हर धंदा गंदा नहीं होता...(उत्तरार्ध)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jun-2020
Total Views |




‘ये टीव्हीवाले कुछ भी दिखाते है साब।’ नुकत्याच रिलिज झालेल्या ‘पाताललोक’ वेबसिरीजमधला हा डायलॉग आहे. कदाचित यामुळेच टीव्हीची लोकप्रियता घसरणीला लागली आणि टीव्हीची जागा वेबसिरीजने घेतली. त्यातच या ‘लॉकडाऊन’च्या काळात वेबसिरीजची लोकप्रियता आणखीनच वाढीस लागली आहे. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे या भागात वेबसिरीजची चांगली बाजू आपल्यासमोर मांडत आहोत.



आधीच्या भागात नमूद केल्याप्रमाणे भारतीय बाजरपेठ ही सगळ्याच जागतिक ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’ना खुणावणारी आहे. त्यातूनच ‘नेटफ्लिक्स’, ‘हॉटस्टार’ यांसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सनी भारतीय प्रादेशिक कथानकांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरु केली. स्मार्टफोन आणि 4-जीच्या जमान्यात ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ आणखीनच प्रेक्षकांच्या जवळ आले आहेत. मुंबईत दररोज लोकलमधून प्रवास करणार्‍या पाच पैकी तीन जण तर आपल्या प्रवासात वेबसिरीज बघताना आपल्याला आढळून येतील. वेबसिरीजच्या माध्यमातून अनेक नवीन कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्याचे हक्काचे व्यासपीठच उपलब्ध झाले. मुळात वेबसिरीजमध्ये काम करणारे बहुतांशी कलाकार हे कोणत्याही पिढीजात कलाकार कुटुंबातून आलेले नव्हते. त्यामुळेच सर्वसामान्य प्रेक्षकांना त्यांचा सहजसुंदर अभिनय भावला. मिथिला पालकर, अली फैझल, जितेंद्र कुमार, सुमीत व्यास, निधी सिंग असे अनेक नवीन कलाकार यामुळे प्रकाशझोतात आले.


वेबसिरीज केवळ हिंसाचार, अतिरंजित लैंगिक प्रसंग, गुन्हेगारी इतक्यापुरत्याच सीमित नाही. अर्थात, अशा कथानकांच्या वेबसिरीजची संख्या तुलनेने जरी जास्त असली, तरी अनेक आशयबद्ध वेबसिरीजसुद्धा अनेक ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वरून प्रदर्शित झाल्या आहे. यातल्या अनेक वेबसिरीज या प्रेक्षकवर्गाच्या खर्‍या जीवनावर, रोजच्या जगण्यातील अडचणींवर आधारित आहेत. नुकतीच ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर आलेली ‘पंचायत’ ही वेबसिरीज त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. दिल्लीसारख्या राजधानीच्या शहरात राहिलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या एका मुलाची गावच्या ग्रामपंचायतीच्या सचिव पदावर नेमणूक होते. कधीही गाव काळं का गोरं न पाहिलेला तरुण मुलगा फुलेरा नावाच्या गावात दाखल होतो. नंतर त्याची गावातल्या लोकांबरोबर जुळवून घेताना होणारी धडपड, उत्तर भारतातील ग्रामीण जीवन याची सुरेख मांडणी या वेबसिरीजमध्ये करण्यात आली आहे. सतत आयुष्यातल्या अडचणींच्या तक्रारींचा पाढा वाचणार्‍या मुलाच्या आयुष्यात कसा सकारात्मक बदल घडतो, याचे वर्णन यात आहे. माझ्या पाहण्यात आलेल्यांपैकी ‘पंचायत’ ही सर्वोत्कृष्ट भारतीय प्रादेशिक वेबसिरीज आहे.



‘कोटा फॅक्टरी’ हीसुद्धा अशीच एक छान कथानक असलेली वेबसिरीज आहे. आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या किंवा घरापासून दूर राहून हॉस्टेल लाईफ जगलेल्या प्रत्येक तरुण मुलामुलींची कथा ‘कोटा फॅक्टरी’मधून मांडण्यात आली. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी इटारसीवरून भारतातल्या आयआयटी प्रवेश परीक्षांच्या क्लासेसचं हब असणार्‍या कोटा गावात येतो आणि मग पुढे त्याचा आयआयटी प्रवेशाचा संघर्ष यात दाखविण्यात आला आहे. यातल्या जितू सिंगचा एक डायलॉग खूप गाजला- “बच्चे 2 साल में कोटा से निकल जातें है! कोटा सालों तक बच्चोसे नही निकलता।” राघव सुब्बू दिग्दर्शित ‘कोटा फॅक्टरी’ पहिली ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट भारतीय वेबसिरीज आहे. हॉस्टेलवर राहिलेल्या प्रत्येक मुलामुलींना ही वेबसिरीज त्यांच्याच आयुष्याचा भाग वाटली.


