झुंजार, लढवय्ये, आक्रमक, सर्वस्पर्शी नेतृत्व!

    12-Oct-2020
Total Views | 230
Darekar_1  H x



मा. श्री. प्रवीण दरेकर अभिष्टचिंतन विशेष





विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. प्रवीण दरेकर यांचा आज वाढदिवस. सहकार चळवळीत त्यांच्यासोबत कार्य केलेला कार्यकर्ता तसेच विधिमंडळातील त्यांचा सहकारी म्हणून गेली अनेक वर्षे मी त्यांचे काम जवळून पाहत आहे. विधिमंडळात तसेच रस्त्यावर विविध प्रश्नांवर आमदार म्हणून आवाज उठविणारे हे जनसामान्यांतील नेतृत्व आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळत आहे. विरोधी पक्षनेते पदावर निवड झाल्यानंतर गेल्या नऊ महिन्यांत प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर अक्षरश: रान उठविले. राज्यातील कोविडचे संकट, कोकणातील ‘निसर्ग’ वादळ, अतिवृष्टीचे संकट असेल जनसामान्य, कोकणवासीय, कष्टकरी, बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी दरेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. दरेकर यांच्या या झंझावातामधून मला त्यांच्यामधील संवदेशील नेता, तडफदार नेता, तडाखेबंद वक्तृत्व, प्रस्थापितांना जाब विचारणारा नेता, विधिमंडळात आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने सरकारला घाम फोडणारा नेता मला दिसला. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी त्या पदाची एका उंचीवर नेलेली गरिमा व त्यांच्यासोबत काम करताना व मला दिसलेला गेल्या नऊ महिन्यातील प्रस्थापितांविरोधातील संघर्ष त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी राज्यातील कोट्यवधी जनतसमोर मांडत आहे.
 
 
 
डिसेंबरमधील नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत नऊ महिन्याच्या अल्पावधीच्या काळात त्यांनी खर्‍या अर्थाने विरोधी पक्षनेता म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या व भोंगळ कारभाराचे अक्षरश: वाभाडे काढले. विधिमंडळात कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न, कोकणवासीयांचे प्रश्न, चाकरमान्यांच्या समस्या, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, मुंबईकरांच्या समस्या आदी विविध प्रश्नांनी त्यांनी सरकारला सळो की पळो करुन सोडले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने त्यांनी सरकारला विधिमंडळात धारेवर धरले, तर कधी निरुत्तर केले. विद्यार्थी चळवळीपासून असलेली त्यांच्या वक्तृत्वातील तडाखेबंद मांडणी राज्यातील कोट्यवधी जनतेने विधान परिषदेत पाहिली.
 
 
 
मार्च महिन्यात जगातील कोविड संकट महाराष्ट्रात आल्यानंतर दरेकर यांनी कोणतीही पर्वा न करता ते ‘कोविड योद्धा’ म्हणून राज्यात ठिकठिकाणी फिरले. ज्या-ज्या ठिकाणी ऑक्सिजन, पीपीई किट्स, अत्यावश्यक इंजेक्शन यांची कमतरता होती, त्या त्या ठिकाणी पोहोचून दरेकर यांनी तातडीने ती मिळवून दिली व शेकडो कोविड रुग्णांचे प्राण वाचविले. कोविड सेंटरमधील भोंगळ कारभाराच्या विरोधात जाब विचारताना त्यांनी तेथील डॉक्टर्स, नर्सेस व अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या कमतरतेचा विषय ऐरणीवर आणला. प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या थेट ‘ऑन द स्पॉट’ संपर्क करुन कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुन लाखो कोविड रुग्णांना दिलासा दिला. कोविडच्या प्रारंभी ‘लॉकडाऊन’च्या काळात मागाठाणे विधानसभा मतदारसंघात, तसेच मुंबईतील विविध भागांत किचन सेवा, धान्यवाटप सुरु केले. कामगार, फेरीवाले, मजदूर यांच्यासह मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आदींना त्यांनी मदतीचा हात दिला. दरेकर यांची ही मदत ‘लॉकडाऊन’च्या काळात अव्याहतपणे सुरुच होती.
 
 
 
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासीयांना महाविकास आघाडी सरकारने वार्‍यावर सोडले होते. कोविडच्या काळात त्या कोकणवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी दरेकर यांनी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना त्या संकटकाळात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरत, तेथे योग्य व्यवस्था तातडीने सुरु केल्या. त्यामुळे कोकणवासीयांना खर्‍या अर्थाने दिलासा मिळाला. कोविडच्या काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात स्थानिक महापालिकांच्यामार्फत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरना दरेकर यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तेथील प्रशासकीय त्रुटी, गैरव्यवस्था व असुविधेच्या प्रश्नांवर संबंधित पालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकार्‍यांशी बैठका घेऊन त्यांना अनेक सूचना दिल्या व उपाय सुचविले. त्यानंतर येथील बहुतांश कोविड सेंटरचे काम सुरळीत सुरु झाले. तसेच कुर्ला, मालाडमधील काही रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना लुटणार्‍या व कोविडमध्ये मृत पावलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या मुजोर रुग्णालय व्यवस्थापनाला आपल्या स्टाईलने जाब विचारला.
 
