्र म्हणजे युद्धाला सुरुवात होण्याआधी अर्जुनाला झालेले कृष्णाचे विश्वरूपदर्शनच! ‘टिळक’ नाव ऐकता क्रांतिकार्य, समाजकार्य, अध्यापनकार्य, पत्रकारिता, राजकीय नेतृत्त्व, प्रखरपांडित्य अशी न संपणारी यादी डोळ्यांसमोर अगदी सहज उभी राहते. या सगळ्यांमधून लोकमान्यांचा कुठला पैलू तुलनेने दुर्लक्षित राहिला असेल, तर तो म्हणजे त्यांचे शिक्षणक्षेत्रातील असीम योगदान.


ज्यांनी टिळकचरित्राचे प्राथमिक का होईना, वाचन केले आहे, त्यांना हे माहितीच असेल की, विद्यार्थीदशेतून बाहेर पडल्यापडल्या लोकमान्यांनी आपले पाऊल कुठे टाकले, तर ते शिक्षणक्षेत्रात. महाविद्यालयात असताना टिळक-आगरकरांना राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा काढली पाहिजे, ही गरज जाणवली होती. त्यासाठी प्रथमतः त्यांनी महादेव गोविंद रानड्यांचा सल्ला घेतला. या द्वयीच्या कार्याला रानडे अनुकूल असले, तरीही वासुदेव बळवंत फडक्यांच्या क्रांतिकार्यात हात असल्याच्या संशयावरून सरकारचा ससेमिरा रानड्यांच्या मागे लागला होता आणि त्यापायी त्यांना धुळ्यास जाऊन राहावे लागले होते. अशा कोणत्याच कारणाने कार्य अडकून पडू नये, ही इच्छा टिळक-आगरकरांची होती. तेव्हाच, ‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर हे सरकारी नोकरी सोडून पुण्यात नवीन शाळा काढण्यास उत्सुक आहेत, ही बातमी या द्वयीला लागली, आणि ते चिपळूणकरांना जाऊन भेटले; व अशा कर्मधर्मसंयोगातून जन्मास आले ‘न्यू इंग्लिश स्कूल.’


मोरोबादादा फडणीसांच्या वाड्यात १ जानेवारी, १८८० ला सुरु झालेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ने अल्पकाळात यशाची अनेक शिखरे गाठली. नुसती विद्यार्थी पटसंख्याच म्हणायची, तर चार वर्षांमध्ये ती १००९ वर पोहोचली होती. तेवढ्याच काळात उत्तीर्ण होणार्‍या मुलांची टक्केवारी ८९ वर पोहोचली. (मराठीतील पहिले कादंबरीकार हरी नारायण आपटे आणि इतिहासाचार्य विश्वानाथ काशिनाथ राजवाडे, हे या शाळेतून मॅट्रिक झालेल्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी होते.) ‘एज्युकेशन कमिशन’चा अध्यक्ष विल्यम हंटर हा या शाळेबाबत बोलताना म्हणाला, “या शाळेचा उत्कर्ष पाहता, मी असे खात्रीने म्हणू शकतो की, हिच्या तोडीची एकही शाळा मला सर्व हिंदुस्तानात दिसून आली नाही.” आपल्या देशाबद्दल अभिमान, आपल्या इतिहासाबाबत जाण आणि आपल्या संस्कृतीबाबत आस्था, अशा गुणांनी परिपूर्ण असलेली नवीन पिढी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ला तयार करायची होती आणि यासोबतच, कारकुनीपणा घालवून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्याची ताकद नव्या पिढीत टिळकांना भरून टाकायची होती.


‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये प्राध्यापक म्हणून शिकवीत असतानाच टिळकांनी १८८५ मध्ये, अभ्यासात मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक ‘प्रिपरेटरी वर्ग’ काढला होता. जो मोफत होता. ज्या मुलांचा अध्ययनाचा वेग हा वर्गात अध्यापनाच्या वेगापेक्षा खूप कमी होता, ज्यामुळे त्यांचे नुकसान होई- अशा विद्यार्थ्यांसाठी हा वर्ग होता. अशांना पुढे प्रौढ झाल्यावर पोटापाण्याच्या उद्योगालाही लोकमान्य आपणहून लावून देत.


