महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत
मुंबई : मुंबई कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. विशेष करून वरळी विभागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा दर १६ दिवसांवर आहे. तरीही वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांकडून लॉकडाऊनचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे या विभागात १०० टक्के लॉकडाऊन करावा लागेल, असे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
मुंबईच्या वरळी येथील वाढत्या रुग्णांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, वॉर्ड अधिकारी शरद उघडे आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी रुग्णांबाबत आढावा घेण्यात आला. वरळीच्या जी-साऊथ विभागात कोरोनाचे ८७१ रुग्ण आहेत. त्यापैकी ३०५ रुग्ण बरे झाले आहेत. ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सध्या या विभागात ५१६ कोरोनाचे रुग्ण आहेत. या विभागात बरे होण्याची टक्केवारी ३५ टक्के आहे. कोरोनाचे रुग्ण या विभागात जास्त प्रमाणात असले तरी रुग्ण दुप्पट होण्याचा दर १६ दिवसांवर गेला आहे अशी माहिती महापौरांनी दिली.
वरळीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तरीही वरळी, डिलाईट रोड येथील बीडीडी चाळीत लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. वरळीत कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने या विभागातील नागरिकांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावेत असे आवाहन महापौरांनी केले आहे. जर या विभागातील नागरिकांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले नाहीत तर वरळी, डिलाईट रोड येथील बीडीडी चाळीत १०० टक्के लॉकडाऊन करावे लागेल, असे महापौरांनी म्हटले आहे.