 
 
रुग्णांना लाखो रुपयांची बिले पाठविणार्‍या रुग्णालयात धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे चाळीत, झोपडपट्टीत राहणार्‍या रुग्णांना पाठविण्यात आलेले लाखो रुपयांचे बिल दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केलेल्या आंदोलनामुळे कमी करण्यात आले. दरेकर यांनी हा प्रश्न लावून धरल्यामुळे कोविड रुग्णांची काही रुग्णालयांकडून होणारी वारेमाप लुटमार थांबली व शेकडो रुग्णांना न्याय मिळाला. कोविडचे संकट सुरु असतानाच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. एका रात्रीत कोकणवासीयांची अवस्था होत्याची नव्हती झाली. कोकणवासीयांची स्वप्ने काही काळातच उद्ध्वस्त झाली. लाखो कोकणवासीय बेघर झाले. कोकणवासीयांवर आभाळ कोसळले. पण, या संकटमय व कोविडची परिस्थिती असताना संवेदनशील मनाचे दरेकर अस्वस्थ झाले. कोकणचे सुपुत्र असलेल्या दरेकर यांनी सर्वप्रथम रातोरात कोकण गाठले.
 
 
 
 
चक्रीवादळामुळे वाताहत झालेल्या जिल्ह्यांची भेट घेतली. पहिल्यांदा स्वत: दौरा केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने कोकणचा संपूर्ण दौरा केला. वाताहत झालेले कोकण पुन्हा उभारण्याच्या दृष्टीने तेथील स्थानिक प्रशासन, तसेच सरकारशी संघर्षाची भूमिका घेत कोकणवासीयांना न्याय मिळवून दिला. विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या कोकणातील भेटीनंतर झोपी गेलेले राज्य सरकार खडबडून जागे झाले. आंबा, नारळ, सुपारी, भातशेतींच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या घरांच्या पुनउर्भारणीसाठी लागणारी सर्व शासकीय मदत दरेकर यांनी मिळवून दिली. एवढेच नव्हे, तर भाजपच्या माध्यमातून कोकणवासीयांना मदतीचा हात देण्यात आला. सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी दरेकर यांनी कोकणातील अनेक ठिकाणी पायपीट केली व कोकणवासीयांना न्याय मिळवून दिला. विशेष म्हणजे, दरेकर यांनी आपल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या दौर्‍यात गावा-गावात जाऊन तेथील कोकणवासीयांच्या समस्या जाणून घेतल्या.
 
 
 
 
राज्यावर संकटांची मालिका सुरु असतानाच, मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. बळीराजा संकटात सापडला असताना राज्यातील ठाकरे सरकार मात्र आपला प्रशासकीय कारभार ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून रेटून नेत होते. पण, विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी अतिवृष्टीची तमा न बाळगता थेट मराठवाडा गाठला. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दु:ख समजावून घेतले. मराठवाड्यातील शेतकर्‍यांची लाखो हेक्टर जमीन अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली. उभी पिके आडवी झाले. पूर्ण हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा निघून गेला. शेती, जमीन, घरे सर्वार्थाने शेतकरी पिळवटला गेला. पण, सरकारचा कारभार ढिम्म पद्धतीने सुरु होता. दरेकर यांनी तातडीने मराठवाड्याकडे कूच करीत औरंगाबद, परभणी, हिंगोली, जालना, बीड आदी जिल्ह्यांचा दौरा करीत नुकसान झालेल्या जमिनीची व शेतीची पाहणी केली. तेथील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. केवळ शेतकर्‍यांकडून निवेदन न घेता, त्यांनी स्वत: शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा समजावून घेतल्या. शेतकर्‍यांना धीर दिला.
 
 
 
 
सरकारकडून ना शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे झाले होते, ना जमिनीच्या नुकसानीची माहिती सरकारी अधिकार्‍यांनी घेतली होती. शेतकर्‍यांचा पीकविमाही मिळत नव्हता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. कुटुंबातील वयोवृद्ध, मुले यांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. पण दरेकर यांनी या हजारो शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. ‘ऑन द स्पॉट’ महसूल, कृषी अधिकार्‍यांना तातडीने पाचारण करुन शेतकर्‍यांच्या शेती व जमिनीचे पंचनामे करुन घेतले. शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपये देण्याची आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात भेट देऊन दरेकर यांनी तेथील जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍यांच्या वेदना समजावून सांगितल्या. शासनाकडून होणारी मदत खूपच तुटपुंजी आहे, त्यामुळे बळीराजाला पुन्हा उभे करायचे असल्यास, त्याला चांगली मदत द्या, याची जाणीव त्यांनी आकडेवारीसह प्रशासनाला करुन दिली.
 