अशा प्रकारे यशस्वी ठरलेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’मधून १८८५ साली ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ जन्माला आली. ज्यांतर्गत पुण्यातील सुप्रसिद्ध ‘फर्ग्युसन कॉलेज’ची स्थापना झाली. पुढे अंतर्गत वादांमुळे टिळक ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’पासून वेगळे झाले. तरी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या स्थापनेपर्यंत त्यांचे योगदान देदीप्यमान होते. ‘न्यू इंग्लिश स्कूल’ सुरू केल्यावर थोड्याच वेळात टिळकांनी संपादकपद हाती घेतले होते. ‘केसरी’ आणि ‘मराठा’च्या माध्यमातून टिळक आणि आगरकर आपले विचार लोकांपुढे आणत होते. सुरुवातीला ‘केसरी’चे संपादक आगरकर होते, परंतु, ती जबाबदारीही पुढे टिळकांनी घेतली आणि त्या माध्यमातून आपले शिक्षणव्यवस्थेबाबतचे विचार त्यांनी मांडले.


‘आपल्या युनिव्हर्सिट्या उर्फ सरकारी हमालखाने’ या लेखात लोकमान्य लिहितात की, “....उच्चप्रतीचे जे शिक्षण हिंदुस्तानातील लोकांस द्यावयाचे, ते त्यांस विद्वत्तेच्या शिखरावर पोहोचविण्याकरिता नव्हे, तर सरकारास खालच्या प्रतीच्या जागा भरण्याकरिता जशा प्रकारचे नोकर लागतात, तशा प्रकारचे नोकर तयार करण्याकरिता होय, हे तत्त्व आता बहुतेक गृहीत धरल्यासारखेच झाले आहे. सारांश, युनिव्हर्सिट्या म्हणजे कनिष्ठ प्रतीच्या सरकारी नोकर्‍याकरिता लागणारे उमेदवार तयार करण्याच्या टांकसाळी किंवा हमालखाने होत.”


हे वाचता आपल्या लक्षात येते की, सरकारकडून मिळणारे शिक्षण किती का उच्च प्रतीचे असेना, हे फक्त आणि फक्त सरकारच्या भल्यासाठी- विद्यार्थ्याच्या भल्यासाठी नाही- असते, हे लोकमान्यांनी पुरेपूर ओळखले होते. याच लेखात लोकमान्य लिहितात की, “या शिक्षणक्रमात तयार झालेल्या लोकांना धर्म, नीती, शास्त्रीय शोध, धंदेशिक्षण वगैरे राष्ट्राच्या उत्कर्षास आवश्यक असणार्‍या ज्ञानाची व कलांची बिलकुल माहिती नसते.” आपल्या ‘खरे विद्यापीठ कोणते?’ या लेखातही लोकमान्य याच अनुषंगाने लिहितात. ते म्हणतात, “...शास्त्रांचा अभ्यास सतत व मनन करणारे पुष्कळ विद्वान ज्या ठिकाणी राहतात व त्यांची कीर्ती ऐकून दूरदूरचे शेकडो विद्यार्थी विद्यार्जनाकरिता जेव्हा त्यांजपाशी येतात, तेव्हा एखाद्या स्थलास विद्यापीठ, विद्यामंदिर, अथवा विद्याश्रम ही संज्ञा प्राप्त होते आणि या व्याख्येत त्याकाळातील सुधारलेल्या राष्ट्रांतील शिक्षणव्यवस्था बसत असून ‘लोकांनी तयार केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन आपले काम भागले असे सुधारलेल्या राष्ट्रातील युनिव्हर्सिट्यांस वाटत नाही.” असे लिहून टिळक इंग्रजांनी भारतात लादलेल्या शिक्षणव्यवस्थेवर ताशेरे ओढतात.


