नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर आता हळुहळू शांतता प्रस्थापित होत आहे. हिंसाचारामध्ये ४२ जणांचा मृत्यू तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल केले असून पाचशेहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमध्ये दोन दिवस मोठा हिंसाचार झाला, प्रामुख्याने उत्तर – पूर्व दिल्ली भागामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. दिल्ली पोलिसांसह सुरक्षा दले आता शांतता प्रस्थापित करण्यासोबतच हिंसाचाराविरोधातही कारवाई करीत आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल केले आहेत, तर १०० जणांना अटक केली असून ५२३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हिंसा घडविणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आता सायबर सेलची मदत घेतली आहे. सायबर सेल १२ गुन्ह्यांचा तपास करीत असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. फुटेजची तपासणी करून हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सएप, ट्वीटर आणि फेसबुकद्वारे चिथावणीखोर मजकूर, छायाचित्रे आणि व्हीडीओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
शांती प्रस्थापित करण्यास प्राधान्य : दिल्ली पोलिस आयुक्त
भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांनी शनिवारी दिल्लीच्या दिल्लीच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार मावळते आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्याकडून स्विकारला. यावेळी दिल्लीत धार्मिक सौहार्द आणि शांतता प्रस्थापित करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी जास्तीत जास्त गुन्हे नोंदविण्यात येत असून हिंसाचारात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला अटक करण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.