मुंबई : लॉकडाऊन घोषित झाल्यापासून गैरहजर असलेल्या ६०० कामगारांना बेस्ट प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कामगारांसाठी बेस्टने बस सुरू ठेवल्या आहेत. मात्र कामगार मोठ्या प्रमाणात गैरहजर असल्याने बस चालविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने ६०० कामगारांना नोटिसा पाठविल्या असल्याची माहिती बेस्टने दिली.
लॉकडाऊन पूर्वी रस्त्यावर २८०० बेस्ट बस धावत होत्या. ही संख्या लॉकडऊनच्या काळात १७०० पर्यंत घसरली. मात्र सोमवारपासून बेस्ट बस सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर प्रवाशांची झुंबड उडत आहे. पण कामगार कमी असल्याने बसेस रस्त्यावर काढता येत नाहीत. सध्या अडीच हजार बसेस सोमवारपासून रस्त्यावर धावत आहेत. एवढ्या गाड्या चालविण्यासाठी कामगारांची कमतरता आहे. त्यामुळेच कामगारांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
बेस्टचे बहुतांश कामगार मुंबईबाहेर राहत आहेत. काही कामगार गावी गेले आहेत. मुंबईत असलेल्या बेस्टच्या अनेक वसाहती क्वारंटाईन केल्या आहेत. त्यामुळे कामगारांची मोठी अडचण झाली आहे. कामगारांना होणारी कोरोनाची वाढती बाधा आणि कोरोना झालेल्या कामगारांच्या मृत्यूमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची कोरोनाची संख्या वाढतच आहे. सरसकट कामगारांना कामावर बोलावण्याच्या प्रशासनाच्या धोरणाला कामगार संघटनांनी विरोध केला आहे. प्रशासनाचा हा निर्णय अविवेकी असल्याचा आरोप बेस्ट कामगार कृती समितीने केला आहे. आता कामावर हजर न राहिल्याबद्दल ६०० कामगारांना नोटिसा पाठविल्याबद्दल कामगार संघटनांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.