मुंबई हे अनेकांसाठी स्वप्नपूर्ती करणारे शहर. रोज अनेक जण आपआपले स्वप्न उराशी बाळगत या शहरात दाखल होतात, काहींची स्वप्न पूर्ण होतात, तर काहींच्या पदरी निराशा पडते. ‘गर्ल इन द सिटी’ ही अशाच अनेक मुंबईकरांवर आधारित वेबसीरिज. डेहरादूनवरून या स्वप्ननगरीत नाव कमविण्यासाठी आलेल्या एका तरुण मुलीची कथा यात मांडण्यात आली आहे. आपापल्या घरादारापासून दूर राहणार्‍या अनेक मुंबईकर तरुण तरुणींची रोजची कहाणी यातून अत्यंत कलात्मकरित्या मांडण्यात आली आहे. सोकॉल्ड "women empowerment'च्या नावाखाली प्रदर्शित झालेल्या ‘फॉर मोअर शॉर्ट्स’पेक्षा ‘गर्ल इन द सिटी’ ही वेबसिरीज भारतातील महिला सशक्तीकरण आणि त्यातील सकारात्मक बाजू कित्येकपटीने प्रभावीरीत्या मांडते.


कलाकारांचा आणि माध्यमांचा भारतीय समाजजीवनावर प्रचंड पगडा आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येक घटकाने आपली कलाकृती प्रदर्शित करताना याचा समाजजीवनावर काय परिणाम होणार आहे, याचा विचार करणे अत्यंत गरजेचे बनते. अनेक संशोधनातून आणि अभ्यासातून वाढती गुन्हेगारी आणि माध्यमांचा त्यावर असलेला प्रभाव अधोरेखित झालेला आहे. कोणतीही कलाकृती ही त्या त्या काळातील समाजाचे प्रतिबिंब असते, असे म्हणतात. पण, अनेक नकारात्मक कथानक असणार्‍या वेबसिरीजमधून दाखवण्यात येणारे अतिरंजित प्रसंग ही खरंच वास्तविकता आहे का? हा प्रश्न सर्व सुजाण भारतीय नागरिकांनी माध्यमांना विचारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


त्याचप्रमाणे याआधीच्या लेखात, माध्यम तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने, त्यांना हवा त्या दिशेने विचार करण्याला प्रवृत्त करतात, यामुळे माणसाच्या विचार करण्याच्या नैसर्गिक पद्धतीला यामुळे खीळ बसते, असे मी नमूद केले होते. परंतु, ही परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. सोशल मीडिया आणि 4-जी क्रांतीमुळे चांगल्या सकरात्मक वेबसिरीजची माहिती अनेकांपर्यंत पोहोचविणे फारच सोपे झाले आहे. चांगली कलाकृती प्रदर्शित करणे ही जशी माध्यमकर्मींची जबाबदारी आहे, तसेच चांगल्या आणि सकारात्मक कलाकृतींचा प्रसार करणे, ही सुजाण प्रेक्षकांचीदेखील जबाबदारी आहे. हिंसक आणि अतिरंजित प्रसंग असले, तरच वेबसिरीजला प्रसिद्धी मिळेल हा लेखक/दिग्दर्शकांचा दृष्टिकोन बदलण्याची जबाबदारी चोखंदळ प्रेक्षकांची आहे.



 
 
 
वेबसिरीजने नक्कीच प्रस्थापित माध्यम क्षेत्रात क्रांती घडवली आहे. पण, अर्थात जशा कोणत्याही क्रांतीचे फायदे आणि तोटे हे दोन्ही असतात. या क्रांतीचा फायदा कसा करून घ्यायचा आणि भारतीय माध्यम क्षेत्राला जागतिक पातळीवर कशा प्रकारे वरच्या स्थानावर नेऊन ठेवता येईल, याची जबादारी लेखक/दिग्दर्शक तसेच प्रेक्षक या दोन्ही स्तंभांची असणार आहे.


- सुमेध हिंगे
@@AUTHORINFO_V1@@