एखाद्या राष्ट्राची शिक्षणव्यवस्था कशी असावी, याबाबत लोकमान्यांचे विचार त्यांच्या उपरोक्त ‘खरे विद्यापीठ कोणते?’ या लेखाच्या सुरुवातीलाच जाणवतात. लोकमान्य लिहितात, “...हिंदुस्तान देश प्राचीनकाळी जेव्हा विद्या व कला यांविषयी प्रसिद्ध होता, तेव्हा या देशात विद्वानांचे मोठमोठे मठ असून तेथे रात्रंदिवस अनेक शास्त्रांचा व विद्यांचा अभ्यास नेहमी सुरु असे. बहुतेक क्षेत्राच्या ठिकाणी विद्वानांचा मोठा समुदाय असून त्यांचा सर्व काळ अध्ययन, अध्यापन व ग्रंथ-रचना यांत जाई. या गृहस्थांच्या तालमीत दुसरे पुष्कळ विद्वान तयार होऊन देशभर जात.” हा धागा घेऊनच लोकमान्यांनी पुढे लिहिले आहे, “...मुंबई युनिव्हर्सिटी १८५७ सालांत स्थापन झाली. पण, तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ४० वर्षांत या संस्थेतून एकही जगप्रसिद्ध विद्वान निघू नये हे आश्चर्य नव्हे काय?”


यावरून लोकमान्य टिळकांना एका शिक्षणव्यवस्थेकडून केवळ सरकारी नोकरीत डोके खुपसून निर्वाहसंतुष्ट असणारी पिढी तयार करणे, एवढे मान्य नसून, सर्वशास्त्रपारंगत गुरुगण आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले त्यांच्याच ताकदीचे हरहुन्नरी शिष्य, हे अभिप्रेत होते, हे स्पष्ट दिसून येते.


‘नेटिव्ह’ सैन्यात काम करणार्‍या भारतीयांसाठी लष्करी शिक्षणाची सोय व्हायला हवी, हेही लोकमान्यांनी मांडले होते. सैन्यात तीन-चार संख्या भारतीयांची, पण वरिष्ठ पदे सगळी युरोपियन अधिकार्‍यांनी व्यापलेली. तिथे भारतीयांना प्रवेश नाही. हा प्रकार कमी करण्यासाठी सैनिकांना लष्करी शिक्षण मिळावे, ही लोकमान्यांची इच्छा होती. आता कनिष्ठपदावर असलेल्या ‘नेटिव्हां’ना शिक्षण दिल्यास त्यांना वरिष्ठ जागेची हाव सुटणार नाही कशावरून? अशा गोरी-कातडी छाप प्रश्नाला उत्तर देताना लोकमान्य म्हणतात, “...विद्येच्या व शिक्षणाच्या प्रसाराने उद्भवणार्‍या इच्छा व गरजा सरकारास हळूहळू भागविल्या पाहिजेत. त्यामुळे, विद्येचा योग्य प्रसार करून त्यातून माणसांतील आकांक्षा उद्दीपित होतात,” हे लोकमान्य सांगतात आणि हळूहळू एक एक पायरी करत, शिक्षणातून चेतवलेल्या याच इच्छा-स्वातंत्र्याच्या भुकेला जागवतील, हे लोकमान्य पुरेपूर जाणून होते.


लोकमान्य टिळकांच्या कार्याचा एक लखलखता पैलू म्हणजे, त्यांची चतुःसूत्री. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चार सूत्रे म्हणजे इंग्रजी राज्यासाठी ‘Four Horsemen of Apocalypse’ होती, असे म्हणायला हरकत नाही. यातील राष्ट्रीय शिक्षणाच्या सूत्राचा पाया ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या पटांगणात घातला गेला होता. आयुर्वेद, संस्कृत, वेदाभ्यास, ज्योतिर्गणित यांसारख्या विषयांच्या अभावी तयार झालेली पोकळी भरून काढताना लोकमान्यांच्या राष्ट्रीय शिक्षणाला व्यावसायिक, औद्योगिक, तंत्रज्ञान, कृषी, संशोधन, इ. शिक्षणाबाबतही जवळीक वाटत होती. फक्त त्या सगळ्याचा वापर सरकारी कचेर्‍या झिजवण्यात न होऊन स्वदेशी विद्वानांची आणि स्वदेशी उद्योजकांची पिढी तयार करण्यात व्हायला हवा, अशी लोकमान्यांची भावना होती.


