अमरावती : महाविकासआघाडीच्या सोलापुरातील बैठकी दरम्यान काँग्रेस नेत्यांनी घातलेल्या गोंधळाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या गोंधळाची दखल घेत विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
अमरावती येथे विधान परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचाराला आले होते.यावेळी माध्यमंही बोलताना त्यांनी या गोंधळावरून महाविकासआघाडीवर निशाणा साधला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. “तीन पक्षांमध्ये झालेली ही नैसर्गिक आघाडी नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्याने यांच्यात गोंधळ उडत राहणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघडीची बैठक आज सोलापुरात पार पडली. महाविकास आघाडीच्या या बैठकीत सुशीलकुमार शिंदे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. बैठकीत बॅनरवर सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो नसल्याने समर्थकांनी गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. यावरुन पुन्हा एकदा काँग्रेसमधील नाराजी नाट्य उघडकीस आले हे. सुशीलकुमार शिंदे समर्थकांच्या गोंधळानंतर राज्यमंत्री सतेज पाटील स्वत: खाली उतरले. काही काळ बैठकीत एकचं गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. सुशीलकुमार शिंदे समर्थकांनी जोरदार नारेबाजी करत जलसंपदामंत्री जयंत पाटील, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासमोर निषेध नोंदवला.