 
 
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्ण बिघडली आहे. दिवसाढवळ्या महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या महिला सुरक्षित नाही. रोहा व पुणे-तळेगाव येथे अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्यानंतर दरेकर यांनी तातडीने त्या ठिकाणी भेटी दिल्या. घटनास्थळी जाऊन पोलिसांकडून घटना समजून घेतली. तसेच आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर राज्यातील महिला व अत्याचाराच्या प्रश्नावर विधान परिषदेत आवाज उठविला. राज्याच्या गृहमंत्र्यांना जाब विचारला. बलात्कार, विनयभंग अशा अत्याचाराच्या घटनांमधील गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची आग्रही मागणी केली. पुराव्याअभावी या नराधमांची न्यायालयातून सुटका होऊ नये, या मागणीसाठी अशा काही प्रकरणात विशेष सरकारी वकील नियुक्तीचा आग्रह धरला. तसेच ही सर्व प्रकरणे जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी केली. गणपतीमध्ये गावाकडे चाललेला चाकरमानी ‘लॉकडाऊन’मुळे अडकून पडला होता. गावी जाण्यासाठी त्यांच्याकडे ई-पासची सुविधा नव्हती. कोकणात जाण्यासाठी सरकारकडून ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर चाकरमान्यांची अडवणूक केली जात होती. परंतु, दरेकर यांनी या प्रश्नावर पाठपुरावा करुन गणपतीमध्ये कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना दिलासा दिला.
 
 
 
 
मुंबईत गेल्या काही महिन्यांत इमारत पडण्याच्या दुर्घटना घडल्या, मग त्या काळबादेवी असो वा पायधुनी तर कधी भिवंडी, तर पनवेल व महाड, पण विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी मानून दरेकर प्रत्येक दुर्घटनास्थळी जातीने पोहोचले. तेथील मदतकार्यात सूचना दिल्या. त्याचप्रमाणे येथील दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळविण्याचा आग्रह शासनाकडे धरला. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण ज्या महाविद्यालयात झाले, त्या फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या दुरुस्तीच्या प्रश्नाला दरेकर यांनी वाचा फोडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती या महाविद्यालयाशी जोडल्या आहेत, त्या महाविद्यालयाची अवस्था पाहून दरेकर अस्वस्थ झाले. केवळ विरोधी पक्षनेता म्हणून नव्हे, तर सिद्धार्थ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी या नात्याने त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा केला व महाविद्यालयाच्या दुरुस्तीसाठी १२  कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला.
 
 
 
आपल्या नऊ महिन्यांच्या कारकिर्दीत दरेकर यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. त्यांना न्याय मिळवून दिला. प्रसंगी राज्य सरकारशी संघर्ष करीत विरोधी पक्ष या नात्याने त्यांनी सरकारला जागे केले. ऊन, पाऊस, कोविड, वादळ यांसारख्या संकटांची तमा न बाळगता, एका वादळी झंझावाताप्रमाणे संपूर्ण राज्य त्यांनी पालथे घातले. मग तो मराठा आरक्षणाचा प्रश्न असो वा, राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा प्रश्न, राज्य सरकारची चुकीची धोरणे असो वा महापालिकांचा गलथान कारभार...ज्या ठिकाणी अन्याय, अवहेलना व सामान्यांचे शोषण होताना दिसले, त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष पोहोचले व सर्वांना एक आश्वासक मदतीचा हात दिला. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सर्वोच्च सभागृहात विरोधी पक्ष नेता बनतो, याचा एक सहकारी मित्र म्हणून मला अभिमान आहे.
 
 
 
 
अशा या सदैव लढवय्या, झुंजार, रोखठोक नेत्याला राज्यातील कोट्यवधी जनतेच्यावतीने कोटी कोटी शुभेच्छा...!
 
- प्रसाद लाड
 
(लेखक आमदार, विधान परिषद आणि भाजप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष आहेत.)
 
 
 
 
p1_1  H x W: 0
 
 
 
 मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत ‘कोविड सेंटर’च्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी सर्व ठिकाणी पायपीट केली.
 
 

P-2_1  H x W: 0 
 
 
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणात एका आदिवासी महिलेला आधार देतानाचा एक भावूक क्षण.
 
 

P-3_1  H x W: 0 
 
 
शेतकर्‍यांच्या बांधावर गेल्यावर पीककर्ज मिळत नाही, कर्जमाफी मिळत नाही, अशा बँकांविषयी तक्रारी मिळताच सेलू येथील एसबीआय बँकेच्या बाहेर ठिय्या मांडला व शेतकर्‍यांचे बँकेशी निगडीत विषय दरेकर यांनी मार्गी लावले.
 
 
 
 

P-4_1  H x W: 0 
 
 
 
केवळ ’Line Touch' दौरा नाही, तर दोन-तीन किलोमीटर शेतकर्‍यांसमवेत जाऊन प्रवीण दरेकर यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांच्याबरोबर बैलगाडीतून प्रवास केला.
 
 
 
P-5_1  H x W: 0
 
 
 
आमदार बबनराव लोणीकर यांच्या समवेत परतूर मंठा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर.
 
 

P-6 (1)_1  H x  
 
 
 
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. मानवत तालुक्यात अशाच एका शेतकर्‍याच्या बांधावर संवाद साधताना प्रवीण दरेकर.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121