तंत्र आणि धंदे शिक्षणाबाबत लोकमान्यांना विशेष आस्था होती. ते म्हणत, “आज १०० वर्षांमध्ये आम्हाला साधी आगपेटी व आगकाड्या कशा कराव्यात, हे समजले नाही. त्यासाठी मोठी विद्वत्ता लागते असे नाही. साखरेचा धंदाही असाच आहे. मॉरिशस येथील उसाइतकाच आमचाही उस चांगल्या प्रतीचा आहे. पण, यापासून साखर तयार करण्याचे शिक्षण आम्हाला मिळत नाही.”


या वाक्यांतून लोकमान्यांची तळमळ जाणवते. हे कमी व्हावे यासाठी कुठेतरी आपला हातभार लागावा, म्हणून त्यांनी ‘पैसाफंड काच कारखाना’ उभा करताना त्यासोबतच व्यावसायिक शिक्षण देणारी शाळाही काढली होती. हिंदुस्तानसारखा कृषिप्रधान देश कृषितंत्रात मागे राहावा, ही बाब लोकमान्यांना क्लेशदायक होती. भारताचा शेतकरी कृषीशिक्षणात परिपूर्ण हवा, हे सांगताना लोकमान्य म्हणतात, “टीचभर जमिनीवर पिकाची लागवड करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवू शकेल, असे शिक्षण त्याला देणे आवश्यक आहे.”


लोकमान्य टिळकांच्या या सगळ्या कार्यावरून आणि विचारांवरून त्यांचे शिक्षणव्यवस्थेबाबतचे विचार किती चौफेर आणि सर्वव्यापी होते, हे दिसून येतेच. सरकारी हमालखाने बंद करून खरी विद्यापीठे निर्माण करण्यासाठी लोकमान्यांनी शक्य होते तेवढे सतत स्वतः केले, इतरांना सांगितले. अहो, लोकमान्यांची शिक्षणाबाबतची आस्था एवढी प्रचंड होती की, जेव्हा त्यांचा मानसपुत्र, जगन्नाथ महाराज पंडित, ज्याच्या बाजूने लोकमान्यांनी वर्षानुवर्षे खटला लढवला होता, त्यांना एक परतफेड म्हणून काही देऊ लागला, तेव्हा लोकमान्य त्याला म्हणाले, “महाराज (जगन्नाथ), तुमची इतकी इच्छाच असेल तर असे करा. मला काही नको. तुमची सदाशिव पेठेतील बंगलाबागेची जागा शैक्षणिक कार्यासाठी ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ला द्या. ही जागा दिली म्हणजे माझे पैसे मला पोचले असे मी समजेन.” आणि याच बंगलाबागेच्या जागेवर आज उभे आहे, ते म्हणजे सुप्रसिद्ध ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालय.’ टिळकांच्या कृतीतून आणि लेखणीतून उतरलेल्या या सगळ्या तत्त्वांवरून हे प्रकर्षाने जाणवते की, ते देशभक्त, धोरणी, द्रष्टे आणि मुख्य म्हणजे ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ हे शब्द अंगी बाणवलेले एक हाडाचे शिक्षक होते!



- शुभंकर अत्रे


संदर्भ :
१) लोकमान्य- न. र. फाटक
२) लोकमान्य टिळक यांचे चरित्र (खंड १)- न. चिं. केळकर
३) लोकमान्य टिळक लेखसंग्रह - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
४) Bal Gangadhar Tilak- T. V. Parvate
५) लोकमान्यांचा मानसपुत्र - बाळ ज. पंडित
६) लोकमान्य टिळक - धनंजय कीर
७) आधुनिक भारताचे शिल्पकार: लोकमान्य बाल गंगाधर टिळक - डॉ. दीपक ज. टिळक




@@AUTHORINFO_V1@@