काळ्या कानाचा माणूस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-May-2020
Total Views |

black ear_1  H


शिकारीसाठी न्यू मेक्सिकोमध्ये भटकंती करीत असतानाची हकीकत आहे. लॉस पिनोस इथल्या ‘समिट हाऊस’ नावाच्या हॉटेलमध्ये मुक्काम होता. एके रात्री जेवणानंतर हॉटेलमालक टेलमकसशी गप्पा मारीत होतो. समवयस्क असल्याने मोकळेपणाने बोलत होतो. त्या दिवशी त्याला धाडसाने एक प्रश्न केला, “तुझा डावा कान काळा कसा झाला? खूप मोठी जखम झालीय की जन्मखूण होती?”


“जखम नाही की जन्मखूण नाही. तो आमच्या मैत्रीचा परिपाक आहे. मैत्रीच्या भावनेचं प्रतीक आहे.”
“म्हणजे काय?”
टेलमकसने सांगितलेली हकीकत तुम्हालाही आवडेल.
-------


पेजली फिश आणि मी दोघे जिवलग मित्र होतो. पेजली आणि माझ्या आवडीनिवडी भिन्न होत्या. त्याला वाचनाची आवड, मी अरसिक. रात्री उशिरापर्यंत तो शेक्सपिअरची पुस्तकं वाचत किंवा बासरी वाजवत बसायचा, तेव्हा मी मद्यपान करीत उद्याच्या कामाची आखणी करायचो. त्याला वेगवेगळ्या कल्पना सुचल्या की त्या अमलात आणण्यासाठीचे नियोजन मी करायचे, असा आमच्यातला अलिखित करार होता. तरुण असताना आम्ही अनेक उद्योगधंदे केले. मेंढ्यांचे कळप खरेदी करून वाढत्या किमतीत विकणे, सोन्याच्या खाणींमध्ये काम करणे, तारांची कुंपणे तयार करून विकणे, वगैरे. गाठीशी पैसे जमले की मनमुराद ट्रेकिंग, मुक्त भ्रमंती करायचो. आमच्यातली मैत्री इतकी घट्ट की खूनखराबा, धनलाभ किंवा कोणत्याच प्रलोभनासाठी तिचा आम्ही त्याग केला नसता. अशाच एका भटकंतीत आम्ही या गावात आलो. या गावात म्हणजे अक्षरशः याच जागी. इथं जेसप नावाच्या मध्यमवयीन विधवेने चालवलेली इन होती. इनमध्ये आमचा महिनाभर मुक्काम होता.
जेसपच्या हाताला चव होती. वागणं-बोलणं शालीन आणि प्रेमळ होतं. इथं येऊन आठ दिवस लोटल्यानंतर एके रात्री बागेत बसून कॉफी घेत असताना ती आमच्याशी गप्पा मारायला आली. आज हवा कशी उदास पडलीय वगैरे बोलत तिने टेनिसनची अगडबंब कविता उद्धृत केली. मग आम्ही कोठून आलोत याची चौकशी केली.
“स्प्रिंग व्हॅली,” मी उत्तरलो.


“बिग स्प्रिंग व्हॅली,” पेजलीने मला दुरुस्त केले. मी चमकलो. आम्ही ‘बिग स्प्रिंग व्हॅली’हून आलो असलो तरी सामान्य संभाषणात ‘स्प्रिंग व्हॅली’ असेच म्हटले जाई. पेजलीने मला खोडून का काढावे? रात्री निजताना त्याने खुलासा केला, “मी जेसपच्या प्रेमात पडलोय. कविता हा दोघांच्या आवडीचा विषय आहे.”


“मलाही तिचे ‘जेसप हिक्स’ असे नामांतर करायला आवडेल,” मी म्हणालो.

