तरुणाने कन्हैया कुमारवर भिरकावली चप्पल
पाटणा : बिहारमध्ये पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार याला जनप्रक्षोभाचा सामना करावा लागला. आपल्या 'जन गण मन' यात्रेसाठी सोमवारी लखीसरायला दाखल झालेल्या कन्हैयावर भरसभेत चप्पल भिरकावली गेली. चप्पल मंचापर्यंत पोहचू शकली नाही. परंतु, सीपीआय कार्यकर्त्यांनी मात्र चप्पल भिरकावणाऱ्या तरुणाला पकडून बेदम चोप दिला. कन्हैया कुमारच्या बिहार यात्रेदरम्यान त्याच्यावर आत्तापर्यंत आठ वेळा दगडफेक करण्यात आली आहे.
कन्हैया आपल्या पूर्वनिर्धारीत कार्यक्रमासाठी गांधी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत दाखल झाला होता. मंचावरून सीएए विरोधात बोलणाऱ्या कन्हैयावर एका तरुणाने चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अपयशी ठरला आणि चप्पल मंचापर्यंत पोहचू शकली नाही. कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी पोलिसांनी गर्दीपासून बाजुला करत या तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, नाव चंदन कुमार असे या तरुणाचे नाव आहे. कन्हैया कुमार देशात दंगल पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, असे चंदनचे म्हणणे आहे.
एनआरसी आणि सीएए विरोधात कन्हैयाने 'जन गण मन' यात्रा सुरू केली आहे. जवळपास एक महिना ही यात्रा सुरू राहणार आहे. या यात्रेद्वारे तो बिहारच्या जवळपास सर्वच शहरात फिरणार आहे. ३० जानेवारी पासून सुरू झालेल्या या यात्रेदरम्यान कन्हैया ५० सभा घेणार आहे. त्याची ही यात्रा २९ फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे. या अगोदर कन्हैयाच्या ताफ्यावर जमुई, सुपौल, कटिहार यांसहीत इतरही काही ठिकाणी हल्ले झाले आहेत.