“मैत्री हे मोठे मूल्य आहे. तुझ्यावर कोणतेही संकट आले तर मी प्राणांची बाजी लावून तुझे रक्षण करीन. तू आजारी पडलास तर तुझी शुश्रुषा करीन. पण, इथे आपल्या मैत्रीची मर्यादा संपते. जेसपचे स्मितहास्य, स्पर्श आणि एकंदर सहवास हा आनंदाचा झरा आहे. त्यात मी एकट्यानेच डुंबावे अशी माझी इच्छा आहे.”
“तुझ्याप्रमाणे मला आलंकारिक भाषेत बोलता येणार नाही. पण, प्रेम वेगळे आणि मैत्री वेगळी. जेसप मला आवडलेली आहे. तिला आपल्यातीलच कोणी आवडेल याची खात्री नसताना तिच्यावरून आपण भांडणे योग्य नाही.”
माझे म्हणणे पेजलीला पटले. आम्ही दोघांनी करार केला. प्रत्येकाने दिवसातून एकदाच ठराविक मिनिटे तिच्याशी बोलायचे. या काळात एकमेकांच्या कागाळ्या करायच्या नाहीत. तिचा निर्णय काहीही असला तरी मान्य करायचा आणि मैत्री तोडायची नाही .रोज रात्री जेवणानंतर आम्ही तिघे भेटू लागलो. मी तिला गुलाबाचे फूल, बाजारातून आणलेला मध किंवा मुरांबा भेट द्यायचो. पण, मी पक्का मुखदुर्बळ. पेजली पक्का संभाषणचतुर. तो तिला अवजड कविता वाचून दाखवायचा. ती त्यातल्या अवघड शब्दांचे अर्थ विचारायची. दोघांच्या गप्पा ऐकून माझेही इंग्रजी सुधारत चालले होते. जेसप एखादी कविता तिच्या गोड आवजात गुणगुणायची ते ऐकत राहावेसे वाटे - कवितेचा अर्थ समजला नाही तरी. तिला तसे मी सांगितले तेव्हा ती खळखळून हसली.
एकदा आम्ही दोघेच होतो. मी भेट आणलेली वाईनची बाटली स्वीकारत ती म्हणाली, “या धुंद वातावरणात असं वाटतं की आता कोणी आपल्यामध्ये येऊ नये. इथेच काळ थांबावा.”
“पण आपल्याला थांबायला हवं,” मी म्हणालो. तिला समजलं नाही. मग मी तिला आमच्यातला करार सांगितल्यावर तिला जाम हसू आले. ती म्हणाली, “पेजली मित्र म्हणून ठीक असेल, सहचर म्हणून तूच हवास.” कराराप्रमाणे आम्ही थांबलो. पेजली आल्यावर त्याला निर्णय सांगितला. त्याने सुस्कारा सोडून तिला एक दर्दभरे सुनीत सुनावले.
रेल्वे स्टेशनसमोरच्या चर्चमध्ये आमचे लग्न झाले. रात्रीच्या गाडीने पेजली पुढच्या प्रवासाला निघणार होता. दुसर्‍या दिवशी जेसप आणि मी मधुचंद्राला जाणार होतो. प्रीस्टने चर्चच्या आवारातील त्याच्या आऊटहाऊसमध्ये आम्हाला मुक्कामाला परवानगी दिली होती.
सूर्य मावळला. मी अंगणात बसलो होतो. जेसप आत स्वयंपाकाची तयारी करीत होती. तिने जेवणासाठी हाक मारली.
“थोडा वेळ थांबतेस का? पेजली फलाटावर बसला आहे. रेल्वे आली की तो जाईल. जाताना मी त्याला हात करणार आहे.”
जेसप पाठीमागून आली आणि हातातल्या गरम सांडशीने माझ्या कानावर हा चटका दिला.
टेलमकसची हकीकत संपली.
------------------------------------
“पेजलीचे पुढे काय झाले? तो पुन्हा भेटला की नाही?” मी विचारले.
ती एक मोठी रंजक कहाणी आहे आणि टेलमकसने हकीकत सांगायला सुरुवात केली. पण, तेवढ्यात त्याला जेसपची हाक आली आणि आमच्या गप्पा टाकून तो धावत आत निघून गेला.
(TELEMACHUS, FRIEND या कथेवर आधारित)
- विजय तरवडे
@@AUTHORINFO_V1@@